माझी गझल ...

माझी गझल ...

भावनांना साथ द्याया, जागते माझी गझल...
रोम-रोमांतून माझ्या, वाहते माझी गझल...

मी घराची वाट धरता, रोजच्या मार्गावरी;
लाजुनी-शृंगारुनी मज भेटते माझी गझल...

मी तिच्याशी भांडता, हटकून वृत्तांच्यावरी;
पाहणे मजला पुन्हा, मग टाळते माझी गझल...

जे मला ना बोलता येते कधी ओठांतुनी;
तेच सारे व्यक्त करणे, साधते माझी गझल...

मी तिला अर्ध्यातुनी, सोडून जाता एकटी;
वाट माझ्या आगमाची, पाहते माझी गझल...

कागदावर रेखताना, मी तिला चित्रातुनी;
रूप अपुले देखणे, न्याहाळते माझी गझल...

मी तिच्याशी गुंतलो अन् नावचे माझ्या अता;
रोजला सौभाग्यलेणे, लावते माझी गझल...

- निरज कुलकर्णी.

गझल: 

प्रतिसाद

अल्टीमेट गझल आहे. मजा आली.

नीरज, तुझ्या  गझल  इथे  वाचून  पुनःप्रत्ययाचा  आनंद  मिळतो  आहे.
लिहीत  रहा !