गप्प १

मी खेळलो जिथे तो वाडा पडून गेला
कोर्‍या इमारतींना थोडा नडून गेला


आता खुली न दारे, नाही कळे कुणाचे
एकांत माणसाला का आवडून गेला?


डोकावया न होती दारात लाज, आता
बोलावले जयाला तो आखडून गेला


राखी दिवाळि दसरा, श्रावण अता न हसरा
प्रत्येक सण अताशा आला, रडून गेला


आजी म्हणे मुलांनो, तुम्हास ना कळावे
जो काळ या ठिकाणी तेव्हा घडून गेला


हा कोपर्‍यात आहे वासा किती जुनासा
वाड्यात शोभणारा, आता सडून गेला


ती भांडणे जणू की पाण्यात बुडबुडे ते
हल्लीच आग जो तो खरि पाखडून गेला


कोणी चुकून पुसता झालेय काय हे हो?
मी गहिवरून बोले, वाडा पडून गेला


मुलगा कुठे कुणाचा कोणास ठाव होते?
दिलदार तो शिरस्ता आता झडून गेला


गेले कुणी कि सारे एकत्र व्हावयाचे
हल्लीच जो बिचारा, मेला, अडून गेला


 




 

गझल: 

प्रतिसाद

तिलकधारी? शेवटी खरच गप्प केलेतच. सॉलीड गझल. काही काही शेर वाचून खरच गहिवरून आले.

गझल  आवडली. विषेशतः
हा कोपर्‍यात आहे वासा किती जुनासा
वाड्यात शोभणारा, आता सडून गेला

मुलगा कुठे कुणाचा कोणास ठाव होते?
दिलदार तो शिरस्ता आता झडून गेला..  हे दोन्ही  शेर मस्तच.
अशाच 'गप्पी'  माशांची  पैदास  करत रहा, ही  शुभेच्छा..!

आता खुली न दारे, नाही कळे कुणाचे
एकांत माणसाला का आवडून गेला?
कोणी चुकून पुसता झालेय काय हे हो?
मी गहिवरून बोले, वाडा पडून गेला
भावपूर्ण  शेर!!   मनाला भिडणारे....

आता खुली न दारे, नाही कळे कुणाचे
एकांत माणसाला का आवडून गेला?... आवडला शेर
-मानस६..

आता खुली न दारे, नाही कळे कुणाचे
एकांत माणसाला का आवडून गेला?
या शेरात, '...नाही कळे कुणाचे..'कशासाठी ? ते कळले नाही...काही शेर बरे वाटले.
वासा ... हा शेर आवडला. बाकी गझल का कुणास ठाऊक सपाट वाटली. उत्तम समीक्षा करणार्‍या गझलकाराची गझल अशी अपेक्षित नव्हती. काही ठिकाणी तुकबंदी जाणवली. 'दिवाळि','खरि','कि' या शब्दांचे र्‍हस्व स्वरूप कशासाठी ? हे स्वातंत्र्य घ्यायचे का ? किती ठिकाणी ?
मुलगा कुठे कुणाचा कोणास ठाव होते?
दिलदार तो शिरस्ता आता झडून गेला
या शेराचा संदर्भ लागत नाही. अस्पष्ट वाटतो. शेवटचा शेर 'अडून'साठी लिहिल्यासारखा वाटतो.
तुमची 'ती' हझल मला प्रभावी वाटली होती. त्या कुळीतली ही गझल वाटत नाही. माफ करा. मला कदाचित हेच म्हणायचे होते. 'होते असे कधी कधी..'
शुभेच्छा!
आपला मित्र,
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

प्रा. डॉ. संतोष,
१. उत्कृष्ट प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
२. नाही कळे मधे फ्लॅट सीस्टीम मधे कुणाचे काहीच समजत नाही असे म्हणण्याचा प्रयत्न होता.
३. स्वातंत्र्य - खरे आहे, इतके स्वातंत्र्य चांगले नाही.
४. दिलदार शिरस्ता - पुर्वी वाड्यात खेळताना मुले कुणाच्याही घरी केव्हाही असायची व पालकांना चिंता नसायची. या सर्व गोष्टी माझ्याबाबतीत पुर्वी झाल्यामुळे ही गझल रचली. आता पालकांना लगेच काळजी वाटायला लागते.
५. 'अडून' - हा शेर कृत्रिम वाटणे स्वाभाविक आहे, मात्रा ही गोष्ठी मी स्वतः पाहिली आहे.
६. उत्तम समीक्षा करणार्‍याने - उत्तम समीक्षा करणारा दर्जेदार गझलकार असतो हे आवश्यक नाही हे आपण जाणताच. माझी समीक्षा उत्तम असते असे मी पहिल्यांदाच ऐकले त्याबद्दल धन्यवाद.
७. दर्जा - या गझलेचा दर्जा फारसा छान नाही हे कबूल आहे. विविध मानसिक अवस्थांमधे विविध विचार शब्दबद्ध केले जातात. सर्व चांगले उतरत नाहीत. ( माझे तर कुठलेच चांगले उतरत नाहीत असे मला वाटते. )
८. राग वगैरे - मला कसलाही राग येत नाही. त्यात आणखी आपला प्रतिसाद इतका दर्जेदार आहे की असा राग वगैरे येण्याचा संभवच नाही.
९. लेख - आपण मनाच्या अवस्थांवर लेख लिहिण्याचे आश्वासन गेऊन बरेच दिवस झाले, प्रतीक्षा करत आहे.
१०. माझी 'ती' गझल आपल्याला आवडली हे ऐकून आनंद झाला.
 

एकमेकांचे मित्र होणे अधिक गरजेचे आहे. आपण हा मैत्रीचाच हात दिला आहे. स्वागतार्ह आहे. धन्यवाद. लेखही लिहीन. राग येत नाही, ही चांगलीच गोष्ट आहे. पण आपण माझे तर कुठलेच चांगले उतरत नाही, असे लिहिले ते नैराश्यपूर्ण वाटले. ही चांगली गोष्ट निश्चितपणे नाही (हे मी अधिकार नसताना तो घेवून लिहितो आहे; क्षमस्व).
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

अंतर्मुख करणारी गझल.

मी खेळलो जिथे तो वाडा पडून गेला
कोर्‍या इमारतींना थोडा नडून गेला

व्वा.