पुण्याई

चंद्र राहिला नाही भाबड्या चकोरांचा
चांदण्यावरी ताबा आजकाल चोरांचा

लागले न झाडांना दोनचार शिंतोडे
नाचही सुरू झाला जंगलात मोरांचा

मी अजूनही येथे श्वास घेतला नाही
(दे सुगंध थोडासा कालच्या फुलोरांचा!)

मांडले कुणी येथे आज ताट सोन्याचे?
आठवे न रामाला द्रोण रानबोरांचा!

मी तुझा क्षणासाठी हात घेतला हाती...
कायदा कसा पाळू मी तुझ्या बिलोरांचा?

राहिली जगी माझी एवढीच पुण्याई-
मी  न सोयरा झालो त्या हरामखोरांचा!

सुरेश भटांची मला आवडलेली रचना: