पोचुनी दारी तुझ्या


पोचुनी दारी तुझ्या मी परत जायचे
मी असे आता कितीदा करत जायचे?


रेखतो चित्रे अनोखी तो सभोवती
त्यांत केवळ रंग आपण भरत जायचे...


किर्र काळोखात बुडल्या दशदिशा, तरी
स्वप्न किरणांचे उराशी धरत जायचे!


(शुष्क पर्णासारखा गेलो गळून; पण -
सांग कुठवर जीवनी मी तरत जायचे?)


रोज मृत्यूच्या दिशेने वाटचाल; पण
हसत-खेळत रोज थोडे मरत जायचे


जीवनाने, अनुभवाने शिकवले, तरी
गुरुजनांचे शिकवणेही स्मरत जायचे!


- कुमार जावडेकर, मुंबई

गझल: 

प्रतिसाद

कुमार,
मस्त गझल...
पोचुनी दारी तुझ्या मी परत जायचे
मी असे आता कितीदा करत जायचे?

रेखतो चित्रे अनोखी तो सभोवती
त्यांत केवळ रंग आपण भरत जायचे...

किर्र काळोखात बुडल्या दशदिशा, तरी
स्वप्न किरणांचे उराशी धरत जायचे!
हे शरे विशेष आवडले...साधी, सोपी, छान गझल...

कुमार, मतला आणि गुरुजन फार आवडले!!
त्यांत केवळ रंग आपण भरत जायचे...मधे "केवळ" ऐवजी "उमदे" किंवा "फक्कड" वापरले तर एक जरा वेगळा मूड येईल. आहे तो मिसराही अर्थात छानच आहे..
गझल आवडली!
-- पुलस्ति.

रोज मृत्यूच्या दिशेने वाटचाल; पण
हसत-खेळत रोज थोडे मरत जायचे
छान! (अर्थात सगळी गझलच छान आहे...!)

पूर्णपणे सहमत.

पुलस्ति,
बदल सुचवल्याबद्दल धन्यवाद. 'उमदे' / 'फक्कड' ही आवडले. पण, शेरातला मला अभिप्रेत असलेला अर्थ असा -
'अनोखी (सुंदर) चित्रं त्यानं (आधीच) रेखलेली असतात; आपण फक्त त्यात आपल्या परीनं रंग भरायचे. आपला सहभाग केवळ खारीचा / नाममात्र असतो; 'तो' (त्याची कलाकृती) जास्त महत्त्वाचा.' मी मूळ गझलेत 'त्यात थोडे रंग...' असं लिहिलं होतं; नंतर 'केवळ' हा शब्द सुचला.
'उमदे/फक्कड' मधे आपण तितकेच किंवा जास्त महत्त्वाचे होतो - ते मला थोडंसं टाळावंसं वाटतं.
- कुमार