''भारतीय''

उत्तरेचे, दक्षिणेचे,रंक आणि राव येथे
शोधुनीही सापडेना भारताचे नाव येथे

मी मराठी,तो बिहारी,भारताचा ना कुणी ही
अस्मितेचा हर प्रदेशी,रंगलेला डाव येथे

घालुनी खड्ड्यात्,देशाला,कसे निर्लज्ज नेते,
''मीच तारणहार आता'' आणती बघ आव येथे

''धर्म'' हे चलनी इथे नाणेच वाजे खणखणा की,
''झामुमो''च्या ही सदस्यालाच कोटी भाव येथे

ज्या रथाचा सारथी , फुंकून ठेवी अस्मितेला,
आजही ''कैलास'' धावे तोच रथ भरधाव येथे.

डॉ.कैलास गायकवाड

गझल: 

प्रतिसाद

मी मराठी,तो बिहारी,भारताचा ना कुणी ही
अस्मितेचा हर प्रदेशी,रंगलेला डाव येथे

क्या बात है कैलाशजी... वाह...
हे प्रहार व्हायलाच पाहिजेत

मतला आणि डाव मस्त.

माणसे नाहीत हया देशात आता
सांगतो जो तो स्वतःची जात आता..
आठवले'''

''धर्म'' हे चलनी (इथे) नाणेच वाजे खणखणा की,
''झामुमो''च्या ही सदस्याला(च)कोटी भाव येथे

इथे, च, भरतीचे शब्दवाटतात..प्रवाही यावे असे माझे मत..

... बाकी छान!

धर्म हे चलनी इथे (भारतात) नाणेच वाजे खणखणा की
''झामुमो'' च्या हि सदस्यालाच कोटी भाव येथे

आता आपणांस हे शब्द ''भरती के अलफाँज'' वाटणार नाहीत.

धर्माधारित मुद्द्यांवर भारतात प्राधान्याने निवडणुका लढ विल्या जातात.. यास्तव ''इथे'' चे प्रयोजन.

राव सरकारने विश्वास दर्शक ठराव पारित होण्यासाठी झारखंड मुक्ती मोर्च्याच्या सदस्यांस लाच दिल्याची वदंता होती... त्यावर आधारित शेर आहे. लाच ठळक केल्यावर आपल्या लक्षात यावा. असो...

'झामु मोर्चा'च्या सदस्यालाच कोटी भाव येथे..
असे असल्यास 'च' चा निश्चीतपणा राहील असे वाटते..
एकाच शेरात इथे आणि येथे...गोड वाटत नाही.
बाकी आपण ठरवावे.

एकाच शेरात इथे व येथे हे खरच गोड वाटत नाही... यास्तव
''इथे'' ऐवजी ''असे'' ठीक राहील. धन्यवाद.