थांबवा हे जग


थांबवा हे जग, मला उतरायचे आहे*
जायचे नाही पुढे थांबायचे आहे

जा कुठेही आज स्वप्नांनो निवाऱ्याला
आज रात्री शांत मज झोपायचे आहे

एक हाताचीच बोटे ती पुरे झाली
सज्जनांना जर कुणा मोजायचे आहे!

रद्द झाल्या का अचानक शर्यती साऱ्या?
मी कधी म्हटले मला धावायचे आहे!

फार झाल्या विनवण्या आता महात्म्यांच्या
मार्ग ते माझे मला शोधायचे आहे

(जयन्ता५२)

*या गझलेची पहिली ओळ 'STOP THE WORLD-I WANT TO GET OFF' या इंग्रजी संगीतिकेच्या शीर्षकावरून सुचली आहे.


गझल: 

प्रतिसाद

बोले तो बोर्नव्हीटा गझल
सिर्फ पाच शेर और बहोत सी शक्ती

सुंदर गझल आहे. दोन शेर वाढवा. इतकी चांगली गझल लगेच संपू नये.

रद्द झाल्या का अचानक शर्यती साऱ्या?
मी कधी म्हटले मला धावायचे आहे!
वाव्वा......फारच आवडला हा शेर.

जा कुठेही आज स्वप्नांनो निवाऱ्याला
आज रात्री शांत मज झोपायचे आहे
चांगला..

एकंदर गझल फार छान झाली आहे.

रद्द झाल्या का अचानक शर्यती साऱ्या?
मी कधी म्हटले मला धावायचे आहे!

व्वा!!!!!!!!!!!!