आवेग दाटलेला !!!

आवेग दाटलेला !!!

.
*

वाहून काल गेला , राहून साचलेला !
वाही मढे मनाचे , हा जीव वाचलेला !!

*

रंगात रंगण्या त्या राधा बनून आले ,
का रे प्रतारणेचा तू रंग फ़ासलेला ?

*

मागून प्रेम येथे भेटे कधी कुणा का ?
गाठून तू विषाचा प्यालाच पाजलेला !

*

त्यागून मोह-माया मी चालले तरीही ,
का व्यर्थ सूड घेई हा बंध काचलेला !

*

तोडूनही तुटेना ही पोत मानभावी ,
मेल्याविणा सुटेना हा पीळ जाचलेला !

*

येईल पावसाळा ही आस मोरपंखी ,
शब्दात मांडवेना आवेग दाटलेला !!

*

-सुप्रिया (जोशी) जाधव.

गझल: 

प्रतिसाद

वा! क्या बात है! शुभेच्छा...

धन्यवाद मिलिंदजी !!!

येईल पावसाळा ही आस मोरपंखी ,
शब्दात मांडवेना आवेग दाटलेला !!
छान.

धन्यवाद अजयजी.

'मेल्याविणा सुटेना हा पीळ जाचलेला !'

'का व्यर्थ सूड घेई हा बंध काचलेला !'

आवडले..

मढे आणि आवेग जबरी आहेत!!
प्रामाणिक भावना व्यक्त करणारी गझल वाटली...

तोडूनही तुटेना ही पोत मानभावी ,
मेल्याविणा सुटेना हा पीळ जाचलेला !

सही! आनंदयात्रीशी सहमत.
गझल आवडली.

छान गझल.

रंगात रंगण्या त्या राधा बनून आले ,
का रे प्रतारणेचा तू रंग फ़ासलेला

हा "त्या" टाळता येतो का हे पहावे.

रंगात रंगण्याला....कसे वाटेल ताई?