हा काळ हरामी मलाच गंडा घालून जातो

वाटेत भेटतो रोज मला धमकावून जातो
हा काळ हरामी मलाच गंडा घालून जातो

घुसतेच कशी हि घरात माझ्या तिरीप कोवळी
मी रोज घराची खिडक्या दारे लावून जातो

इथे मुक्याचे नाणे कधीही वाजत नाही
फक्त बोलका भाव नेहमी खावून जातो

मी देतो शिक्षा माझ्यामधल्या अपराध्याला
जो आरोप नेहमी माझ्यावरती ठेवून जातो

मी पुढे चाललो आहे कि परतीच्या वाटेवर
हा प्रश्न सारखा तुला मला भंडावून जातो

तो फक्त जमवतो जाहिरातींचे कपटे काही
अन पत्रकार मी खुशाल तरीही सांगून जातो

मी ऋण मानतो फक्त तयाचे माथी माझ्या
तो एक कवी जो काळाला ओलांडून जातो

गझल: 

प्रतिसाद

वृत्त तपासावे. वृत्तानुसार कवितेत ऱहस्व दीर्घ करायले हवे. जिथे दिसले तिथे केले आहे काही ठिकाणी वृत्तही तपासावे.

वाटेत भेटतो रोज मला धमकावुन जातो
हा काळ हरामी मलाच गंडा घालुन जातो

घुसतेच कशी ही घरात माझ्या तिरिप कोवळी
मी रोज घराची खिडक्या दारे लावुन जातो

इथे मुक्याचे नाणे कधीही वाजत नाही
फक्त बोलका भाव नेहमी खावून जातो
वृत्त तपासावे

मी देतो शिक्षा माझ्यामधल्या अपराध्याला
जो आरोप नेहमी माझ्यावरती ठेवून जातो
खालच्या ओळीतचे वृत्त तपासावे

मी पुढे चाललो आहे कि परतीच्या वाटेवर
वृत्त
हा प्रश्न सारखा तुला मला भंडावुन जातो

तो फक्त जमवतो जाहिरातींची कपटे काही
वृत्त
अन पत्रकार मी खुशाल तरिही सांगुन जातो

मी ऋण मानतो फक्त तयाचे माथी माझ्या
ऋण दीर्घ मानावे लागेल.
तो एक कवी जो काळाला ओलांडुन जातो

व्वा कैलास राव... हरेक शेर बंदा रुपाया.

... पण राव जरा वृत्त तपासून पहा.... काही ठिकाणी र्‍हस्व दीर्घात बदल करुन जमेल... पण बर्‍याच ठिकाणी शब्दही बदलावे लागतील....

व्याकरणाच्या घोळातून बाहेर या..... तुमच्यात एक खूप मोठा शायर दडल्याचे दिसत आहे.

डॉ.कैलास

तुमच्यात एक खूप मोठा शायर दडल्याचे दिसत आहे.... माझेही हेच मत आहे पण डॉक्टरांना (आमच्यासाठी गुरूजी) दिसले म्हणजे त्यानी खास दुर्बिनीतून बघितले असणार. मी दुसर्‍यांदा सांगतोय... लोकांना छळू नका... व्याकरणाच्या घोळातुन बाहेर या....

घुसतेच कशी हि घरात माझ्या तिरीप कोवळी
मी रोज घराच्या खिडक्या दारे लावुन जातो

अतिशय आवडल्या ह्या ओळी. वाव्वा.

सुंदर. आवडली.

घुसतेच कशी हि घरात माझ्या तिरीप कोवळी
मी रोज घराची खिडक्या दारे लावून जातो

इथे मुक्याचे नाणे कधीही वाजत नाही
फक्त बोलका भाव नेहमी खावून जातो

हे दोन आवडले...