तारण्याची कारणे
शोधुनी काढू कशाला हारण्याची कारणे
मीच माझी जीत का नाकारण्याची कारणे
तू इथे होतीस तेव्हा कारणे होती कुठे
आणि आता ना घरे शाकारण्याची कारणे
देव देतो स्वप्न आणि तोच देतो लोचने
देत ना स्वप्नांस त्या साकारण्याची कारणे
कायसे माझ्यात? सारे जागजागी शोधती
मारण्याची आणि माती चारण्याची कारणे
हात ताणावे तिने देण्यास साध्या आळसा
या हवेची संपती संचारण्याची कारणे
काय मी नरकात केले? धाडले येथे मला
शुल्क सांगा एवढे आकारण्याची कारणे
खेळवाया लागतेना या जगालाही कुणी
यामधे दडलीत आम्हा तारण्याची कारणे
लाभली गझलेत माझी भारण्याची कारणे
संपली तुम्ही मला हाकारण्याची कारणे
गझल:
प्रतिसाद
अजय अनंत जोशी
बुध, 10/09/2008 - 20:43
Permalink
हे
हात ताणावे तिने देण्यास साध्या आळसा
या हवेची संपती संचारण्याची कारणे
छान.
आणखी एक वाढवा
तार होती तोकडी, खुंटी असे ही मोकळी
पण तरी मिळतील त्यां .... झंकारण्याची कारणे
ज्ञानेश.
गुरु, 11/09/2008 - 17:00
Permalink
वा!
सम्पुर्ण गझल भावली.
देव देतो स्वप्न आणि तोच देतो लोचने
देत ना स्वप्नांस त्या साकारण्याची कारणे
हा शेर तर खासच.