निखारे

नालायकांस कोणी द्यावे किती इशारे
उडवून झोप त्यांची जाती पहाटवारे!

छिद्रामुळे बुडाली त्यांची अजस्र नौका
आता तरींमधूनी ते शोधती किनारे!

मैत्रीस जागुनी मी त्यांच्या मिठीत गेलो
पाठीमधेच त्यांनी सरकाविली कट्यारे

खुर्चीतुनीच आज्ञा देती भिकार राजे
होते न जे कधीही युद्धात झुंजणारे!

उरले उरी न आता आवाज चांदण्यांचे
आता कवेत माझ्या ते सूर्य चंद्र तारे!

ओकून आग मीही शमलो जरा तरीही
अद्यापही न विझले हृदयातले निखारे

- योगेश्वर रच्चा

गझल: 

प्रतिसाद

योगेशजी,

ओकून आग मीही शमलो जरा तरीही
अद्यापही न विझले हृदयातले निखारे

खुपच छान गझल!

शंका: कट्यारचे अनेकवचन कट्यारे? की कट्यारी?

छिद्रामुळे बुडाली त्यांची अजस्र नौका
आता तरींमधूनी ते शोधती किनारे!

शेर आवडला.

शंका: कट्यारचे अनेकवचन कट्यारे? की कट्यारी?
योगेश, 'हत्यारे' घ्या ना!

ओकून आग मीही शमलो जरा तरीही
अद्यापही न विझले हृदयातले निखारे
फारच छान.

अवांतरः
आनंदकंदातील गझला करणे सोपे जात असावे बहुतेक. पूर्वी ऋषी कंद खाऊन इतके आनंदी कसे राहत असतील हे हळूहळू समजते आहे...:)

*शंका: कट्यारचे अनेकवचन कट्यारे? की कट्यारी?
योगेश, 'हत्यारे' घ्या ना!*
अजयजी अगदी योग्य शब्द सांगीतलात. फक्त असं शब्द सांगून सामुदायीक गझल निर्मीती केली तरी चालतं हे मला माहिती नव्हतं.

खूप छान. मला आवडली गझल.
खालील शेर खासच आवडले.

खुर्चीतुनीच आज्ञा देती भिकार राजे
होते न जे कधीही युद्धात झुंजणारे!

उरले उरी न आता आवाज चांदण्यांचे
आता कवेत माझ्या ते सूर्य चंद्र तारे!

ओकून आग मीही शमलो जरा तरीही
अद्यापही न विझले हृदयातले निखारे

-----------------------------------नचिकेत भिंगार्डे

किनारे आणि निखारे हे शेर खास!

आपल्या गझलांमधून आपणास वृत्त चांगले उमगल्याचे दिसून येते...थोडी विचारांमधे स्पष्टता आणि लिहिण्यामधे सफाई आली तर आणखी उत्कृष्ट रचना येतील यात शंका नाही !
स्वागत आणि शुभेच्छा !

आपल्या सूचनांबद्दल खूप खूप आभार.
गझल दुरूस्त करण्याची सोय असायला हवी होती. असो.