हे खेळ संचिताचे .....!

हे खेळ संचिताचे ...!

काजळील्या सांजवाती, चंद्रही काळोखला
का असा रे तू समुद्रा निर्विकारे झोपला

सर्वसाक्षी तू म्हणाला "सर्वमय आहेस तू"
हस्त माझा रेखतांना का असा भांबावला

हंबरूनी वासराने हंबरावे ते किती
आज गायीने पुन्हा तो मस्त पान्हा चोरला

तृप्त झाल्या क्रुद्ध वाटा, पावले रक्ताळूनी
का कशाला धोंड कोणी जागजागी मांडला

पाठराखा का मिळेना, का मिळेना सोबती
झुंजतांना एकला मी, श्वासही सुस्तावला

घेतले ओठात होते, सप्तकाचे सूर मी
साद ती बेसूर गेली, नाद ही मंदावला

संचिताचे खेळ न्यारे, पायवाटा रोखती
चालता मी "अभय" रस्ता, काळही भारावला

गंगाधर मुटे
............................................

गझल: 

प्रतिसाद

वा मुटेजी,

भांबावला जास्त आवडला..

चांगला प्रयत्न.

कैलासजी, अजयजी आभारी आहे.

गंगाधर जी,
रचना आवडली.चांगली गेय गझल म्हणता येईल.......

सर्वसाक्षी तू म्हणाला "सर्वमय आहेस तू"
हस्त माझा रेखतांना का असा भांबावला

हा शेर चांगला प्रभावीपणे उतरला आहे.