चरून घेतो...


दिसते आहे कुरण बरे हे,चरून घेतो
कोणी नाही तोवर मी अंथरून घेतो


तिथे म्हणे मी श्वास घ्यायला बंदी आहे
मला नसे माझाच भरवसा मरून घेतो


'नको पसारा'म्हणालीस तू दिसावयाला
बळे बळे मी माझेही आवरून घेतो


तुझे अचानक आजच येण्याचे ठरलेही?
'थांब जराशी'माझ्यामध्ये शिरून घेतो


'करायचे भलतेच कशाला 'मीही म्हणतो
करावेच लागले मात्र,मी स्मरून घेतो


कशी वागती?माणसेच ना?प्रश्न पडावा
वळण शेवटी जो तो अपुल्या घरून घेतो


होता सुटला सहीसलामत,सुखात मेला?
देव म्हणे एका जन्मातच भरून घेतो

                     

          
गझल: 

प्रतिसाद

छान आहे गझल! करारनामेसारखी!