घट अमृताचा

घट अमृताचा

लपेटून चिंध्यात घट अमृताचा, न देखे कुणीही, शिवेना कुणी
लपेटून धोंड्यास शेंदूरवस्त्रे, अशी होय गर्दी, हटेना कुणी

किती वाटले छान हे गाव तेंव्हा, जरासा उडालो विमानातुनी
इथे मात्र मेले कुणीही दिसेना, तरी का तजेला दिसेना कुणी?

विषा प्राशणे सर्वथा गैर आहे, तया बोलती लोक समजावुनी
परी कारणांचा जरा शोध घ्यावा, अशी सुज्ञता दाखवेना कुणी

समाजात या हिंस्त्र भाषा नसावी, नसो स्थान लाठी व काठीस त्या
परी या मुक्यांची कळे भाव-भाषा, असे ज्ञान सत्तेस दे ना कुणी

भरारीस उत्तुंग झेपावतो मी, कवी कल्पनेला अभय गाठतो
परी वास्तवाने घरंगळत येता, उरे एक भूमी दुजे ना कुणी

गंगाधर मुटे
...........................................................................

गझल: 

प्रतिसाद

लपेटून चिंध्यात घट अमृताचा, न देखे कुणीही, शिवेना कुणी

या ओळीऐवजी

लपेटून चिंध्यात घट अमृताचा, घुरेना कुणीही, शिवेना कुणी

असे जास्त लयीत येते, पण घुरणे (म्हणजे न्याहाळणे) हा शब्द सर्वत्र प्रचलित आहे की नाही ते माहीत नाही.

समाजात या हिंस्त्र भाषा नसावी, नसो स्थान लाठी व काठीस त्या
परी या मुक्यांची कळे भाव-भाषा, असे ज्ञान सत्तेस दे ना कुणी

भरारीस उत्तुंग झेपावतो मी, कवी कल्पनेला अभय गाठतो
परी वास्तवाने घरंगळत येता, उरे एक भूमी दुजे ना कुणी

शेवटचे दोन्ही शेर आवडले.

घुरणे हा प्रचलीत शब्द नाही. तो शब्द तुमच्याकडे वापरतात का?
म्हणजे...
तो मला घुरत होता. त्याने तिला घुरले. असा वाक्यात प्रयोग करतात का?

तो मला घुरत होता. त्याने तिला घुरले. असा वाक्यात प्रयोग करत नाही.
पण त्याऐवजी
काहून घुरून राह्यला? असे म्हणतात.

डिक्श्नरीत नवा शब्द सामिल केला. चांगला शब्द आहे.
काहून घुरून राह्यला बे?

काहून घुरून राह्यला
याचा अर्थ काहीसा

कशाला डोळे विस्फारून पाहतोस
असा होतो.

तसेच बे हा शब्द वापरात असला तरी
त्यास उद्धटपणा मानला जातो.

जुनी माणसेही काबे ऐवजी, कागा, कागो, कारे, काहो, काजी असा वापर करतात.

आणि स्त्रियांना कायगं ऐवजी कावं,
तसेच स्त्रिया आपसात काये जसे की चालनये, येनये, जाणये अशा (पुर्वी) म्हणत.

कागे म्हणणे उद्धटपणा मानला जातो.

तसेच बे हा शब्द वापरात असला तरी
त्यास उद्धटपणा मानला जातो.

ते मला माहिती आहे गंगाधरजी.
जालण्यातील कवी मिंत्रांकडे एकदा कार्यक्रमास गेलो असता का बे... जा बे... असे शब्द चर्चेत ऐकले होते. आधी मला वाटायचं तो प्रेमळ हाक मारण्याचा प्रकार आहे... नंतर सत्य कळले.... पण तरी तो शब्द मला उद्दाम वाटत नाही.

जुनी माणसेही काबे ऐवजी, कागा, कारे, काहो, काजी असा वापर करतात.
: यापैकी कागा, कारे/का रं... हे सातारकरांचे(कराड) नेहमीचे शब्द आहेत. पण ते उध्दटपणे आणि शांतपणेही वापरले जातात.

लहान मुलांना कामा म्हणतात.

विदर्भ आणि देश... चालुद्यात!!! मी दोन्हीकडून आहे... हाहाहा!

माफ करा... गंगाधरजी... गझल मस्तंच झाली आहे. तुमचं बोलणं ऐकत बसलो एवढंच!

विषा प्राशणे सर्वथा गैर आहे, तया बोलती लोक समजावुनी
परी कारणांचा जरा शोध घ्यावा, अशी सुज्ञता दाखवेना कुणी

हा शेर आवडला.

गंगाधरजी,
मोठ्या व्रुत्त्तातील आपली गझल वाचताना जुन्या पीढीतील काही कवींच्या लिखाणाची आठवण येते.बरे वाटते.

कृपया मतला असा वाचावा.

लपेटून चिंध्यात घट अमृताचा, न देखे कुणीही, शिवेना कुणी
लपेटून चिंध्यास रेशीमवस्त्रे, अशी होय गर्दी, हटेना कुणी