यातना
सोसतो भारास आहे जीवघेण्या यातनांच्या
जोडतो ठिकर्याच आहे भग्न झालेल्या दिसांच्या
माळल्या होत्या कधी मी रेशमी केसांत तुझिया
सरकती डोळ्यांपुढूनी त्याच त्या वेण्या फुलांच्या
झेलू कुठे मी वार हे? जागाच ना शरिरावरी!
अन बधिरल्या मनात नुरल्या जाणिवाही वेदनांच्या
शोधिसी का उत्तरे? केव्हाच मेले प्रश्न हे!
काय अंती सापडे तुज कापुनी माना मढ्यांच्या?
हारलो होतो कधी मी... गोष्ट ही झाली जुनी
टाळतो मी आठवांना आज भरलेल्या व्रणांच्या!
सार्याच ओठांवर दिसे हे आज माझे नाव, पण
राहीन का लक्षात मी मेल्यावरी थोड्या जणांच्या?
गझल: