राहिले माझेतुझे नाते घसाऱ्यासारखे
राहिले माझेतुझे नाते घसाऱ्यासारखे
भेटतो भेटावयाला पण चुकाऱ्यासारखे
लागला मौनातल्या वाटेवरी वाडा तुझा
आणि काही शब्द मातीच्या ढिगाऱ्यासारखे
याद आली श्रावणाची त्या तुझ्यामाझ्या पुन्हा
जाहले काळीज मोराच्या पिसाऱ्यासारखे
या तुझ्या शहरात सारी माणसांची जंगले
रात इथली पारधी, दिनही शिकाऱ्यासारखे
लाभली होतीस क्षणभर तू सुगंधासारखी
हुंदडावे वाटले आजन्म वाऱ्यासारखे
मी कधी करणार नव्हतो पापण्या ओल्या मुळी
दुःखही माझ्यापुढे आले भिकाऱ्यासारखे
एवढ्या खोलात माझी चौकशी करतेस का?
ह्रदय का हे सातबाराच्या उताऱ्यासारखे?
जीवना आतातरी देशील का पत्ता तुझा?
खेळतो आहे कधीचे मी जुगाऱ्यासारखे
डायरीमध्ये तुझा उल्लेखही नव्हता तरी
एक कोरे पान का हलते शहाऱ्यासारखे?
तारका, आकाशगंगा, चंद्र, उल्कांच्या सरी
शेवटी ब्रह्मांडही माझ्या पसाऱ्यासारखे
— चित्तरंजन भट
[ही गझल ह्याआधी मनोगत ह्या संकेतस्थळावर आणि विदर्भ सकाळच्या दिवाळी अंकात २००५ साली प्रसिद्ध झाली आहे.]
गझल:
प्रतिसाद
प्रमोद हरदास
मंगळ, 26/06/2007 - 12:18
Permalink
फार छान
लाभली होतीस क्षणभर तू सुगंधासारखी
हुंदडावे वाटले आजन्म वाऱ्यासारखे
हा शेर फार आवडला...
समीर चव्हाण (not verified)
मंगळ, 26/06/2007 - 13:47
Permalink
पूर्ण गझलच जबरदस्त आहे
भन्नाट
प्रदीप कुलकर्णी
मंगळ, 26/06/2007 - 19:06
Permalink
जबरदस्त...!
काय म्हणू...? एकच शब्द - जबरदस्त !
प्रदीप कुलकर्णी
मंगळ, 26/06/2007 - 19:07
Permalink
सगळेच्या सगळेच शेर आवडले...
सगळेच्या सगळेच शेर आवडले...
कुमार जावडेकर
बुध, 27/06/2007 - 18:24
Permalink
सुंदर
वा चित्तोपंत,
लागला मौनातल्या वाटेवरी वाडा तुझा
आणि काही शब्द मातीच्या ढिगाऱ्यासारखे.. वा!
ब्रह्मांड पसार्यासारखे - सुंदर!!!!
- कुमार
संतोष कुलकर्णी
शनि, 30/06/2007 - 02:16
Permalink
क्या बात है
बहोत खूब..!
डायरी, मौनातला वाडा, सुगंध, शहारा... हे शेर अफलातून्....शहार्यासारखे....,वार्यासारखे....!!
श्रावण
गुरु, 26/07/2007 - 09:48
Permalink
जबरदस्त !
खूपच आवडली !
अजय अनंत जोशी
शनि, 04/10/2008 - 18:36
Permalink
जबरदस्त.
लागला मौनातल्या वाटेवरी वाडा तुझा
आणि काही शब्द मातीच्या ढिगाऱ्यासारखे
तारका, आकाशगंगा, चंद्र, उल्कांच्या सरी
शेवटी ब्रह्मांडही माझ्या पसाऱ्यासारखे
सर्वच खास.
कलोअ चूभूद्याघ्या
मानस६
रवि, 05/10/2008 - 10:29
Permalink
लाभली होतीस..
लाभली होतीस क्षणभर तू सुगंधासारखी
हुंदडावे वाटले आजन्म वाऱ्यासारखे
मी कधी करणार नव्हतो पापण्या ओल्या मुळी
दुःखही माझ्यापुढे आले भिकाऱ्यासारखे
जीवना आतातरी देशील का पत्ता तुझा?
खेळतो आहे कधीचे मी जुगाऱ्यासारखे
डायरीमध्ये तुझा उल्लेखही नव्हता तरी
एक कोरे पान का हलते शहाऱ्यासारखे?.. हे सर्व अप्रतिम शेर...
-मानस६
तिलकधारीकाका
सोम, 06/10/2008 - 09:45
Permalink
असे करू नये.
चित्तरंजन,
असे करू नये. इतक्या चांगल्या गझला रचणे म्हणजे मार्केट यार्डात तोतापुरी आंबे विकत घेऊन घरी यावे तर त्यात अचानक एक देवगढ हापूस निघावा व त्यावरून मुलांमधे भांडणे व्हावीत तसे आहे की नाही? इतक्या छान गझलेत 'सहारा' हा काफिया सोडणे म्हणजे लाडू, जिलबी, बासुंदी, जुलाबजाम करून श्रीखंड करायला विसरण्यासारखे आहे की नाही?
ज्ञानेश.
सोम, 06/10/2008 - 10:14
Permalink
अप्रतिम...
जाहले काळीज मोराच्या पिसाऱ्यासारखे...
हुंदडावे वाटले आजन्म वाऱ्यासारखे...
दुःखही माझ्यापुढे आले भिकाऱ्यासारखे...
कलिजा खलास करणा-या ओळी.