निराशा

आटला आहे किनारा आटली मोकाट आशा
मृगजळाच्या संगतीने राहतो आहे अताशा

बोचल्या कित्येक राती टोचली कित्येक नाती
पाहुनी खपली कुठेशी हासती जखमा जराशा

सोहळेही काय होते साजरे जे काय झाले
भाकरी कोंडा गिळूनी वाजला फुटकाच ताशा

खोल अंधारी तळाशी एकदा मज हाक आली
नाव मी पुसता तिला हसुनी म्हणाली 'मी निराशा'

दोर बांधूनी गळी मी नाचलो सांगेल तैसा
ओळखीचे चेहरे होते तिथे बघण्या तमाशा

गझल: 

प्रतिसाद

निराशा... तमाशा.. वा!

खोल अंधारी तळाशी एकदा मज हाक आली
नाव मी पुसता तिला हसुनी म्हणाली 'मी निराशा'

आवडला शेर.

सोहळेही काय होते साजरे जे काय झाले
भाकरी कोंडा गिळूनी वाजला फुटकाच ताशा

या शेरातील आशय फार छान आहे.पण पहिली ओळ आशयाला ठोसपणा आणत नाही असे वाटते.येथे दोनदा 'काय' शब्द निरर्थक वाटतो.

त्यापेक्षा असे केले तर कसे होईल...

सोहळेही काय होते साजरे जे काल झाले(केले)
भाकरी कोंडा गिळूनी वाजला फुटकाच ताशा

किंवा

सोहळाही काय होता साजरा जो काल केला
भाकरी कोंडा गिळूनी वाजला फुटकाच ताशा

मतला आणि निराशा हे शेर आवडले.
शुभेच्छा.

बोचल्या कित्येक राती टोचली कित्येक नाती
पाहुनी खपली कुठेशी हासती जखमा जराशा

-हा शेर मस्त.

आटला आहे किनारा आटली मोकाट आशा
मृगजळाच्या संगतीने राहतो आहे अताशा

-मतल्याची दुसरी ओळ उत्तम आहे.
मतल्यातली पहिली ओळ आणखी 'दुरुस्त' करता येईल.

गझल आवडली..
निराशा आणि ताशा जास्त आवडले!

सर्व जाण्कारांना धन्यवाद!!

पुढच्या वेळेस या सर्व सूचना लक्षात ठेऊन लिहीन.

बोचल्या कित्येक राती टोचली कित्येक नाती
पाहुनी खपली कुठेशी हासती जखमा जराशा

वा. खालची ओळ फारच सुरेख.


खोल अंधारी तळाशी एकदा मज हाक आली
नाव मी पुसता तिला हसुनी म्हणाली 'मी निराशा'

छान.

एकंदर छान. आशेसाठी मोकाट हे विशेषण आणि तिचे योग्य वाटले नाही. असो. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

धन्यवाद चित्तरंजन!

आशेला काही मर्यादाच नसतात. आशावादी राहून कित्येकदा आपण लोकांना नंतर निराश झालेलं बघतो. आशावादी असावं पण विचारपूर्वक. वाटेल त्या दिशेने धावणा-या आशांना मोकाट म्हणण्याचा प्रयत्न.

अभिप्रायाबद्दल धन्यवाद!

गझल आवडली. जखमा आणि निराशा खास!

वा.....छान जमलेय गझल..........

दोर बांधूनी गळी मी नाचलो सांगेल तैसा
ओळखीचे चेहरे होते तिथे बघण्या तमाशा
खरे आहे!
छान गझल!

क्रांति, मधुघट, अजय,

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!
:)