खरे तर दार वा-याने...
गझलकार अनिल कांबळे यांच्या एका गझलेचा मतला मला खूप आवडतो.
खरे तर, दार वा-याने जरासे वाजले होते
कितीदा तूच आल्याचे मनाला वाटले होते...
...खरं तर वा-यानेच दार वाजलं होतं, वाजत होतं पण तूच आलीस असं प्रत्येकवेळेला वाटत होतं. हं...तू येणार नाहीस हे मला पक्कं ठाउक आहे पण माझं वेडं मन तुझीच वाट पाहात असतं आणि याची कबुली ते कळत-नकळत देतही असतं..
हा शेर जेव्हा प्रथम वाचनात आला तेव्हा मला उर्दू गझलांच्या वातावरणात गेल्यासारखे वाटले. शायराचं घरी एकटं असणं आणि त्याने केलेल्या त्या एकटेपणाच्या काळाचं चित्रण उर्दू शेरांमधून वाचलं होतं. त्यावेळी मराठी गझल नुकताच लिहू लागलो होतो आणि मराठी गझलांपेक्षा तेव्हा उर्दू गझलांचं वाचन अंमळ जास्तच झालं होतं. या पार्श्वभूमीवर हा मतला मला फारच भावून गेला.
अतिशय साधे शब्द घेऊन हा मतला उतरलेला आहे. दार वाजत आहे पण जरासंच. वा-याचा कापसापेक्षाही हलकाच झोत आहे तो. एखाद्याची चाहूल लागताना हवेची जितकी हालचाल होते, तितकीच हालचाल आहे. अशी हालचाल आहे म्हणूनच कविमनाची कुणीतरी आपलं आल्याची भावना प्रबळ होते, दिलासा मिळतो.
महाराष्ट्रातील किंवा भारतातील म्हणू या, दुपारचं वातावरण हे असंच असतं. सकाळची कामं धामं आटपलेली असतात आणि दारं हलकीच लावून माणसं वामकुक्षी घेत असतात. तितक्यात, दार हलतं आणि कुणी आलं आहे की काय, याचा कानोसा घेतला जातो.
एक उर्दू शेर स्मरतो..
कौन आया है यहाँ, कोई न आया होगा
मेरा दरवाजा हवाओंने हिलाया होगा
या शेरात शायर सरळ मान्य करत आहे - माझ्या घरी, माझ्यासारख्या भणंगाच्या घरी कोण येणार आहे? कोणीच येणार नाही. मला माहीत आहे, कोणीच येणार नाही. माझा दरवाजा जो हलतोय तो हवेमुळं, कुणाच्या येण्यानं नाही. कुणी दारावर थाप दिली म्हणून नाही.
मराठी शेरात मनातील आशा जिवंत आहे. उर्दू शायरही आशावादी आहे पण भाबडा आशावाद धरून ठेवण्यापेक्षा त्यानं कठोर वास्तवाचा स्वीकार केला आहे आणि यातच शहाणपण आहे, हे तो अप्रत्यक्षपणे ध्वनित करत आहे.
दोन्ही शेर स्वतंत्रपणे सुंदर आहेत. त्यांचा आस्वाद स्वतंत्रपणे घेणंच श्रेयस्कर आहे.
कांबळेंचा शेर किंचित अधिक आवडण्यासारखा असावा.
प्रतिसाद
चित्तरंजन भट
बुध, 09/06/2010 - 14:08
Permalink
छान. फोन खणखणला असे का
छान.
फोन खणखणला असे का वाटले
काळजाचे फक्त ठोके वाजले
असा शेर मी एकेकाळी लिहिला होता तो आठवला.
ह बा
बुध, 09/06/2010 - 17:34
Permalink
दोन्ही शेर खूपच छान
दोन्ही शेर खूपच छान आहेत.
विश्लेषणही चांगले केले आहे. मला उमगलेला अर्थ सारखाच असला
तरिही मला जे वाटले ते इथे देतो आहे.
खरे तर, दार वा-याने जरासे वाजले होते
कितीदा तूच आल्याचे मनाला वाटले होते...
या शेरात दार कशाने वाजले हे नक्की माहिती आहे तरिही कवीला तीचाच भास होतो आहे. तिला भेटण्याची/तिच्या येण्याची बेचैनी या शेरात मांडली आहे. (तूच विषयी /मर्यादित लक्ष्य/तरुण विचार)
तर...
कौन आया है यहाँ, कोई न आया होगा
मेरा दरवाजा हवाओंने हिलाया होगा
इथे मात्र सगळ्या निराशपणे वर्तविल्या शक्यताच आहेत. 'हवाओंने हिलाया था' किंवा 'कोई न आया था'ही खात्री कुठेच नाही. (एकुणात शेराचा स्वभावच तुसडा वाटतो. कुणी एक टार्गेट नाही/जगातले कुणीच आले नसेल. एकतर प्रगल्भ किंवा मग निष्काळजी विचार)
दोन्ही उत्क्रुष्ट शेर इथे दिल्याबद्दल केदारजींचे आभार, धन्यवाद!
कैलास
बुध, 09/06/2010 - 18:14
Permalink
कांबळेंचा शेर अधिक भावतो कारण
कांबळेंचा शेर अधिक भावतो कारण '' कितिदा तूच आल्याचे मनाला वाटले होते '' असे स्पष्ट त्यातून ध्वनित होत आहे....ताकाला जाउन भांडे लपवीणे हा प्रकार त्यात होत नाही...
तर उर्दू शेरात '' कुणी येण्याची आशा आहे.... पण शायर म्हण्तोय कि,''मेरा दरवाजा हवाओंने हिलाया होगा ''
उर्दू गझलेतिल तरलता मराठीतही अलगद येत आहे...किंबहुना आहेच....
मला '' बशर साहेबांचा '' हा शेर स्मरला..
अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत
अन त्यावर ''ज्ञानेश '' ने रचलेला हा शेर पहा...
इतके दव त्या रस्त्यावरती पडले होते...
नक्की तेथे रात्री कोणी रडले होते !
डॉ.कैलास
केदार पाटणकर
गुरु, 10/06/2010 - 09:47
Permalink
धन्यवाद,
धन्यवाद, प्रतिसादांबद्दल.
ह.बा. आपल्या मतांबद्दल विचार करत आहे.
कैलास,
मराठी शेर भावतो कारण, आशावाद आहे.
प्रणव.प्रि.प्र
शुक्र, 11/06/2010 - 17:08
Permalink
चांगले आहे. छान. मला दोन्ही
चांगले आहे. छान. मला दोन्ही शेर आवडले. कोणाचीच तुलना करू न करता स्वतंत्रपणे आस्वादावे असे वाटले. (वैयक्तित मत)
केदार
आपण या शेरांची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
केदार पाटणकर
मंगळ, 15/06/2010 - 14:44
Permalink
हबा, आपल्या मतांबाबत विचार
हबा,
आपल्या मतांबाबत विचार केला.
तुसडेपणापेक्षा आणि निष्काळजीपणापेक्षा निर्विकारपणा किंवा हलक्याशा बेफिकीरीची शक्यता जास्त वाटते.
ह बा
मंगळ, 15/06/2010 - 14:50
Permalink
'निर्विकारपणा' हा योग्य शब्द
'निर्विकारपणा' हा योग्य शब्द आहे.
ह बा
मंगळ, 15/06/2010 - 14:51
Permalink
हलक्याशा बेफिकीरीची शक्यताही
हलक्याशा बेफिकीरीची शक्यताही वाटतेच आहे.