...सारेच विसरू दे मला !
...सारेच विसरू दे मला !
बडवे, विठोबा, पंढरी...सारेच विसरू दे मला !
तेथे न माझी पायरी... ! सारेच विसरू दे मला !
काही तरी झंकारले...कोणी तरी हुंकारले...
आता सुनेपण अंतरी...सारेच विसरू दे मला !
ती रातराणी, चांदवा... गंधाळलेला गारवा...
ती पौर्णिमा जादूभरी...सारेच विसरू दे मला !
ऱडलीस तू माझ्यासवे...पुसलीस माझी आसवे...
ती सांत्वना अन् त्या सरी...सारेच विसरू दे मला...!
खचलो नकाराने तुझ्या...पिचलो विचाराने तुझ्या...
झाली जिण्याची मस्करी...सारेच विसरू दे मला !
स्वप्ने तुझी मी पाहिली...सारीच अर्धी राहिली...
ते शल्य, कळ ती बोचरी...सारेच विसरू दे मला !
माझी सखी, अभिसारिका...गेली कुठे ती राधिका ?
गेली कुठे ती बासरी...सारेच विसरू दे मला !
पोटास या कोंडा मिळो...झोपायला धोंडा मिळो...
कविता, कथा, कादंबरी...सारेच विसरू दे मला !
मज भोवती नाही कुणी, मज सोबती नाही कुणी...
नाही कुणी माझ्या घरी....सारेच विसरू दे मला !
वाऱ्यासवे मी भांडतो, छळ मी जगाचा मांडतो !
हे आळ जे माझ्यावरी...सारेच विसरू दे मला !
केला कुणी उपहासही...म्हटले कुणी `शाबास`ही...
निंदा-स्तुती खोटी-खरी...सारेच विसरू दे मला !
शहरात या उपऱ्यापरी...! माझ्यात मी दुसऱ्यापरी...!!
ते गाव...घर, ती ओसरी...सारेच विसरू दे मला !
आता मला सुटका हवी...मज पाहिजे दुनिया नवी...
आता तरी, आता तरी... सारेच विसरू दे मला !
करणार मी हाही गुन्हा....स्मरणार मी सारे पुन्हा...!
काही क्षणांसाठी परी....सारेच विसरू दे मला !!
- प्रदीप कुलकर्णी
प्रतिसाद
संतोष कुलकर्णी
शनि, 30/06/2007 - 23:48
Permalink
छान
आपल्या गझला छानच असतात. आळ, निंदा-स्तुती, घरी.. हे शेर आवडले!
चित्तरंजन भट
रवि, 01/07/2007 - 04:06
Permalink
वाव्वा!
मस्त गझल आहे.
काही तरी झंकारले...कोणी तरी हुंकारले...
आता सुनेपण अंतरी...सारेच विसरू दे मला
शहरात या उपऱ्यापरी...! माझ्यात मी दुसऱ्यापरी...!!
ते गाव...घर, ती ओसरी...सारेच विसरू दे मला !
आता मला सुटका हवी...मज पाहिजे दुनिया नवी...
आता तरी, आता तरी... सारेच विसरू दे मला !
करणार मी हाही गुन्हा....स्मरणार मी सारे पुन्हा...!
काही क्षणांसाठी परी....सारेच विसरू दे मला !!
त्यातही हे शेर फारच आवडले.
केदार पाटणकर
सोम, 02/07/2007 - 13:19
Permalink
वा
झकास..
संपूर्ण गझल प्यार झाली.
जयन्ता५२
सोम, 02/07/2007 - 15:52
Permalink
'ये नही है,ये नही है जिंदगी'
ही वेगळीच गझल ' आवारा' मधील 'ये नही है,ये नही है जिंदगी' ची आठवण करून देते.
मस्त!जियो
जयन्ता५२
सोनाली जोशी
मंगळ, 03/07/2007 - 00:17
Permalink
मस्त
गझल आवडली
पुलस्ति
मंगळ, 03/07/2007 - 09:43
Permalink
वा!
मस्त गझल!
-- पुलस्ति.
चक्रपाणि
बुध, 04/07/2007 - 11:49
Permalink
वाव्वा!!!
खूपच छान गझल. आवडली.
खचलो नकाराने तुझ्या...पिचलो विचाराने तुझ्या...
झाली जिण्याची मस्करी...सारेच विसरू दे मला !
स्वप्ने तुझी मी पाहिली...सारीच अर्धी राहिली...
ते शल्य, कळ ती बोचरी...सारेच विसरू दे मला !
माझी सखी, अभिसारिका...गेली कुठे ती राधिका ?
गेली कुठे ती बासरी...सारेच विसरू दे मला !
मस्त!!
- चक्रपाणि जीवन चिटणीस
सॅन होजे, कॅलिफोर्निया
विसुनाना
मंगळ, 10/07/2007 - 12:27
Permalink
वा!वा!
पूर्ण गझल आवडली.
प्रज्ञा
बुध, 11/07/2007 - 16:42
Permalink
सुंदर
अत्तिशय आवडली गझल.
माझी सखी, अभिसारिका...गेली कुठे ती राधिका ?
गेली कुठे ती बासरी...सारेच विसरू दे मला !
सुंदर
कुमार जावडेकर
शनि, 14/07/2007 - 23:59
Permalink
अप्रतिम
प्रदीप,
गझल अतिशय आवडली.
ोटास या कोंडा मिळो...झोपायला धोंडा मिळो...
कविता, कथा, कादंबरी...सारेच विसरू दे मला !
मज भोवती नाही कुणी, मज सोबती नाही कुणी...
नाही कुणी माझ्या घरी....सारेच विसरू दे मला !
वाऱ्यासवे मी भांडतो, छळ मी जगाचा मांडतो !
हे आळ जे माझ्यावरी...सारेच विसरू दे मला !
केला कुणी उपहासही...म्हटले कुणी `शाबास`ही...
निंदा-स्तुती खोटी-खरी...सारेच विसरू दे मला !
शहरात या उपऱ्यापरी...! माझ्यात मी दुसऱ्यापरी...!!
ते गाव...घर, ती ओसरी...सारेच विसरू दे मला
हे शेर विशेष. मधली यमकंही सुंदर आहेत.
मक्ताही सुंदरच आहे.
मतलाही आहे सुंदर; पण दुसर्या ओळीत
'सारेच विसरू दे मला' हे अनावश्यक (रिडंडंट) होतं असं वाटलं.. 'तेथे न माझी पायरी' ऐवजी ''का मी स्मरू ती पायरी'' असं एक सुचलं; पण ''तेथे न माझी पायरी"ही ओळ जास्त सुंदर आहे.
- कुमारं
ता.क.
हा संगणक मला अक्षरांबद्दल फार त्रास देतोय... टंकलेखनाची चूक झाली असल्यास कृपया क्षमस्व.