अजूनही
खट्याळ, गोड, लाजरा..अजूनही
तुझा मनात चेहरा..अजूनही
अजाणताच मी सुगंध प्राशला
मनात तोच मोगरा..अजूनही
तहान भागली कुठे जिवातली?
मला हवा तुझा झरा..अजूनही
मनास कैद जो करून ठेवतो
नसे जगात पिंजरा..अजूनही
तुझ्याच स्वागतास सज्ज साजणे
पहा, तयार उंबरा..अजूनही
इथे तनू शहारते अजूनही
इथे समीर बोचरा..अजूनही
गझल:
प्रतिसाद
नितीन
शनि, 16/06/2007 - 14:29
Permalink
अतिशय सुंदर
खट्याळ, गोड, लाजरा..अजूनही
तुझा मनात चेहरा..अजूनही
मनास कैद जो करून ठेवतो
नसे जगात पिंजरा..अजूनही
छान... सुंदर गझल... पुढच्या गझलेस शुभेच्छा....!
प्रदीप कुलकर्णी
शनि, 16/06/2007 - 17:17
Permalink
छान.......
छान.......
मनास कैद जो करून ठेवतो
नसे जगात पिंजरा..अजूनही
सुंदरच...!
मनापासून शुभेच्छा... !
...................................
चित्तरंजन भट
रवि, 17/06/2007 - 01:49
Permalink
मस्त
वा. सुंदर, साफ गझल आहे.
तहान भागली कुठे जिवातली?
मला हवा तुझा झरा..अजूनही
मनास कैद जो करून ठेवतो
नसे जगात पिंजरा..अजूनही
केदार, फार सुंदर गझल.
अजून येऊ दे.
चित्तरंजन
बंडखोर
रवि, 17/06/2007 - 01:55
Permalink
पाटण्कर साहेब
मस्त गजल आहे.
अजाणताच मी सुगंध प्राशला
मनात तोच मोगरा..अजूनही
तहान भागली कुठे जिवातली?
मला हवा तुझा झरा..अजूनही
मनास कैद जो करून ठेवतो
नसे जगात पिंजरा..अजूनही
आणखी गझला येऊ द्यात.
उदय नावलेकर
रवि, 17/06/2007 - 02:16
Permalink
सुंदर गझल
अक्खी गझल आवडली
माणिक जोशी
सोम, 18/06/2007 - 06:36
Permalink
मस्त !
आवडली. छोटी पण मस्त कलाकृती.
धोंडोपंत
शुक्र, 22/06/2007 - 21:49
Permalink
वा केदारराव
वा केदारराव,
अप्रतिम ग़ज़ल. उत्तम.
तहान भागली कुठे जिवातली?
मला हवा तुझा झरा..अजूनही
क्या बात कही है !! सुंदर
आपला,
(तृषार्त) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
चक्रपाणि
शनि, 23/06/2007 - 11:18
Permalink
छान गझल
गझल चांगली आहे. आवडली.
मनास कैद जो करून ठेवतो
नसे जगात पिंजरा..अजूनही
तुझ्याच स्वागतास सज्ज साजणे
पहा, तयार उंबरा..अजूनही
मस्त!
- चक्रपाणि जीवन चिटणीस
समीर चव्हाण (not verified)
मंगळ, 26/06/2007 - 13:48
Permalink
सुंदर गझल
केदार पाटणकर
शुक्र, 12/12/2008 - 21:14
Permalink
नवा शेर
गेल्या वर्षी स्थळावर लिहिलेल्या या गझलेत नवा शेर लिहिला आहे. नवा शेर शेवटी आहे.
सुनेत्रा सुभाष
शनि, 13/12/2008 - 09:08
Permalink
गोड गझल
मा.केदार,
मला सुचलेला शेर,
कधी कळेल सांगना साजणा?
किती मनात चेहरे अजूनही
केदार पाटणकर
शनि, 13/12/2008 - 16:18
Permalink
सुनेत्रा,ध
सुनेत्रा,
धन्यवाद.
आपला शेर चांगला आहे पण,
माझ्या मूळ गझलेत रा असे रदीफच्या अलीकडचे अक्षर आहे.
आपल्या शेरात अक्षर रे आहे.
सुनेत्रा सुभाष
सोम, 15/12/2008 - 10:23
Permalink
क्षमा
मा.केदार,
दुसरी ओळ आता पहा,
फुलेल का मोगरा अजूनही
पिंजरा,काफिया आवडला.
सौरभ आपटे
सोम, 15/12/2008 - 18:16
Permalink
भावगीत!
पिंजरा अन अगदी थोड्याफार प्रमाणात झरा हा शेर सोडले तर अगदी नव्या शेरासकट ही रचना म्हणजे एक भावगीत आहे याची दखल घ्यावी.
अहंकारी
गुरु, 18/12/2008 - 01:13
Permalink
अनावश्यक!
खट्याळ, गोड, लाजरा..अजूनही
तुझा मनात चेहरा..अजूनही
अजूनही या रदीफेचा संबंध नाही. उगाच घेतली आहे.
अजाणताच मी सुगंध प्राशला
मनात तोच मोगरा..अजूनही
तहान भागली कुठे जिवातली?
मला हवा तुझा झरा..अजूनही
भरतीचा शेर!
मनास कैद जो करून ठेवतो
नसे जगात पिंजरा..अजूनही
तुझ्याच स्वागतास सज्ज साजणे
पहा, तयार उंबरा..अजूनही
पहा या शब्दाचा संबंध नाही. तसेच तुझ्याच मधल्या 'च' चा काहीही संबंध नाही. पहा च्या ऐवजी 'असे', 'प्रिये', 'करे' वगैरे काहीही चालू शकते.
'स्वागतास' ऐवजी पावलास का म्हणू नये?
ही गझलेवरची चर्चा आहे. प्रत्येक शब्दाचे एक प्रयोजन असते. तो शब्द काढून दुसरा घातला की अर्थ बदलायलाच पाहिजे. बदलला नाही तर तो शब्द अनावश्यक आहे असे गझलकाराने मानायला पाहिजे.
नवा शेर इथे तनू शहारते अजूनही
इथे समीर बोचरा..अजूनही
केदार पाटणकर
शुक्र, 19/12/2008 - 11:02
Permalink
आदरणीय
आदरणीय अहंकारी साहेब,
१. अजूनही ची गरज - जेव्हा ती व तो जवळ होते, भेटत होते तेव्हा तिचा चेहरा खट्याळ, गोड, लाजरा होता. आता ती दूर गेलेली आहे. (कोणत्या कारणास्तव दूर गेली आहे, हा प्रश्न अप्रस्तुत.) सध्या तिचा चेहरा कसा आहे, याची कल्पना त्याला नाही. (जीवनसंघर्षात कदाचित् तिचा चेहरा कोमेजून गेला असावा, असा तर्क त्याने बांधला आहे.)
तिचा चेहरा अजूनही , एका जमान्यानंतरही त्याच्या मनात आहे. नुसताच आहे असे नाही तर तो अजूनही खट्याळ, गोड, लाजरा आहे. (प्रत्यक्षात कसा आहे, याचा विचार कवी सोयीस्कररीत्या करीत नाही. तसा विचार करून स्वतःच्या मनाला अकारण दुःखात ढकलण्याची त्याची इच्छा नाही. त्यापेक्षा कल्पनेतल्या चेह-याभोवती मन गुंतवून ठेवणे अधिक अानंद देणारे आहे. कल्पनेतल्या चेह-याला धक्का लावण्याची त्याची इच्छा नाही.)
२. च ची गरज - कवीकडचा उंबरा तिच्याच आणि केवळ तिच्याच स्वागतासाठी अासुसलेला आहे. कोणीही आले तरी उंबरा स्वागत करेल, असे नाही. च चे हे प्रयोजन आहे.
स्वागत करण्याची इच्छा कवीची आहे, पण उंब-यावर मानवी भावनांचे आरोपण केलेले आहे.
एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा. उंब-याचे नियोजन हेतुतः शेरात केले आहे. उंबरा हे घरातले एक असे स्थान असते, जिथे सतत मानवी शरीराचा संबंध येतो. घरातला दुसरा कोणताही भाग क्वचित् असा असतो. उंब-याला पावलांची सवय झालेली असते (अाणि ती पावलं जर कवीच्या विशेष व्यक्तीची असतील तर त्या उंब-याचेही ऋणानुबंध पावलांशी जुळतील तर नवल ते काय?)
३. पावलास - स्वागतास ऐवजी पावलास घेतले तर शेर किंचित बदलावा लागेल. तूर्त, तो शब्द अर्थाच्या दृष्टीने बसत नाही.
सूचना विचाराधीन.
४. पहा- प्रिये शब्द योग्य नाही. साजणे शब्द वर घेतला आहे.
असे शब्दाला हरकत नाही.
पहा शब्दाचे प्रयोजन -
एक अर्थ - तूर्त, ती कवीपासून दूर आहे. तो तिला सांगू इच्छितो की, जरी तू कितीही दूर गेलीस तरी तुझ्या स्वागताला माझ्या घराचा उंबरा नेहमीच तयार आहे. तयार असलेला उंबरा माझ्या डोळ्यांना दिसत आहे. दु्र्देेवाने, तुला दिसत नाही. (किमान माझ्या डोळ्यांनी तरी तो तू पहा. (माझ्या डोळ्यांनी पहायचे असेल तर आपली मनं एकरूप झालेली असली पाहिजेत.त्यानिमित्ताने तू माझ्या किती जवळ आहेस हे सिध्द होईल.)
दुसरा अर्थ- उंबरा तयार आहे, याचा पुरावा तुला हवा असेल तर माझ्या घरी ये. उंबरा तयार आहे की नाही, हे पाहण्यासाठी तरी तुला घरी यावेच लागेल.
धन्यवाद.
केदार पाटणकर
मंगळ, 22/09/2009 - 15:05
Permalink
नवा शेर.. धुवून काढले घरास,
नवा शेर..
धुवून काढले घरास, पण तरी
धुळीत एक कोपरा..अजूनही !
क्रान्ति
बुध, 23/09/2009 - 09:04
Permalink
मनास कैद जो करून ठेवतो नसे
मनास कैद जो करून ठेवतो
नसे जगात पिंजरा..अजूनही
धुवून काढले घरास, पण तरी
धुळीत एक कोपरा..अजूनही !
वा! सही!
चित्तरंजन भट
गुरु, 24/09/2009 - 01:34
Permalink
धुवून काढले घरास, पण
छान.
राहिला केर काढायचा
काळजाचे किती कोपरे !
हा शेर आठवला.
अहंकारी
रवि, 04/10/2009 - 10:03
Permalink
तुमचे म्हणणे पटले केदारराव!
तुमचे म्हणणे पटले केदारराव!