फुलांना जर असे


फुलांना जर असे आहेच कोमेजायचे
कशाला जीव लावुन ताटवे फुलवायचे


कशासाठी  पसारा मांडला तू  एवढा?
तुला आहेत सारे सूर्य जर वि़झवायचे


पुन्हा  भिजलो न मी , भिजलो मिळुन दोघे जसे
विसरले मेघही नंतर  तसे बरसायचे


विचारे सारखी येऊन आठवणीत ती
'किती वेळा ठरवले तू मला विसरायचे'


नको पाहू अशी तू एकटक माझ्याकडे
तुझ्या डोळ्यात माझे गीतही हरवायचे


'पुन्हा भेटू 'जरी म्हटले निरोपाच्या क्षणी
उमजलो मी,पुन्हा नाही कधी भेटायचे


सदा माझे तुझे माझे तुझे माझे तुझे
अमीबांचे कधी या विश्व विस्तारायचे


तुला बघताच माझी गझल बोलू लागते
मला नाहीच जमले पण कधी बोलायचे


                          प्रमोद बेजकर


गझल: 

प्रतिसाद

प्रमोदजी, झकास गझल!
मतला, पुन्हा भेटू आणि शेवटचा शेर खूप आवडले!! "उमजलो मी,पुन्हा नाही कधी भेटायचे" - क्या बात है!!
तू मांडला(स), तू पाहू नको(स).. ही तडजोड टाळता आली असती तर आणखी बहार आली असती!
अमीबा चा शेरही मस्त आहे, पण दुसर्‍या वाचनात जाणवले की "अमीबा" चपखल बसत नाही. अमीबा कितीही छोटे असले तरी ते एकमेकांत मिसळून त्यांच्या परीने विस्तारतच जातात!  "कसे हे मंडुकांचे विश्व विस्तारायचे" असे केले तर अधिक योग्य होईल असे वाटते. चू.भू.द्या.घ्या.
-- पुलस्ति.

 पुन्हा  भिजलो न मी , भिजलो मिळुन दोघे जसे
विसरले मेघही नंतर  तसे बरसायचे
वाव्वा!
नको पाहू अशी तू एकटक माझ्याकडे
तुझ्या डोळ्यात माझे गीतही हरवायचे
वाव्वा!'पुन्हा भेटू 'जरी म्हटले निरोपाच्या क्षणी
उमजलो मी,पुन्हा नाही कधी भेटायचे
वाव्वा!

   सुंदर गझल.

प्रमोदराव,
फुलांना जर असे आहेच कोमेजायचे
कशाला जीव लावुन ताटवे फुलवायचे .. वा! सुंदर मतला आहे.
तुला आहेत सारे सूर्य जर वि़झवायचे - वा!
मेघ आणि मक्ताही आवडले.
- कुमार

कशासाठी  पसारा मांडला तू  एवढा?
तुला आहेत सारे सूर्य जर वि़झवायचे.. वा मस्त

तुला बघताच माझी गझल बोलू लागते
मला नाहीच जमले पण कधी बोलायचे.....  जफर गोरख पुरींची 'तो समझो गझल हुई' ही गझलआठवली.मस्त
-मानस६

गझल आवडली.
1,4,5,6 khUp aavaDale

वा...वा...वा...
छान गझल.
फुलांना जर असे आहेच कोमेजायचे
कशाला जीव लावुन ताटवे फुलवायचे...        छान

विचारे सारखी येऊन आठवणीत ती
'किती वेळा ठरवले तू मला विसरायचे'...     कल्पना फारच छान

नको पाहू अशी तू एकटक माझ्याकडे
तुझ्या डोळ्यात माझे गीतही हरवायचे...     पहिली  ओळ अप्रतिम

 
'पुन्हा भेटू 'जरी म्हटले निरोपाच्या क्षणी
उमजलो मी,पुन्हा नाही कधी भेटायचे...         जबरदस्त ! ! !

 
सदा माझे तुझे माझे तुझे माझे तुझे
अमीबांचे कधी या विश्व विस्तारायचे ...            जोरदार !
 
लिहीत राहा...शुभेच्छा !
 

 
                

प्रमोदशेठ,
एकदम झकास गझल.. आवडली..
बाकी प्रदिपशेठशी एकदम सहमत.. पु.ले.शु.

आमचा दुसरा प्रतिसाद  इथे वाचा
केशवसुमार.
 

बहोत अच्छे...! क्या बात है...!
 
नको पाहू अशी तू एकटक माझ्याकडे
तुझ्या डोळ्यात माझे गीतही हरवायचे


'पुन्हा भेटू 'जरी म्हटले निरोपाच्या क्षणी
उमजलो मी,पुन्हा नाही कधी भेटायचे

तुला बघताच माझी गझल बोलू लागते
मला नाहीच जमले पण कधी बोलायचे.... हे शेर फार आवडले  !
अभिनंदन !!!
संतोष कुलकर्णी, उदगीर

सुरेख गझल !!!!
सर्व गझल अतिशय आवडली. शेवटचा शेर  तर खुपच छान.
पुढिल रचनेस शुभेच्छा!!!
चन्द्रकान्त

वा वा सुरेख गझल...
सर्वच शेर आवडले..
विशेषतः मेघ, पुन्हा भेटू आणि मक्ता...
फक्त लावुन, मिळुन थोडॆ खटकले...
तसेच मला सूर्याचा शेर नीट कळला नाही...  माझे अद्न्यान...  :(
विश्वनिर्मात्याविषयी भाष्य केले आहे का?