मी मिटून डोळे कविता जागत असतो

डोक्यावरती पंखा रोरावत असतो
मी मिटून डोळे कविता जागत असतो

पाऊस रांगडा कुठे बरसतो हल्ली ?
(तो रिमझिम रिमझिम पाट्या टाकत असतो )

बाजूला येतो कुणी, पाहतो, हसतो
इतक्यात अचानक सिग्नल लागत असतो !

जे म्हणायचे अंधूक जाणवत असते
तान्हुला कुणी आईस चाचपत असतो

येणारच नसते गाडी कुठली, कोणी
नुसताच फलाटावर रेंगाळत असतो

मी कधी रिकाम्या दुकानातला नोकर
एकटा स्वतःशी उगाच हासत असतो

अंधारच असतो ह्या खोलीत परंतू
एखादा क्षण घनदाट उजाळत असतो

मी आधी करतो आभाळाची माती
ती माती मग मी भाळी लावत असतो

गझल: 

प्रतिसाद

फलाट, दुकानातला नोकर, आभाळाची माती, पाट्या टाकणे व तान्हुल्याने आईस चाचपणे हे शेर आवडले.

दुकानातला नोकर हा शेर फारच आवडला.

सहजरीत्या भिडणारे शेर आहेत.

तू वरून इतका शांत वाटशी मित्रा
आतुन कविता-लाव्हा झंझावत असतो

-सविनय
बेफिकीर!

पाट्या टाकणे, फलाट आणि शेवटचा शेर फार फार आवडले. आभाळाची माती भाळी लावणे तर निव्वळ अप्रतिम!

वा वा! गझल फारच आवडली.
नोकर, माती आणि तान्हुला हे शेर तर खासच!!

सही गझल! सगळेच शेर आवडले!

वाह चित्तरंजन!
कविता जगायला मिळाली!

डोक्यावरती पंखा रोरावत असतो
मी मिटून डोळे कविता जागत असतो

- मिटून डोळे कविता जागणे... सुंदर कल्पना.

पाऊस रांगडा कुठे बरसतो हल्ली ?
(तो रिमझिम रिमझिम पाट्या टाकत असतो )

- वा...वा... रिमझिम रिमझिम पाट्या टाकणे...खूप आवडले. वेगळाच बाज.

बाजूला येतो कुणी, पाहतो, हसतो
इतक्यात अचानक सिग्नल लागत असतो !

- सुरेख. हा अनुभव तर प्रत्येकालाच बहुधा रोजच येत असावा. साध्या विषयाचा छान वापर.

जे म्हणायचे अंधूक जाणवत असते
तान्हुला कुणी आईस चाचपत असतो

- अप्रतिम. तान्हुल्याने जसे आईला हलकेच चाचपावे, तसे मनाने एखाद्या कल्पनेला अंदाज घेण्यासाठी चाचपावे...! छानच.

येणारच नसते गाडी कुठली, कोणी
नुसताच फलाटावर रेंगाळत असतो

- सुंदर. अतिशय सूक्ष्म, बारकावा टिपणारा शेर.

मी कधी रिकाम्या दुकानातला नोकर
एकटा स्वतःशी उगाच हासत असतो

- नवी कल्पना राबवावी, तर अशी. फारच छान.

अंधारच असतो ह्या खोलीत परंतू
एखादा क्षण घनदाट उजाळत असतो

- वा...वा...

मी आधी करतो आभाळाची माती
ती माती मग मी भाळी लावत असतो

- ओहो. अप्रतिम. खरोखरच कळसाध्यायाचा शेर.

एकंदर, अभिनव कल्पनांची खणखणीत गझल.
सौ सुनार की इक लुहार की, या म्हणीचा प्रत्यय तुमच्या गझला वाचून नेहमीच येतो. असा प्रत्यय वारंवार यावा !

चित्तरंजन -- तुमची गझल कल्पनांची दीपमाळ आहे! डोळे दिपले आणि सुखावलेही!

वा वा वा!
मी आधी करतो आभाळाची माती
ती माती मग मी भाळी लावत असतो
खर तर प्रत्येकच शेर अफलातूनच आहे. निरीक्षण, मांडणी, सहजता सगळेच ...अगदी नेमके यावे असे. वाचकाला वेगवेगळ्या संदर्भाते, वेगळ्या वातावरणात नेणारे तरीही एका गझलेत आले म्हणून न खटकणारे.

अप्रतिम गझल. अतिशय आवडली.
सोनाली

सर्व वाचकांचा आणि प्रतिसाद देणार्‍यांचा आभारी आहे. प्रदीपराव, विशेष धन्यवाद. एवढीही स्तुती करू नका.

जे म्हणायचे अंधूक जाणवत असते
तान्हुला कुणी आईस चाचपत असतो.... अतिशय 'टेंडर' शेर.. हा दोन्ही म्हणजे आईच्या गर्भात असलेल्या अर्भकाला आणि अगदी नवजात अर्भकाला- म्हणजेच पर्यायाने मनात बीज रुपाने अवतरलेल्या शेराला आणि जन्माला आलेल्या, पर अभी जिसे तराशा नही है- अश्या दोन्ही शेराला लागू पडतो.. फारच नाजुक आणि गोड कल्पना आहे!
मतला , सिग्नल आणि विशेषतः फलाट एक मूड बनविणारे शेर वाटलेत.. मर्ढेकरी अंदाज आहे.. (गणपत वाणी -सारखा) एक वेगळी गझल वाचायचे समाधान लाभले..
-मानस६

प्रदीपराव, विशेष धन्यवाद. एवढीही स्तुती करू नका.
चालेल चालेल. नाही करणार.
पण तुमची ही डिश जरा जास्तच आवडली म्हणून चार घास मीही जास्त खाल्ले इतकेच. :)

मी आधी करतो आभाळाची माती
ती माती मग मी भाळी लावत असतो
व्वा! उपरतीचा सुंदर शेर!

डोक्यावरती पंखा रोरावत असतो
हा.... हा.... जुन्या काळातल्या कवींची (...खरेतर पंख्यांची) आठवण झाली. (रोरावतमुळे)

मी मिटून डोळे कविता जागत असतो
व्वा! सुंदर कल्पना!
मला सुद्धा आत्ता 'म्याँव' करावेसे वाटले.

चुभूद्याघ्या.

मतला , सिग्नल आणि विशेषतः फलाट एक मूड बनविणारे शेर वाटलेत.. मर्ढेकरी अंदाज आहे.. (गणपत वाणी -सारखा) एक वेगळी गझल वाचायचे समाधान लाभले..

मानस, धन्यवाद. मर्ढेकरी सिग्नल आणि फलाट ह्या शब्दांवरून की काय ;)

मी आधी करतो आभाळाची माती
ती माती मग मी भाळी लावत असतो
व्वा! उपरतीचा सुंदर शेर!

अजय, धन्यवाद. केवळ उपरतीबद्दल नाही. तो एक अर्थ झाला. आत्मविश्वासाचा, उद्दामपणाचा, मूर्तिभंजनाचाही शेर आहे. हा शेर म्हटले तर माणूस नावाच्या प्राण्याबद्दलचाही आहे.

अप्रतिम गझल !!!!!

येणारच नसते गाडी कुठली, कोणी
नुसताच फलाटावर रेंगाळत असतो.........!!

अप्रतिम गझल !!! अतिशय सुंदर. एखाद्या शेराचा उल्लेख करणे म्हणजे दुसर्‍यावर अन्याय.
तो गुन्हा आम्ही करणार नाही. सर्व शेर आवडले.

लाभतो विसावा दोन क्षणांचा तेव्हा
मी येथे येउन गझला चाळत असतो

आपला,
(गझलप्रेमी) धोंडोपंत

गझल अत्यंत साध्या शब्दात असूनही नेमके विचार मांडते. ही गोष्ट फार विचारांती जमत असावी.

बाकी:

धोंडोपंत - आपण एरवी कुठे असता?

मी आधी करतो आभाळाची माती
ती माती मग मी भाळी लावत असतो
हा शेर मलाही "उद्दामपणाचा" वाटला होता. पण, मी ते लिहिले नाही. कारण, पुलंच्या भाषेत - शरीराप्रमाणे मनालाही कुबड आलेले काहीतरी बोलायचे. असो. उद्दाम व्यक्तीत आत्मविश्वास असतोच. जसा रावणातही होता. हा शेर नुसत्या आत्मविश्वासाचा वाटत नाही. तर, उद्दामपणाचाच वाटतो.
मूर्तिभंजन वगैरे म्हणाल तर पटले नाही. ठीक आहे, भगवंताची व्यापकता आणि आभाळ हे जुळते. मूर्ती आणि माती भाळी लावणे हे जुळते. पण, आभाळची माती करणे - याचा अर्थ असा होत नाही.
तरी शेर आवडला हे खरे !

धोंडोपंत,
लाभतो विसावा दोन क्षणांचा तेव्हा
मी येथे येउन गझला चाळत असतो
आपल्या चाळणीचा कधीतरी आम्हालाही अनुभव येऊ देत. हा हा हा...

चुभूद्याघ्या.

व्वा एकदंर मस्त आणि वेगळी गझल
तान्हुला आणि आभाळाची माती फार आवडले

सुंदर . त्यातही मतला , तान्हुला आणि शेवटचा शेर अप्रतिम

श्री. अजय अनंत जोशी यांस,

धोंडोपंत,
लाभतो विसावा दोन क्षणांचा तेव्हा
मी येथे येउन गझला चाळत असतो
आपल्या चाळणीचा कधीतरी आम्हालाही अनुभव येऊ देत. हा हा हा...

तुम्हाला देऊ आमच्या "चाळणी"चा अनुभव.

भेटा एकदा.

धोंडोपंत

मी इथला प्रतिसाद काढून टाकलेला आहे.

क्षमस्व!

त्यात तुम्हाला खेद वाटण्यासारखे काही नाही हो . तुम्हाला कशाला खेद व्हायला पाहिजे?

त्यांनी जे काही म्हटले होते त्याला बरोबर उत्तर दिलाय.

धोंडोपंत

नुसताच फलाटावर रेंगाळत असतो - व्वा!

धोंडोपंत,
कुठे भेटायचे ते ठरवा. मी पुण्यात असतो. कोथरूडला.
माहितीसाठी माझा भ्रमणध्वनी : ९९२३८२०८४२
नको आता वाद, धन्यवाद!

जे म्हणायचे अंधूक जाणवत असते
तान्हुला कुणी आईस चाचपत असतो

फारच सुरेख

गझल आवडली.

येणारच नसते गाडी कुठली, कोणी
नुसताच फलाटावर रेंगाळत असतो

च्यायला, डोळ्यासमोर चित्र उभं राह्यलं.
'पाट्या टाकणे'ही आवडले.

-दिलीप बिरुटे

गझल नेहमीप्रमाणेच सुरेख

तान्हुला व नोकर हे तर खूपच आवडले :)

जबर्दस्त गझल...

जे म्हणायचे अंधूक जाणवत असते
तान्हुला कुणी आईस चाचपत असतो

मी आधी करतो आभाळाची माती
ती माती मग मी भाळी लावत असतो

हे दोन जास्तच आवडले.
गझल अप्रतिमच,

जे म्हणायचे अंधूक जाणवत असते
तान्हुला कुणी आईस चाचपत असतो
क्या बात हे चित्तजी!
येणारच नसते गाडी कुठली, कोणी
नुसताच फलाटावर रेंगाळत असतो
मस्त
मी कधी रिकाम्या दुकानातला नोकर
एकटा स्वतःशी उगाच हासत असतो
सुंदर.
अंधारच असतो ह्या खोलीत परंतू
एखादा क्षण घनदाट उजाळत असतो
मी आधी करतो आभाळाची माती
ती माती मग मी भाळी लावत असतो
गझलेमध्ये येणा-या त्याच त्याच प्रतिमांचं कोंदट वातावरण तोडून गझलेला नवं परिमाण देणारी गझल आहे ही असं वाटतं मला. सगळ्या प्रतिमा, प्रतीकं नवी आहेत. सांगणं त्याचा घाट नवा आहे. सुंदर. मस्तच!!

अप्रतिम !!
सगळेच शेर अगदी थेट पोचले....... असं कधी लिहिता येईल ..............!!

आत्तापर्यंत दहा-बारा वेळा तरी वाचली असेल ही गझल..
काय प्रतिसाद द्यावा तेच सुचत नाही!
एखादं ग्रेट नाटक पाहून थेटरच्या बाहेर पडल्यावर जे होतं ते होतंय!

गझल आणि तीवरचे प्रतिसाद - सर्वच आवडले.....

.......पण लयक्रम / लघु-गुरू क्रम कळला नाही... खरंच...!

लघु-गुरू जुळणार नाहीत. हे मात्रावृत्त आहे. पण लयबद्ध आहे हे नक्की.

काल ही गझल पुन्हा वाचली आणि

अंधारच असतो ह्या खोलीत परंतू
एखादा क्षण घनदाट उजाळत असतो

या ओळींचे वेगवेगळे अर्थ उमटले मनात. फारच सुंदर व खोल शेर आहे. आता किती दिवस डोक्यात आणि मनात राहणार ठाऊक नाही. पण मस्त. घनदाट उजाळत असतो.... व्वा.

आवडलेले शेर :

पाऊस रांगडा कुठे बरसतो हल्ली ?
(तो रिमझिम रिमझिम पाट्या टाकत असतो )

अंधारच असतो ह्या खोलीत परंतू
एखादा क्षण घनदाट उजाळत असतो - या शेराचा म ला समजलेला अर्थ : तशी या खोलीकडून अंधाराचीच अपेक्षा असते पण एखाद्या कल्पनेची वीज अशी लखलखून जाते की खोलीत काहीतरी धवल/सत्य /उदात्त/ चांगलेही घडेल अशी आशा/विश्वास निर्माण होतो.

उत्क्रुष्ट रचना!

प्रणव प्रि. प्र.

कृपया त्या शेराचे वेगवेगळे अर्थही प्रतिसादात लिहावेत म्हणजे मलाही समजेल. (निरोप पाठवलात तरी चालेल). विविध गझलांमधील शेरांच्या अर्थाचे पदर जाणून घेणे मला आवडते. मी निरोप न पाठवण्याचे कारण आपण जाहीर प्रतिसाद दिला आहेत.

हा प्रतिसाद देण्यात केवळ अभ्यासाचा हेतू आहे. मला तरी या शेरात केवळ एकच अर्थ जाणवला आहे. (जीवनात बहुतांशीवेळा नकारात्मक घटना / गोष्टी घडत असतात, पण कोणत्यातरी एखाद्या गोष्टीमुळे / आशेमुळे जगण्याची / जगात रमण्याची ताकद मिळत राहते.)

चित्तरंजन,

आपल्याला इतर काही अर्थ अभिप्रेत असल्यास कृपया आपण सांगावेत.

बेफिकीर, अर्थ सांगण्यात मजा निघून जाते त्यामुळे मला अनेक अर्थ अभिप्रेत आहेत एवढेच सांगीन. खोली ह्या शब्दाचा अर्थ डेप्थ असाही घेऊ शकता हा क्लू देतो.

बेफिकीर,

चित्तरंजन यांच्या मताशी सहमत आहे.
.............
तरी एक मला फार आवडलेला अर्थ इथे सांगावासा वाटतो.

कवी किंवा कलावंत जेव्हा सृजन प्रक्रियेत नसतो तेव्हा तो एक सामान्यच माणूस असतो. त्याला सुख, दुःख असतात. आशा-निराशा असते. असे हे जगणे म्हणजे व्यावहारिक. परंतु एखादा सुचण्याचा किंवा निर्मितीचा क्षण असा असतो की हा सगळा अंधार उजळून काढतो. पुन्हा चित्तरंजन यांनी घनदाट असा शब्द वापरला आहे तो झाडांशी म्हणजे जंगल घनदाट असते असा जोडता येईल. झाडं नवतेचं किंवा सृजनाचं प्रतीक असतात.

ओशोंचं एक वाक्य आहे अंधार म्हणजे प्रकाशाचे नसणे असते. अंधाराला अस्तित्व नाही. तसंच कवी किंवा कलावंतामध्ये निर्मितीचा प्रकाश दडलेला असतो. तो एरवी बाहेर येत नाही. म्हणजे अंधार असतो. परंतु तो जेव्हा सृजनाच्यावेळी बाहेर पडतो तेव्हा तो सगळा अंधार उजळून टाकतो. असे बरेच काही... हा एक धागा झाला असे अनेक धागे आहेत...

धन्यवाद....

चित्त व प्रणव!

अर्थ सांगण्याने मजा निघून जाते - सहमत

खोली = डेप्थ - सहमत!

सृजनाचा क्षण व झाडे हे सृजनाचे प्रतीक - सहमत!

प्रणव!

मला असे म्हणायचे होते (कदाचित आधीच्या प्रतिसादात नीट लिहू शकलो नसेन) की कोणत्यातरी अंधारातून एक क्षण उजळतो या व्यतिरिक्त काही अर्थ आहे किंवा नाही?

म्हणजे: अंधार कशाला म्हणायचे, खोली याचा अर्थ काय घ्यायचा, घनदाट उजळणे म्हणजे काय समजायचे, एखादा क्षण म्हणजे सृजनाचा की लौकीक यशाचा वगैरे.. या सर्वाबाबत निश्चीतच वाचक हवा तो अर्थ लावू शकेल. एखाद्याच्या दृष्टिने अंधार व्यावहारिक जगात जगण्याचा आहे तर दुसर्‍याच्या मते अपंगत्वाचा असू शकेल.

पण या शेरात 'अंधारात एखादा क्षण उजळतो' या व्यतिरिक्त काही अर्थ आहे का असे विचारायचे आहे.

आपल्याला वेगवेगळे संदर्भ जाणवले असतील तो शेर पुन्हा वाचल्यावर! पण आपण 'वेगवेगळे अर्थ उमटले' असे म्हंटले होतेत म्हणून मी तो प्रश्न विचारला. एखादी उपमा निरनिराळ्या माणसांना निरनिराळ्या संदर्भाची वाटणे हे नक्कीच यशाचे द्योतक आहे, पण त्याचा अर्थ शेराला वेगवेगळा अर्थ आहे असे मला वाटत नाही. फक्त संदर्भ बदलले आहेत असे वाटते.

हेतू चर्चेचा!

-'बेफिकीर'!

गुस्ताखी करून माझा एक शेर उदाहरणापुरता घेत आहे.

डुंबणे कंटाळवाणे पण
वाटले बसशील काठावर

आता यात हे मी कुणाला सांगतोय याबाबत कुणाकुणाचा वेगवेगळा अंदाज अस शकेल. प्रेयसी, जुना दोस्त, कविता,यश वगैरे वगैरे!

पण या शेराला मुळात अर्थच एकाहून अधिक आहेत असे मला नम्रपणे म्हणायचे आहे.

१. तू (ती स्त्री) (एकटीच) जलविहार करताना कंटाळली आहेस व निघून चालली आहेस. मी हे मनोहर दृष्य बघत बसलो होतो. डुंबू नकोस पण निदान काठावर बस! पाहात राहुदेत!

२. माझ्या मनात तू आजवर डुंबत होतीस (होतास वगैरे)! आपल्यात बेबनाव झाला. आता निदान सहवास तरी राहूदेत. सोडून जाऊ नकोस..

३. (दुसर्‍याच मुद्यासारखा पण किंचित वेगळा) मी (कवितेत वगैरे) डुंबत आहे आणि संसारात पुर्वीसारखा रमत नाही. सुरुवातीला कुतुहल म्हणून व माझ्यावर प्रेम म्हणून किंवा मला तू साथ देतेस असे मला वाटत राहावे म्हणून तू (कवितेच्या वगैरे) काठावर येऊन माझे डुंबणे (कवितेत वगैरे) पाहू लागलीस. पण आता तुला इतका कंटाळा आला की मला तिथेच सोडून तू तुझ्या मार्गाने जात आहेस. (यात डुंबणारी व्यक्ती एक व निघून जाणारी दुसरी आहे वगैरे)

धन्यवाद!

तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे ते पूर्णपणे काही कळले नाही. पण नेहमीप्रमाणे तुमचा हेतू निश्चितच निखळ, प्रामाणिक व अभ्यासाचा आहे हे मात्र कळते आहे.

तुम्ही दिलेल्या तुमच्या शेराबद्दल
मुळात शेर मोकळा आहे आणि प्रतिमाविश्वही छोटे. त्यामुळे वेगवेगळ्या अर्थांकडे नेणारे पॉइंटर्स कमी आहेत. त्यात जाळीकाम विशेष नाहीच.

ह्याउप्पर सध्या ह्या चर्चेत सहभागी होण्याएवढा वेळ सध्या नाही. तसेच अशा चर्चा नंतर फार कीसपाडू होतात आणि ही कीसपाडू डोकेदुखी हल्ली त्रासदायक वाटते. ह्या अशा चर्चा गप्पाटप्पात करता येतील. किंवा वरील चर्चा (इतरांशी) व्यक्तिगत निरोपातून झाल्यास सर्वोत्तम.

शुभेच्छा!

बेफिकीर,
आपल्या शेराचे प्रयोजन काय, व गुस्ताखी का केलीत हे कळले नाही
....
आपला कवितेकडे पाहण्याचा दृष्टिकोन व माझा दृष्टिकोन यात बराच फरक असल्याचे लक्षात आले.
हा शेर वाचल्यावर मला झालेला आनंद अत्यंत वैयक्तिक असून तो मी कोणाशी शेअर करावासा वाटत नाही. (अगदी हेतू चर्चेचा असला तरी!). परंतु राहवलं नाही म्हणून तो प्रतिसाद टाकला.
आणि मुख्य म्हणजे चर्चेतून नुसता कीस पाडला जातो व आनंद मजा निघून जाते. असो.
धन्यवाद.

आपला अत्यंत वैयक्तिक आनंद आपण जाहीर प्रतिसादात व्यक्त केलात म्हणून जाहीर चर्चा झाली. गझलेचा अर्थ वा शेराचे अर्थ या विषयावर आपण जाहीर चर्चा सुरू केलीत म्हणून मी जाहीर प्रतिसाद दिले. मी माझ्या कोणत्याही विधानात दुखावण्यासारखे काही लिहिलेले नसताना उपरोधिकपणे माझा हेतू निखळ आहे किंवा ही निरर्थक व कीसपाडू चर्चा आहे व यापुढे गप्पाटप्पात चर्चा व्हावी अशी मते आली. मग या मुख्य पानावर फक्त 'गझल आवडली' एवढेच लिहीणे अभिप्रेत आहे का?

मी आपल्याला निरोपही पाठवलाच होता. त्याचेही उत्तर आपण जाहीर प्रतिसादातच दिलेत.

माझा चर्चेचा हेतू प्रामाणिक होता हे सांगत बसण्याची गरज नाही. अजूनही चर्चेतील मुद्दा स्पष्ट झालेलाच नाही असे माझे मत! बाकी तुम्हा वैयक्तिक आनंद झाला याचा आनंद वाटला.

ज्यांना कंटाळा येतो त्यांनी चर्चेत पडलेच पाहिजे असा मी आग्रह धरू शकत नाही. पण चर्चा केवळ 'वा, हा शेर थेट, तो घुसला, याने ढवळून निघालो, हा सामान्य' अशीच नसावी असे वाटते.

मतल्यातील दोन मिसर्‍यांचा एकमेकांशी संबंध असायला हवा असे मला वाटते.

बाकी रचना नावीन्यपूर्ण!

भन्नाट

उत्तमस्य उत्तमः!
(भविष्यात आमच्याकडून हिची विडंबीत आवृत्ती येण्याची शक्यता आहे.)