हळवा नकार - सौ. स्मिता दोडमिसे यांची गझल!

प्रिय गझल वाचकांनो,

ही गझल माझी नाही. माझ्या एक कवयित्री स्नेही सौभाग्यवती स्मिता दोडमिसे यांची ही गझल असून त्यांच्या परवानगीने व सूचनेवरून ती मी येथे सादर करत आहे. या गझलमधील आशय पूर्णपणे त्यांचा असून फक्त तंत्रासाठी काही किरकोळ बदल मी केले आहेत. आमच्यासरख्या नवोदीत गझलकारांना आपण उत्तेजन दिलेत तर आमचा व गझलेचा फायदा होईल.

ही दु:ख फेडण्याची, भारी उधार आहे
जड पारड्यासवे हा, झाला करार आहे

अज्ञातवास घेते ,पत्ता न सांगते मी
शोधून दु:ख काढे, बेटे हुशार आहे

न पाहिले झरोके, स्वप्ने न पाहिली मी
केले गुन्हे ने त्यांची, शिक्षा अपार आहे

पेटून मी उठावे, याचा सराव नाही
मुडपून ओठ देते, हळवा नकार आहे

भोगून वेदनांना, दिवसास पार पाडी
ही रात पार होवो, इतका इसार आहे

तुजवीण राहण्याचा, अभ्यास खूप केला
त्याच्यावरीच आता, पुढची मदार आहे

रंगीन पाखरांच्या, गेल्या विरून गप्पा
रस्त्यात कावळ्यांची, झाले शिकार आहे

आकांत रोखला मी, आक्रोष झाकला मी
फिर्याद हीच, उं, चूं , नाही चकार आहे

या वाढत्या अपेक्षा, ओझी मणामणाची
देतात सांगुनी की, इतकाच भार आहे

जो भेटतो मला तो, मारेकरी मुजोरी
कोणी मरावयाला, मिळणे दुसार आहे

निशःब्द संगीताची, ओठात ओळ माझ्या
बंदिस्त सूर हृदयी, धुमसे वखार आहे

गझल: 

प्रतिसाद

ही गझल तुमची नाही हे कळते आहे.

वृत्तावरील पकड चांगली. खयालही चांगले.

विचारातील स्पष्टता व मांडणीतील सफाई अधिक येणे गरजेचे.
इतर वृत्तांचाही सराव केला जावा.

खालील बदल कसे वाटतात..

स्वप्ने न पाहिली मी, आशा न ठेवली मी
केले गुन्हे न त्यांची शिक्षा अपार आहे
काळे ठसे मनावर काळ्याच अनुभवांचे
ह्दयात कोळशाची झाली वखार आहे
किंवा
आगीत या जगाच्या कोमल विचार जळले
ह्दयात कोळशाची आता वखार आहे