गंध नाही फारसा...
वर्तमानाशी जुळाला बंध नाही फारसा
अन भविष्याचा मनाला गंध नाही फारसा...
सोसण्याचा तो पुराणा भोग आहे आजही,
सोसण्याचा तो जुना आनंद नाही फारसा
कायदे तोडावयाचे वेड आता संपले..
कुंपणे ओलांडण्याचा छंद नाही फारसा
मोरपंखी या व्यथांना तू सये माळून घे...
हाय! आता मोगराही धुंद नाही फारसा
फारशा आता अपेक्षा ठेवणे तू सोड गे,
माझिया ह्रदयात आता स्पंद नाही फारसा...
गझल:
प्रतिसाद
विश्वस्त
गुरु, 11/09/2008 - 20:54
Permalink
अलामत पाळली गेलेली नाही
अलामत पाळली गेलेली नाही. पहिल्या द्विपदीतल्या बंध आणि गंध नंतर अंध, व्यंध अशी यमके यायला हवी होती.
विचाराधीन ह्या विभागात तंत्रशुद्ध नसलेल्या रचना सावकाश हलविण्यात येतात, ह्याची नोंद घ्यावी.
भूषण कटककर
शुक्र, 12/09/2008 - 09:46
Permalink
खरंय!
अलामतीसंदर्भातली प्रतिक्रिया उचित आहे. पण एवढे खरे की कायदे तोडावयाचे हा शेर स्पर्शुन गेला.
ज्ञानेश.
शुक्र, 12/09/2008 - 14:32
Permalink
मान्य!
मी अजून नवा/ शिकावू उमेदवार आहे.
तुमच्यासारख्या जाणत्या लोकांनि मार्गदर्शन केले, तर नक्कि चांगले लिहेन.
़कॄपया मार्गदर्शन करत रहा.
भूषण कटककर
शुक्र, 12/09/2008 - 15:46
Permalink
अहो हे काय हे?
अहो साहेब? मी कसला जाणकार? इथे माझ्या तथाकथित गझलांची लक्तरे काढतात. मी आपले कळले तेवढे लिहिले. बाकी तुमची गझल आवडण्यासारखी आहे हे मात्र खरे.