...आहेस कुठे तू ?


...आहेस कुठे तू ? 


तुझी काहीच खबर नाही...आहेस कुठे तू ?
तुझे ठावे न कुशल काही...आहेस कुठे तू ?


किती मी जाचक मज झालो...ये मुक्त कराया...
किती हा धाक... दडपशाही...आहेस कुठे तू ?
 
कुठेही जीव रमत नाही...मी काय करावे ?
तुला जाणीव नच जराही...आहेस कुठे तू ?


किती मी आत जळत राहू...? बाहेर उन्हाळा...!
कशी लाहीत परत लाही...आहेस कुठे तू ?


असा बंदिस्त, कळत नाही, झालास कसा तू ?
दिशांचा प्रश्न सतत दाही...`आहेस कुठे तू ?`


तुझा शोधून मिळत नाही का ठावठिकाणा ?
कशी माझीच विवशता ही...आहेस कुठे तू ?


`तुला सोडून परत नाही जाणार कुठे मी`
- मला दे हीच परत ग्वाही...! आहेस कुठे तू ?


तुझ्यावाचून तरल व्हावे आयुष्य कसे हे...?
पुन्हा ये... जन्म कर प्रवाही...आहेस कुठे तू ?


कुठे आहेस ? कणव नाही काहीच तुला का...?
अता ये धावत लवलाही...आहेस कुठे तू ?


- प्रदीप कुलकर्णी
...............................


गझल: 

प्रतिसाद

तुझी काहीच खबर नाही...आहेस कुठे तू ?
तुझे ठावे न कुशल काही...आहेस कुठे तू ?
वा! रदीफ आणि वृत्त वेगळे आहे. लयीत म्हणताना थोडाशी अडचण होते आहे. गझल आवडली.

तुझ्यावाचून तरल व्हावे आयुष्य कसे हे...?
पुन्हा ये... जन्म कर प्रवाही...आहेस कुठे तू ?
सुंदर...!

प्रदीप,
'आहेस कुठे तू' ही रदीफही फार आवडली.
किती मी जाचक मज झालो...ये मुक्त कराया...
किती हा धाक... दडपशाही...आहेस कुठे तू ? - वा!
'ग्वाही', 'प्रवाही' सुद्धा अप्रतिम.
'तुला जाणीव नच जराही...आहेस कुठे तू ' या ओळीत 'नच' ऐवजी 'ना' वापरावं, असा एक छोटासा बदल सुचवावासा वाटला (अर्थात हे व्यक्तिसापेक्ष आहे).
- कुमार

कुमार, धन्यवाद...
गझल  अक्षर गणवृत्तात असल्याने  नच लिहिले आहे...मात्रावृत्तात असती तर नाला बिलकूलच ना नव्हती...!!!  तू दिलेली दाद, दिलेला प्रतिसाद आणि सुचविलेला बदल याबद्दल मनापासून आभार.

प्रदीप,
खरंय... 'नच' हेच अक्षरगणवृत्ताच्या दृष्टीनं बरोबर आहे.... माझ्या आधीच्या प्रतिसादाच्या वेळी लक्षात आलं नाही. (बहुतांशी गझलांत - माझ्यासकट) दोन लघूंचा एक गुरू केलेला असतो - तसंच वाटलं होतं. कृपया क्षमस्व!
- कुमार