एक इरादा हसण्याचा

एक इरादा हसण्याचा अन विरोधात दुनिया सारी
आणि नभाशी कशा न्यायच्या इतक्या छोट्या तक्रारी

आज निसरड्या संध्येवरुनी पाय घसरला कोणाचा?
आज कुणाचा उजेड गेला अंधाराच्या आहारी ?

काय कुणाचा खजिना माझ्या उरामधे दडला आहे
एक आठवण "तिळा तिळा" घोकते पापण्यांच्या दारी

दोन अपत्ये पोटाला अन जन्मभराचे फरपटणे
स्वप्न निपजले संन्यासी अन भूक निपजली संसारी

काळ असा आहे की रात्री भिंत भिंत दचकत असते
कसे कळेना सगळे झाले अतिरेक्यांचे शेजारी

परवा परवा गुणगुणायची .. आता कण्हते अक्षरश:
माझ्या डोळ्यांदेखत माझी कविता झाली म्हातारी

कुठल्याशा आजाराने तोंडाची चव गेली आहे
शब्दांच्या वासानेही मौनाला येते ओकारी

एक इरादा निघण्याचा अन विरोधात ह्या दिशा दिशा
पाय ठेवतो ज्यावर त्या त्या वाटा फिरती माघारी

गझल: 

प्रतिसाद

वा वैभव! बर्‍याच दिवसांनी टाकलीस. छांगली गझल आहे.

एक इरादा हसण्याचा अन विरोधात दुनिया सारी
आणि नभाशी कशा न्यायच्या इतक्या छोट्या तक्रारी - इतक्या छोट्या तक्रारी - वा

आज निसरड्या संध्येवरुनी पाय घसरला कोणाचा?
आज कुणाचा उजेड गेला अंधाराच्या आहारी ? ?

काय कुणाचा खजिना माझ्या उरामधे दडला आहे
एक आठवण "तिळा तिळा" घोकते पापण्यांच्या दारी - सॉलीड शेर

दोन अपत्ये पोटाला अन जन्मभराचे फरपटणे
स्वप्न निपजले संन्यासी अन भूक निपजली संसारी - छान

काळ असा आहे की रात्री भिंत भिंत दचकत असते
कसे कळेना सगळे झाले अतिरेक्यांचे शेजारी

परवा परवा गुणगुणायची .. आता कण्हते अक्षरश:
माझ्या डोळ्यांदेखत माझी कविता झाली म्हातारी - लय मस्त

कुठल्याशा आजाराने तोंडाची चव गेली आहे
शब्दांच्या वासानेही मौनाला येते ओकारी - सुरेख

एक इरादा निघण्याचा अन विरोधात ह्या दिशा दिशा
पाय ठेवतो ज्यावर त्या त्या वाटा फिरती माघारी

फारा दिवसांनी. गझल नेहमीप्रमाणेच मस्त.

दोन अपत्ये पोटाला अन जन्मभराचे फरपटणे
स्वप्न निपजले संन्यासी अन भूक निपजली संसारी

वाव्वा!! मस्त.

बशीर बद्रचा वेगळा शेर आठवला. तो असा :

दुनिया है बेपनाह तो भरपूर ज़िंदगी
दो औरतों के बीच में लेटा हुआ हूँ मैं

परवा परवा गुणगुणायची .. आता कण्हते अक्षरश:
माझ्या डोळ्यांदेखत माझी कविता झाली म्हातारी

वाव्वा!!

मतला छान.
गझल छानच आहे, पण फार भरारी घेत नाही असे वाटते. काही शेर भावगीताच्या अंगाने गेले आहेत की काय असे वाटते.
अंधाराच्या आहारी, आणि भूक आवडले.

वा , गझल मस्तच आहे.
तिळा तिळा, परवा गुणगुणायची आणि दोन अपत्ये हे शेर फार आवडले.
सोनाली

वा वा! चन्गलि जमलि आहे. 'एक एरादा......' आवडालि. सगळ्या गोश्टि गगनाशि नेण्यापेक्शा आपणच मार्ग कादवा. धन्यवाद.
के.सुवर्णा

परवा परवा गुणगुणायची .. आता कण्हते अक्षरश:
माझ्या डोळ्यांदेखत माझी कविता झाली म्हातारी

क्या बात है! खूपच खास गझल!

व्वा !
नेहमीप्रमाणेच प्रगल्भ, देखणी गझल.
सगळेच शेर सुंदर आहेत.

"एक आठवण "तिळा तिळा" घोकते पापण्यांच्या दारी"

"स्वप्न निपजले संन्यासी अन भूक निपजली संसारी"

"माझ्या डोळ्यांदेखत माझी कविता झाली म्हातारी"

"शब्दांच्या वासानेही मौनाला येते ओकारी.."

या सर्वच ओळी मनाचा ठाव घेणार्‍या आहेत. 'स्वप्न निपजले..' शेर फार फार अर्थपूर्ण आहे !
धन्य झालो !

सर्वांचे धन्यवाद.

इंटरनेटवर फार काळ उपलब्ध नसण्याने नेहेमी येणे जमतेच असे नाही. ब-याचशा रचना / प्रतिसाद वाचायच्या राहून जातात ह्या बद्दल दिलगीर आहे.

दादा... as usual fantastic....

दोन अपत्ये पोटाला अन जन्मभराचे फरपटणे
स्वप्न निपजले संन्यासी अन भूक निपजली संसारी
..खुप आवडली.

वा:!
काय स्वच्छ-सुंदर आणि तडफदार गझल आहे!
एकन् एक शेर भारी आहे!

खुप आवडली. म्हातारीची खुप छान.

वैभव,
अत्यंत सुंदर रचना. सगळ्या प्रतिमा वेगळ्या आहेत. टिपिकल नाहीत. किंवा जुन्या प्रतिमांना नवा अर्थ दिला आहे. अतिशय सुंदर
खास करूनः
एक इरादा हसण्याचा अन विरोधात दुनिया सारी
आणि नभाशी कशा न्यायच्या इतक्या छोट्या तक्रारी

आज निसरड्या संध्येवरुनी पाय घसरला कोणाचा?
आज कुणाचा उजेड गेला अंधाराच्या आहारी ?

दोन अपत्ये पोटाला अन जन्मभराचे फरपटणे
स्वप्न निपजले संन्यासी अन भूक निपजली संसारी

काळ असा आहे की रात्री भिंत भिंत दचकत असते
कसे कळेना सगळे झाले अतिरेक्यांचे शेजारी

परवा परवा गुणगुणायची .. आता कण्हते अक्षरश:
माझ्या डोळ्यांदेखत माझी कविता झाली म्हातारी

कुठल्याशा आजाराने तोंडाची चव गेली आहे
शब्दांच्या वासानेही मौनाला येते ओकारी

मस्त मजा आला... वाहवा च्या पुढचे लिखाण, एकदम नवे ताजे. तेच तेच गुळमुळीत प्रतिमा नसलेले. मस्तच...

मस्तच गझल वैभव.... खूप आवडली...

सर्वच शेरात वेगळ्या कल्पना आहेत...

अपत्ये आणि म्हातारी कविता तर कहर आहेत...

संपूर्ण गझल आवडली.

वैभव दादा, एक जमाना झालाय...
आपलि गझल वाचुन .... आणि मराठी गझल या संकेत स्थळावर तर भेट दुर्मीळ्च झालीय.....
आपल्या गझला येवु द्या दादा....
तुमच्या गझला वाचुन आणि प्रतिसादांमधुन खुप शिकायला मिळतं....
गझल खुप आवडली......
नेमका शेर सांगणं कठिण....
सुंदरच ...

निव्वळ अप्रतिम वैभवजी,

माझ्यासारख्या नवशिक्याला खुप शिकायला मिळाले या रचनेतून......

धन्यवाद