देशील मला तू अश्रू....

देशील मला तू अश्रू.... मज हे ठावुक नव्हते
मी हसतच दु:ख पचवले, तुला हे जमले नसते

मी सजवित होतो स्वप्नं जरी माझ्या भवताली
जे स्वप्नं जयाचे असते, ते तर त्याला मिळते

मी एक-एक टाक्याने विणले, वस्त्र मनाचे
उशीराच कळाले, काळ लोटता रेशीम विरते

तू तुला विसरुनी गेलीस परदेशात युगांच्या
ये पुन्हा परतुनी, गाव तुझे अजुनी तळमळते

हा छंद तुझा ना तुला कुठेही पोहचवणारा
अन् मार्ग संपता, आयुष्य रेंगाळत बसते

पाऊलखुणा ज्या सोडून आलो आपण मागे
दे लक्ष जरा, ती वाट रोज बोलावत असते

ये फिरुन मनाच्या पारावरती पुन्हा एकदा
किलबिलाटात ही मैफल आयुष्याची सजते

-जनार्दन केशव म्हात्रे
म्हात्रे निवास, गांधी नगर, जुना बेलापूर रोड,
कळवा-ठाणे ४००६०५. भ्रमणध्वनी: ९३२३५५५६८८

गझल: 

प्रतिसाद

मतला आवडला.

डॉ.कैलास

पाऊलखुणा ज्या सोडून आलो आपण मागे
दे लक्ष जरा, ती वाट रोज बोलावत असते

ही व्दिपदी आवडली.

निलेश कालुवाला.

हा छंद तुझा ना तुला कुठेही पोहचवणारा
अन् मार्ग संपता, आयुष्य रेंगाळत बसते

क्या बात है.

उशीराच कळाले, काळ लोटता रेशीम विरते

ही एक ओळ आवडली.

कैलास, निलेश, गौरवकुमार, ह बा सर्वांचे मनापासून धन्यवाद....