शब्द बेईमान झाले आज इतके काय सांगू?

का सदा माझ्यापुढे ही संकटे 'आ' वासलेली?
काळ आहे माजला की जिंदगी सोकावलेली?

शब्द बेईमान झाले आज इतके काय सांगू?
बोलता आलीच नाही गोष्ट मनि आकारलेली

मुक्त मी व्हावे म्हणोनी आणला आवेश अंगी
भान आले पाहिली अन, पावले ही बांधलेली

भौतिकाचे भाट, ज्यांना बोचला संसार माझा
आज संन्यासात त्यांची का मती मग बाटलेली?

'विजय' मिळवू षडरिपूंवर, वल्गना केली जरी मी
आस भोगाचीच आहे अंतरी जोपासलेली........

गझल: 

प्रतिसाद

मतला , मक्ता ..छान!

बाकी कसे वाटते बघ..

शब्द बेईमान झाले आज इतके काय सांगू?
बोलताआलीच नाही गोष्ट मनि आकारलेली
(बोलता नाहीच आली गोष्ट हृदयी गुंफलेली)

मुक्त मी व्हावे म्हणोनी आणला आवेश अंगी
भान आले पाहिली अन, पावले ही बांधलेली
(मुक्त मी व्हावे म्हणोनी सारखी खुणवीत होती
बांधलेल्या पावलांची स्वप्न सारी थांबलेली)

चू.भू.द्या.घ्या.

शाम,

आवर्जून दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद!!

थांबलेली असा काफिया जमीनीत असल्यामुळे "स्वप्न" असे घेता येणार नाही असे वाटते आणि स्वप्ने किंवा अगदी स्वप्नं घ्यायचे तर वृत्त बिघडेल.....

चू.भू.द्या.घ्या

- विजय

पहिली द्विपदी 'मनि' ही व्याकरणीक तडजोड टाळण्यास्तव सुचवली.
दुसरी
(मुक्त मी व्हावे म्हणोनी आणला आवेश अंगी)
तुम्हाला मुक्तता हवीये ,म्हणजेच तुम्ही बंधनात आहात ही जाणीव तुम्हाला आगोदरच आहे.
म्हणून नंतरच्या ओळी निर्थक वाटतात, (असे माझे मत) म्हणून सुचवली.

बाकी 'स्वप्नं' मुळे वृत्त बिघडते असे मला वाटत नाही.

तरी आपण जाणकारांचा सल्ला घेऊन ठरवावे.

आपुलकीने सुचविल्या बद्दल मनापासून धन्यवाद...विजय