'' बरे दिसत नाही ''

'' बरे दिसत नाही ''

गुडघ्यावरती तुझे रांगणे ,बरे दिसत नाही
पुन्हा पुन्हा हे तुला सांगणे,बरे दिसत नाही

'' 'गझल' न्यायची पुढे'' तू हे खुंटीला बांधून घे
स्वता त्याच खुंटिस टांगणे,बरे दिसत नाही

पृथ्वी फिरणे,सूर्य उगवणे,तुझ्यामुळे नाही
वेळि अवेळि तुझे बांगणे,बरे दिसत नाही

चौकट '' बाराखडी'' आपली,समजुनी घे इतुके
चौकटितुनी दूर पांगणे,बरे दिसत नाही

प्रणयासाठी चित्तही चळते,दुनिया हे जाणे
तुझे त्यात असले लोटांगणे,बरे दिसत नाही

खळखळाट करणारा साधा झराच तू आहे
तुडुंब दर्यागत अथांगणे ,बरे दिसत नाही

किती किती पाहिली उधाणे,ह्या '' कैलासा''ने
त्यामधले हे तुझे भांगणे,बरे दिसत नाही.

डॉ.कैलास गायकवाड

गझल: 

प्रतिसाद

कैलासजी,
अल्टीमेट! लयभारी!!

पृथ्वी फिरणे,सूर्य उगवणे,तुझ्यामुळे नाही
वेळि अवेळि तुझे बांगणे,बरे दिसत नाही
(हा शेर वाचल्याबरोबर माझ्या नजरेस मोर कोंबडा आला पण लगेच गायब झाला/शेर आणखी प्रभावी झाला असता)
चौकट '' बाराखडी'' आपली,समजुनी घे इतुके
चौकटितुनी दूर पांगणे,बरे दिसत नाही

हे दोन शेर विषेश आवडले.

"प्रणयासाठी चित्तही चळते" म्हणजे काय? प्रणयासाठी आधि चित्तच चळावे लागते. बाकीच सगळं नंतर.....

शुभेच्छा!!!

गझल मधे गझलियत नाही
पाण्यामधे ओलावा नसल्यासारख....
शिकायची तैयारी असेल तर आधी खुप वाचा..मगच गझल लेखनी हातात घ्यावी..
वाईट वाट्ल्यास आत्मावलोकन करावे.
आपला शुभेच्छुक

कैलासजी,
हे पुढील तीन शेर विषेश आवडले.('' 'गझल' न्यायची पुढे'' तू हे खुंटीला बांधून घे-ही सुरेख ओळ.)

'' 'गझल' न्यायची पुढे'' तू हे खुंटीला बांधून घे
स्वता त्याच खुंटिस टांगणे,बरे दिसत नाही

पृथ्वी फिरणे,सूर्य उगवणे,तुझ्यामुळे नाही
वेळि अवेळि तुझे बांगणे,बरे दिसत नाही

चौकट '' बाराखडी'' आपली,समजुनी घे इतुके
चौकटितुनी दूर पांगणे,बरे दिसत नाही

येऊद्यात गझला आणखी.....त्यासाठी शुभेच्छा!

पृथ्वी फिरणे,सूर्य उगवणे,तुझ्यामुळे नाही
वेळि अवेळि तुझे बांगणे,बरे दिसत नाही

हा छान शेर आहे.
'' 'गझल' न्यायची पुढे'' तू हे खुंटीला बांधून घे
म्हणजे?

हबा आणी निलेश... आपले खूप आभार..... या गझलेत बर्‍याच त्रुटी आहेत.. असो....
पुढची गझल लवकरच येतेय निलेश...

डॉ.कैलास

गझल कुणाला उद्देशून नसते. लावणी, अभंग असे काही काव्यप्रकार तसे असू शकतात / असतात.

बाकी आपण सुज्ञ आहांत...... आणि कुणी तरी म्हटलेच आहे.... सुज्ञांस अधिक सांगणे न लगे.

डॉ.कैलास

समुद्रास खूप मोठि भरती येते त्याला ''उधाण'' असे म्हणतात.आणि अशी ओहोटी की जेव्हा सर्वांत कमी पाणि खाडीत शिरते त्यास '' भांग '' असे म्हणतात.यानुसार भांगणे हे क्रियापद वापरले आहे.

बाकी आपल्या प्रतिसादाने आनंद वाटला.

डॉ.कैलास

अभिजीतराव... "तुझे" चे उत्तर पुढच्याच ओळीत आहे बघा!!

मलाही माफ करा!!

कैलास,
तुमच्याकडे विविध चांगल्या कल्पना आहेत.
भाषा ओघवती राहील, याकडे लक्ष द्यावे.

धन्यवाद केदार जी,
आपली सूचना मी '' खुंटीस'' बांधून घेतली.
मनःपूर्वक धन्यवाद.

डॉ.कैलास

@ बापू,

'' 'गझल' न्यायची पुढे'' तू हे खुंटीला बांधून घे

म्हणजे,गझल हा काव्य प्रकार वैभवास न्यायचा हि गोष्ट नीट लक्षात ठेव.... अशा अर्थाची ओळ.

प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.