ती मजा ना राहिली
आज मी जगण्यामधे ती मजा ना राहिली
रोजचे मरण्यामधे ती मजा ना राहिली
कोवळे सुकुमारसे, दु:ख देता का कुणी?
अश्रु आवरण्यामधे, ती मजा ना राहिली
या मला जिंकून जा, खेळ खेळू वेगळा
खुद्द मी हरण्यामधे, ती मजा ना राहिली
काळज्या म्हणती म्हणे, राठ झाला कोडगा
यास भादरण्यामधे, ती मजा ना राहिली
त्या तुझ्या हसण्यामधे, लाजुनी बघण्यामधे
केस सावरण्यामधे, ती मजा ना राहिली
मी पवित्रा घेउनी, आडवळणाला सुखे
एकटी धरण्यामधे, ती मजा ना राहिली
आज गुरगुरण्यामधे, ती मजा ना राहिली
नाटके करण्यामधे, ती मजा ना राहिली
बुडवुनी पेल्यामधे, बोचरे इतिहास ते
शुद्ध ओसरण्यामधे, ती मजा ना राहिली
जीवनाची ना नशा, आणि मृत्यू लांबतो
मी असे उरण्यामधे, ती मजा ना राहिली
गझल:
प्रतिसाद
अजय अनंत जोशी
सोम, 29/09/2008 - 18:46
Permalink
ती मजा ना राहिली
रोजचे मरण्यामधे ती मजा ना राहिली
भूषण कटककर
सोम, 29/09/2008 - 22:13
Permalink
खरंय!
श्री अजय,
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पण मला तरी असे वाटते की माझी ही गझल विशेष आवडण्यासारखी नसावी. मला वाटले होते की ' आडवळणाला सुखे' या शेराला तरी दाद मिळेल. असुदेत. हरकत नाही. मी असे म्हणेन की माझ्या गझलांसारख्या गझला येतात म्हणुन इतर गझला चांगल्या आहेत हे कळते तरी. हा हा हा हा हा!
हमे गम न मिलता, अगर हम न होते
उन्हे कुछ न मिलता, अगर हम न होते
सब कुछ मिला है , यहॉ शायरोंको
ये आलम न मिलता.........
हा मात्र माझाच शेर बर का?
अजय अनंत जोशी
मंगळ, 30/09/2008 - 11:37
Permalink
आडवळणाला सुखे...
राहिल्यामुळे दिसली नसतील.
आपके शेर का और एक रूप..
तुम्हें गम न मिलता, अगर हम न होते..
नही कुछ चिपकता, अगर हम न होते
समीर चव्हाण (not verified)
मंगळ, 30/09/2008 - 13:30
Permalink
स्मजावून सांगाल का?
मी पवित्रा घेउनी, आडवळणाला सुखे
एकटी धरण्यामधे, ती मजा ना राहिली
मी पवित्रा घेउनी - आडवळणाला सुखे एकटी धरण्यामधे
हे मला somehow disconnected वाटताहेत.
स्मजावून सांगाल का?
भूषण कटककर
बुध, 01/10/2008 - 11:47
Permalink
धन्यवाद व स्पष्टीकरण!
प्रिय समीर,
धन्यवाद!
आडवळणाला सुखे या शेरात मला असे म्हणायचे आहे की:
कवीला सुख कधीच मिळत नाही. मग तो सुख मिळवण्यासाठी कुठेतरी दबा धरून बसतो. एखादे एकटेदुकटे सुख चुकून त्या आडवाटेने जात असताना तो ते नेमके पकडतो. पण आता त्यातही मजा राहिलेली नाही कारण कवीला हे कळून चुकले आहे की ती सुखे स्वेच्छेने यायला तयार नसतात. एकटी सापडतात त्यामुळे असहाय्य होऊन येतात. वारंवार तेच करून त्यातली मजाही संपली आहे.
हा अर्थ माझ्या शेरातील शब्दात कदाचित बरोबर बसत नसावा ज्यामुळे आपल्याला ते थोडे असंबद्ध वाटले असावे. सॉरी. मी जरा आणखी विचार करतो की यात अधिक काही किंवा अधिक वेगळ्या पद्धतीने काही सांगता येईल काय! अर्थात, या गझलेला फारसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे ते जे काही नवीन मला सुचेल ते मी येथे देणार नाही हे निश्चित. हा हा हा!
बरेच दिवसात आपली गझल आली नाही. वाट बघतो आहे.
तिलकधारीकाका
शुक्र, 03/10/2008 - 14:19
Permalink
असे करू नये.
असे करू नये.
प्रत्येक शेराच्या काफियात 'अर' येत असताना फक्त मतल्यातच 'जग'ण्यामधे असे घेणे म्हणजे दहा हजाराचा सूट घालून वर तोंडात बिडी असल्याप्रमाणे वाटते की नाही?
मी इथे तरण्यामधे
मी अता तरण्यामधे
आज मोहरण्यामधे
अशा जरा किमती सिगारेटी नाही का ओढता येत?
मी आपला साईटवरचे वातावरण खेळकर व आनंदी रहावे म्हणुन येतो. बर का?