अंगार चित्तवेधी

अंगार चित्तवेधी

दे तू मनास माझ्या आकार चित्तवेधी
नजरेत गुंतणारा आजार चित्तवेधी

ती बोलली तरी का शब्दास नाद येतो
त्या बोलक्या स्वरांचे झंकार चित्तवेधी

नाहीच राग येतो, वाटे हवाहवासा
कानास पीळणारा फ़णकार चित्तवेधी

आभाळ गाठण्याची वेलीस हौस आहे
मिळतो कधीकधी तो आधार चित्तवेधी

दु:खास मांडणारे बाजार फ़ार झाले
दु:ख्खा खरेदणारा बाजार चित्तवेधी

आप्तास कौतुकाचा वर्षाव ही प्रथाची
इतरांस गौरवे तो आचार चित्तवेधी

आगीत खेळतांना, सुर्यास छेडतो मी
कोळून पी ’अभय’ ती अंगार चित्तवेधी

गंगाधर मुटे
---------------------------------------

गझल: 

प्रतिसाद

आप्तास कौतुकाचा वर्षाव ही प्रथाची
इतरांस गौरवे तो आचार चित्तवेधी

हा शेर आवडला.... छान गझल.

डॉ.कैलास

आप्तास कौतुकाचा वर्षाव ही प्रथाची
इतरांस गौरवे तो आचार चित्तवेधी

शेर आवडला.... गझल छान.

कैलासजी, ह.बा जी
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

ती बोलली तरी का शब्दास नाद येतो
त्या बोलक्या स्वरांचे झंकार चित्तवेधी
.
आप्तास कौतुकाचा वर्षाव ही प्रथाची
इतरांस गौरवे तो आचार चित्तवेधी

हे दोन शेर छान वाटले.

गंगाधरजी
प्रत्येक शेर अप्रतिमच आणी म्हणूनच मनात उतरलाय.
नुसतं उतरलाच नाही तर प्रतिसादाबद्दल म्हणतोय

संवाद साधण्याची माझी तऱ्हा निराळी
गझलेस हा दिला मी प्रतिसाद चित्तवेधी

एकदम चीत्तवेधी गझल बद्दल धन्यवाद
अवधूत

निलेशजी,अवधुतजी

प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

दे तू मनास माझ्या आकार चित्तवेधी
नजरेत गुंतणारा आजार चित्तवेधी
मतला छान.

आप्तास कौतुकाचा वर्षाव ही प्रथाची
शक्य झाल्यास अशी जुनी वळणे टाळावी.

धन्यवाद चित्तजी.

आभाळ गाठण्याची वेलीस हौस आहे..
मिळतो कधीकधी तो आधार चित्तवेधी..

आवडला. गझल छान.

बहरजी,
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

विचार चांगला आहे.

आभाळ गाठण्याची वेलीस हौस आहे

दु:खास मांडणारे बाजार फ़ार झाले

या सुट्या ओळी आवडल्या.

धन्यवाद अजयजी.