सूर्य माझ्या मागुनी येणार होता

जाहलेला जो कपाळी वार होता
तोच माझा मानलेला यार होता

घोषणा जो मागच्या विसरुन गेला
तो नवी आश्वासने देणार होता

हार माझी हीच त्याची जीत व्हावी
आज तो माझ्यापुढे जाणार होता

धूळ उडते चेहऱ्याच्या वाळवंटी
अश्रु माझा पापण्यांवर स्वार होता

दूषणांचे श्लोक त्याने वाचलेले
आजला तो आरत्या गाणार होता

आज ही खटला पुन्हा रेंगाळला तो
कालचा ज्याचा फैसला होणार होता

घेतले चंद्रास मग मी सोबतीला
सूर्य माझ्या मागुनी येणार होता

सोडली तू साथ माझी ठीक झाले
काय हा वेडा कवी देणार होता

गझल: 

प्रतिसाद

मक्ता मस्तच. गझल छानच.

अश्रू माझा पापण्यांवर स्वार होता >>> इथे काही मात्रांचा घोळ आहे का?

छान गझल.

छान गझल कैलास राव..

आज ही खटला पुन्हा रेंगाळला तो
कालचा ज्याचा फैसला होणार होता

इथे दुसर्‍या मिसर्‍यात ''काल ज्याचा फैसला होणार होता'' असे हवेय.

पुलेशु.

डॉ.कैलास

सुरेख गझल.

सोडली तू साथ माझी ठीक झाले
काय हा वेडा कवी देणार होता

अत्यंत आवडला हा शेर. याच अर्थाचा एक उर्दू शेर आहे, जो मला आत्ता आठवत नाहीये.
चित्तदा सांगू शकतील कदाचित. असो.

पुलेशु.

घेतले चंद्रास मग मी सोबतीला
सूर्य माझ्या मागुनी येणार होता....आशय आवडला.

सोडली तू साथ माझी ठीक झाले
काय हा वेडा कवी देणार होता.....एकदम सुरेख.

गझल आवडली.

आज ही खटला पुन्हा रेंगाळला तो
कालचा ज्याचा फैसला होणार होता

हा शेर

आज ही खटला पुन्हा रेंगाळला तो
काल ज्याचा फैसला होणार होता
असा वाचावा...
ह बा, गंगाधर मुटे, ज्ञानेश. निलेश कालुवाला धन्यवाद!!

कैलासजी...खुप खुप धन्यवाद ...तुमच्यामुळे रचना सफाईदार झाली.
आणी प्रकाशित होवू शकली...

सूर्य आणि घोषणा आवडले..
कपाळावरचा वार हाच मानलेला यार होता? अर्थ नाही कळला याचा...

आपण फार --तो,जो, हा .... वापरले आहेत,
रचना कमजोर वाटते,
मला वाटते शक्य झाल्यास अशी रचना टाळावी

घेतले चंद्रास मग मी सोबतीला
सूर्य माझ्या मागुनी येणार होता..

काळोख सोबतीला घेवुन मी निघालो
लाजून सुर्य आता मागून येत आहे....डबीर सर,

कल्पना सारखी वाटते ,
चित्तदा यावर आपले बोलणे काय?

घेतले चंद्रास मग मी सोबतीला
सूर्य माझ्या मागुनी येणार होता..

काळोख सोबतीला घेवुन मी निघालो
लाजून सुर्य आता मागून येत आहे....डबीर सर,

कल्पना सारखी वाटते ,
चित्तदा यावर आपले बोलणे काय?
मला उत्तर हवे आहे.

जाहलेला जो कपाळी वार होता
तोच माझा मानलेला यार होता

जे घाव खोल गेले ते यार मानिले मी ह्या कविवर्य सुरेश भटांच्या ओळीची आठवण झाली. अशा कल्पनांचे ह्या गझलेत पुनरागमन झालेले दिसते. ते नक्कीच टाळायला हवे. ज्ञानेश म्हणतात तो शेर मलाही वाचल्यासारखा वाटतो आहे पण आठवत नाही आहे. (आपल्याला आठवल्या नाही तरी इतरांना आठवणार नाहीत असेही नाही. ;) )

स्नेहदर्शन ह्यांनी डबिरांचा जो शेर सांगितला आहे त्यातली खालची ओळ तर फारच जवळची आहे. असो.

हे प्रयत्नपूर्वक टाळायला हवे, ह्याबाबत फार जागरूक असायला हवे असे वाटते. काही शब्दसमूह सारखे असू शकतात. पण शब्दसमूह आणि कल्पना दोहोंत साम्य नकोच.

चित्तदा..
जे घाव खोल गेले ते यार मानिले मी
हि रचना मि खरोखर वाचलेली नव्हती...योगायोगाने साम्य आले आहे.
यापुढे नक्किच टाळीन...
घेतले चंद्रास मग मी सोबतीला
सूर्य माझ्या मागुनी येणार होता..
यामध्ये कवीचा 'नाइलाज' आहे ( असहायता )खरेतर कवीला सूर्यास सोबत घेवुन जायचे होते. पण नाही म्हणुन चंद्र घेतला. सुर्य त्याच्या सवडीने येणार आहे...असा अर्थ घेवुन लिहीला आहे...

काळोख सोबतीला घेवुन मी निघालो
लाजून सुर्य आता मागून येत आहे....डबीर सर
हि प्रचंड तगडी रचना आहे. जास्त भिड्ते ...कारण
या रचनेत सुर्य नाइलाज म्हणुन कवीच्या मागोमाग येत आहे असा अर्थ आहे ना?

अशा दोन वेगवेगळ्या कल्पना वाटल्या..म्हणुन लिहिला आहे...काही शब्द सारखे झालेत नक्कीच
असे लिहु नये का? यावर मार्गदर्शन व्हावे...मला पुढे टाळ्ता येईल...धन्यवाद..!!