नाचली काळीज ते पेलीत काही माणसे

दंगली पाहूनही मेलीत काही माणसे
राहिली गांधी तुला झेलीत काही माणसे

केवढी ती प्रीत काळी आंधळे काळीज ते
नाचली काळीज ते पेलीत काही माणसे

उंच राही देव आणी अंतही आहे मधे
पायरी बांधायला गेलीत काही माणसे

नागवा वेडा कपी त्यानेच बी हे लावले
पोचली कोंभातुनी वेलीत काही माणसे

आसवे माझी कुणी घेईल का? मी बोललो
दूर रांगेने उभा केलीत काही माणसे

काल 'ती' दारात माझ्या राबली वेड्यापरी
आज देवाने घरी नेलीत काही माणसे

गझल: 

प्रतिसाद

पायरी बांधणारी आणि रांगेत उभी केलेली काही माणसे आवडली.

पायरी आणि राबली हे शेर फार फार आवडले! "पायरी बांधायला गेलीत काही माणसे"... क्या बात है!!
आसवेही छान, पण "दूर रांगेने उभा केलीत.." वाचताना काहितरी गडबड वाटते.

नागवा वेडा कपी त्यानेच बी हे लावले
पोचली कोंभातुनी वेलीत काही माणसे
छान.
काल 'ती' दारात माझ्या राबली वेड्यापरी
आज देवाने घरी नेलीत काही माणसे
वा वा! फारच हलवणारा शेर.

काल 'ती' दारात माझ्या राबली वेड्यापरी
आज देवाने घरी नेलीत काही माणसे

व्वा... क्या बात है !!

आसवे माझी कुणी घेईल का? मी बोललो
दूर रांगेने उभा केलीत काही माणसे

इथे दूर रांगेने उभी केलीत काही माणसे.... असे अपेक्षित असावे.

डॉ.कैलास

कैलासजी
अजयजी
पुलस्तिजी
चक्रपाणिजी
धन्यवाद!

आसवे माझी कुणी घेईल का? मी बोललो
दूर रांगेने उभा केलीत काही माणसे

इथे उभा एवजी उभी असण्यासही हरकत नाही. तो कराडच्या बोली भाषेमुळे आलेला शब्द आहे.

दंगली पाहूनही मेलीत काही माणसे
राहिली गांधी तुला झेलीत काही माणसे

हे समजले नाही.

'पायरी' शेर छान आहे. विशेषतः सानी मिसरा.
शुभेच्छा!

ज्ञानेशजी प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

दंगली पाहूनही मेलीत काही माणसे-
राहिली गांधी तुला झेलीत काही माणसे-

मानव निर्मितीच्या इतिहासात लढणारा आणि न लढणारा असे माणसाचे वर्गीकरण आजवर कुठेही आढळत नाही. अन्नापासून ते हद्दीपर्यंत प्रत्येक हक्कासाठी माणूस शस्त्र उचलत आला. शस्त्र हा आप ल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. असे असताना शस्त्र नाकारून शांतता/अहिंसा या संकल्पना रूजणे अशक्य होते तरीही त्या रूजवण्याचा प्रयत्न होत राहीला आणि समाज आपली मूळ आक्रमकता हरवत गेला असे माझे मत आहे.

ज्ञानेशजी मी गझलेच्या प्रांतात नवीन आहे. काही शब्द कळत नाहीत, जसा आपण लिहीलेला 'सानी मिसरा' हा शब्द?. मी आपल्या गझला आवर्जुन वाचतो.

ह बा,
ऊला मिसरा = शेराची पहिली/वरची ओळ
सानी मिसरा = शेराची दुसरी/खालची ओळ

धन्यवाद चक्रपाणिजी!

पुलस्तिजी
*"दूर रांगेने उभा केलीत.." वाचताना काहितरी गडबड वाटते.*
व्याकरण द्रुष्ट्या चुक आहे की फक्त वाचताना चुकते आहे? वर कैलासजी नी सांगीतल्याप्रमाने बदल केल्यास योग्य होइल का? क्रुपया मार्गदर्शन करावे.

सगळेच शेर अप्रतीम!

दंगली पाहूनही मेलीत काही माणसे
राहिली गांधी तुला झेलीत काही माणसे

केवढी ती प्रीत काळी आंधळे काळीज ते

इथे कविला काय म्हणायचे त्याहि पेक्षा वेगळा अर्थ गवसतो.
सगळ्या महात्म्यांनी,हुतात्म्यांनी ज्या तत्वांवर आंदोलन उभारले ती तत्वेच त्यांच्यानंतर उरली नाहीत.
त्यांच्या अनुयायांनी चुकीचे अर्थ लावत वाट लावली! त्यांनी केवळ महात्म्यावर प्रेम केले ,विचारांवर नाही..

झानेशजी,
राहिली गांधी तुला झेलीत काही माणसे..इथे हेच तर सांगितल्या नाही जात का ,की

फार थोडे अनुयायी त्यांच्या मार्गावर चालत राहिलेत.

राहिली गांधी तुला झेलीत काही माणसे
दुसर्‍या अर्थाने ही ओळ व्यंगार्थाने घेतलेली वाटते.
कहिही असो,शेर अर्थवलयं निर्माण करतोय खरा,
अन हीच खर्‍या कवितेची ताकद असते.

मनीषाजी
*त्यांच्या अनुयायांनी चुकीचे अर्थ लावत वाट लावली! त्यांनी केवळ महात्म्यावर प्रेम केले ,विचारांवर नाही..*
त्यामुळे नैसर्गिक नसताना, नको असताना किंवा कळत नसताना त्या विचारांचा त्याना पाठ पुरावा करावा लागला.
आपण दिलेले स्पष्टीकरण योग्य आहे. धन्यवाद!

व्वा पायरी वाला शेर आवडला

पायरी आणि काल ती या द्विपदी खास!!!!

मिल्याजी
क्रांतिजी

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

फारच सुरेख गझल.
आज देवाने घरी नेलीत काही माणसे
हृदयद्रावक.

स्पिरिट???
स्पष्ट करा.

@सॉरी हबा.. शब्दात सांगता येन्यासारखे नाही. वाचले कि कळते. @
वैभवच्या प्रेरणा/मार्गदर्शनानेच मी गेल्या काही आठवड्यांपासून गझल लिहीतो आहे. तुम्हाला अपेक्षीत गोष्ट लवकरच दिसेल अशी अपेक्षा.
मी लिहीत राहतो तुम्ही वाचत रहा फक्त ते 'स्पिरिट' दिसल रे दिसल की मला सांगा.

अनिलजी प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
प्रसेन्जितजी प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

सुंदर गझल...
पायरी आणि देवाच्या घरी आवडले...
उशीरा वाचली.. :(

उंच राही देव आणी अंतही आहे मधे
पायरी बांधायला गेलीत काही माणसे
वा. राबलीही चांगला शेर.

आनंदयात्रीजी
चित्तरंजनजी,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

ह बा जी,
गझल खरेच फक्कड आहे.
राबली फारच छान.

जास्त काळ नेटवर उपलब्ध राहणे जमत नाही.गझल पोस्ट करायची असते तेव्हा येतो.तेव्हाच गझला वाचणे अन प्रतिसाद लिहिणे होते.उशीर होतो.क्षमस्व!

@जास्त काळ नेटवर उपलब्ध राहणे जमत नाही.गझल पोस्ट करायची असते तेव्हा येतो.तेव्हाच गझला वाचणे अन प्रतिसाद लिहिणे होते.उशीर होतो.क्षमस्व!@

निलेशजी,

आपण सर्वांना प्रतिसाद देता हेच खूप आहे. मिळेल त्या वेळेत इथे येऊन आपण एकमेकांच्या बर्‍या/चांगल्या गझला वाचणे आणि मराठी गझल क्षेत्रात आणखी सुंदर असं काहितरी निर्माण होईल यासाठी आपल्या प्रतिसादातुन प्रेरणा देणे हे आपल्या सर्वांचेच ध्येय आहे. त्यासाठी आपण वेळ काढता हे अभिनंदणीय आहे.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!

उंच राही देव आणी अंतही आहे मधे
पायरी बांधायला गेलीत काही माणसे

काल 'ती' दारात माझ्या राबली वेड्यापरी
आज देवाने घरी नेलीत काही माणसे

क्या बात है..! मस्त.

गंगाधरजी,
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

सर्वांचे आभार!
(: ............... ................:)

अप्रतिम!!!
आता या गांधीला झेला....

गांधीजी,
प्रतिसादाबद्दल आपला आभारी आहे.

इतकी सुंदर आहे मग पुन्हा पुन्हा का वाचू नये..
...........शाम

मस्त .......
शेवटची ओळ तर आ हा हा ...........................