मी जरा बोलायला गेलो कुठे

वाटले मजला जरी साधेच हे
भोवती होते कठीणच पेच हे

ऐकताना का कुणी गुंगू नये?
बोलणे आहे तुझे दिलखेच हे

घेतलाना आरशाचा गुण कुणी
माणसाला माणसांचे पेच हे

हेच क्रांती घडवतील नवी उद्या
माणसांचे काफिले साधेच हे

ठार केले तू मला तेव्हा तरी
राहिले माझे ठसे मागेच हे

मी जरा बोलायला गेलो कुठे
ओठ अन तू टेकले हलकेच हे

भाव द्यावा हा किती पैशास या?
शेवटी धातूतले नाणेच हे

राहते बाकी कुठे काहीतरी
नेहमी होतात अन वांधेच हे

निलेश कालुवाला.

गझल: 

प्रतिसाद

व्वा निलेश....
चांगली रचना.....
सगळेच शेर मस्त....

घेतलाना आरशाचा गुण कुणी
माणसाला माणसांचे पेच हे

या शेरात ''आरशाचा घेतला गुण ना कुणी''
असा बदल सुचवावासा वाटतो.

डो.कैलास

"शेवटी धातूतले नाणेच हे.." ,"राहते बाकी कुठे काहीतरी.." असे काही शेर छान आहेत.
चांगली, सफाईदार गझल.

पुढील लेखनास शुभेच्छा.

हेच क्रांती घडवतील नवी उद्या
माणसांचे काफिले साधेच हे
गझल चांगली.

होय क्रांती घडवतील नवी उद्या

कैलासजी ,
प्रतिसादाबद्दल अन सुचनेबद्दल आभार.

घेतलाना आरशाचा गुण कुणी
माणसाला माणसांचे पेच हे
आपण या शेरात सुचविलेल्या( ''आरशाचा घेतला गुण ना कुणी'' )बदलाशी मी सहमत आहे.मात्र या शेराचे संपादन कसे करावे ते समजत नाही.
संपूर्ण गझलेचे पुर्नलेखन करून गझल पुन्हा पोस्ट करावी लागेल असे वाटते.

ज्ञानेशजी,ह.बा.जी,वामनजी प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

अनंतजी,
शेर यमकाना धरुन आले आहेत असं वाटत नाही का ... ? कदाचित आले असतीलही.मात्र तसा प्रयत्न नव्हता.पुढे काळजी घेईन.प्रतिक्रियेबद्दल आभार.

मी जरा बोलायला गेलो कुठे - शीर्षक फार सुंदर!

भूषणजी,
धन्यवाद!

सुन्दर प्रयत्न. पीकेल...

छान गझल.

मनोजजी,
गंगाधरजी,
मनापासुन धन्यवाद!