सांजवेळी आठवांचा मेघ हा दाटे पुन्हा..

सांजवेळी आठवांचा मेघ हा दाटे पुन्हा
अन् झरावे, आसवांना सारखे वाटे पुन्हा...

मी नसे नुसता प्रवासी, मी दिशांचे खेळणे
पायवाटा या तरीही जोडती फाटे पुन्हा...

प्राक्तनाने अमृताचा घोटही मज लाभला
खोड ही आहे जुनी की चित्त हे बाटे पुन्हा...

लाविली आहेत रोपे आस कुसुमांची मनी
कुंपणासाठी जपावे लागले काटे पुन्हा...

ती पुन्हा येणार नाही मी घरा समजावले
उंबरा आता कशाला 'माप' हे थाटे पुन्हा..?

गुणगुणाया लागलो मी 'शाम'ही माझी व्यथा
काय हा झाला गुन्हा की जीभ तो छाटे पुन्हा?..

गझल: 

प्रतिसाद

लाविली आहेत रोपे आस कुसुमांची मनी
कुंपणासाठी जपावे लागले काटे पुन्हा...

ती पुन्हा येणार नाही मी घरा समजावले
उंबरा आता कशाला 'माप' हे थाटे पुन्हा..?

हे शेर खुप आवडले.

-सुप्रिया.

धन्यवाद! सुप्रियाताई.

लाविली आहेत रोपे आस कुसुमांची मनी
कुंपणासाठी जपावे लागले काटे पुन्हा...

.............वाहवा.."कुंपणासाठी जपावे लागले काटे पुन्हा..." हे फारच आवडले

ती पुन्हा येणार नाही मी घरा समजावले
उंबरा आता कशाला 'माप' हे थाटे पुन्हा..?
....हे पण अप्रतिम...........