एक संवाद-६



: 'गज्जल' हा अक्षरशः तालबद्ध असल्यामुळे त्यात स्वरविस्ताराला वा चिजेइतका मिळू शकत नाही, असे माधवराव म्हणतात त्याबद्दल काही?
: मग सध्या काय सुरू आहे गझलेच्या क्षेत्रात? म्हणजे, 'गानेवाले मजे लेलेके नहीं गा सकते,' असेच म्हणायचे आहे ना माधवरावांना? मग गुलाम अलीचे गाणे काय आहे? मेहदी हसन कसा गातो? बेगम अख्तरने सगळ्या सीमा कशा पार केल्या? ती मलिका-ए-तरन्नुम कशी बनली?
आणि वस्तुतः तालबद्ध असणे म्हणजे मात्राबद्ध असणे आणि मात्राबद्ध असणे म्हणजे संगीतबद्ध असणे. कारण संगीतात मात्रा महत्त्वाच्या व उपयुक्त. पर्यायाने तालबद्ध असणे म्हणजे संगीताला अनुकूल असणे आणि आज तर गझलेत इतकी क्रांती होते आहे की, आपले काव्यप्राधान्य तसेच राखून तिने स्वरप्रधान संगीतातही मानाचे स्थान मिळवले आहे. अहो, शास्त्रनिष्ठ गवयांचे नाक मुरडणे केव्हाच समाप्त झाले आहे. ते सुद्धा गझल गाऊ लागले आहेत. एकच उदाहरण-- उस्ताद हुसैन बक्ष.


: "शास्त्रोक्त गझलांस अवश्य असणारे एकयमकीपणाचे हे एखाद्या क्लिष्ट लगक्रमाप्रमाणेच एखाद्या भावगीताच्या रचनेस जाचक हो," असे माधवरावांनी म्हटले आहे व 'हे बंधन चार-पाच द्विपदींच्या पुढे पाळणे झाल्यास सहजतेचा बळी द्यावा लागतो व यमकेही तितकी सुंदर जुळत नाहीत,' असे म्हटले आहे. तुम्हाला ही बंधने जाचक वाटतात का?
: भावगीत! भावगीत! भावगीत! पुन्हा तेच. मी माधवरावांच्या गझलेच्या रूपात भावगीत लिहीत नाही. व मला यमकाचा काही जाचही होत नाही. अहो, कोणत्याच भाषाप्रभूला 'अहले-जबान' कवीला यमकाचा जाच होणार नाही. गालिबला झाला नाही. मोमिनला झाला नाही. नाचता येईना अंगण वाकडे!


: होय खरे आहे. त्यांनी तर १७ शेरांच्या काही गझला रचल्या आहेत.
: जास्त! ज्याअर्थी माधवराव गझलेला भावगीताचा प्रकार समजत होते, त्याअर्थी गझल कशी लिहितात हेच माधवरावांना माहीत नव्हते. गझल अगदी आरामात लिहितात. पहिल्या दोन ओळी  आल्या, वृत्त कोणते, यमक कोणते कळले, गझलेची 'जमीन' कळली. झाले! अब फुरसतसे लिखेंगे.
काय जे होणार आहे ते मला माहीत आहे
मी तरीही जीवनाचे गीत आलापीत आहे
बस दो 'मिसरे' आ गये, एक शेर मिळाला. पुष्कळ झाले. बारा वर्षांनी लिहू.


: मला वाटते गालिबच्या कितीतरी गझला यामुळेच अपुऱ्या राहिलेल्या दिसतात.
: बिलकुल सही! अहो, हा गोटीबंद प्रकार आहे. ठासून भरलेला ताकदीचा प्रकार आहे. एकेक शेर लिहिताना टाके ढिले होतात माणसाचे आणि माधवराव म्हणतात सहजतेला बाधक ठरते. इतकेच बाधक ठरत असेल तर गझल कशाला लिहिता? दुसरा काव्यप्रकार लिहा. गझलेचा काही कायदा आहे ना? गझलेच्या संदर्भात तुम्ही सांगता ते खरे नाही. सुरेश भट सांगतो ते खरे आणि सुरेश भटाने काही नव्याने सांगितले नाही. उर्दू कवींनी आणि उर्दू काव्यमीमांसकांनी हे यापूर्वीच सांगितले  आहे.
काय म्या पामरे | बोलावी उत्तरे |
परी त्या विश्वंभरे | बोलविले ||


: हे उर्दूचे विश्वंभर कोण?
: अल्लामा शिबली नूमानी (१८५७ ते १९१४)


: या पूर्वसूरींबरोबरच काही समकालीनांची तुम्ही मदत घेत नाही का?
: घेतो ना. या कामात मला माझे परममित्र हाजी वली ऊर्र रहमान सिद्दीकी ह्यांची सुरवातीपासून आजपर्यंत मदत झाली. त्यांना मी माझा 'एल्गार' हा काव्यसंग्रह अर्पण केला आहे. वलीभाईंच्या जोडीला आता डॉ. सय्यद नईमुद्दीन ह्यांचीही मला मदत होते आहे. डॉक्टरसाहेब तुर्कस्तानातील इस्तंबूल विद्यापीठाचे फार्सी व तुर्कीचे डॉक्टर असून शिवाय ते अरबी व उर्दूचेही पंडित आहेत. गझल समजून घेण्यासाठी मला या दोघांचीही बहुमोल मदत झाली आहे.


: मराठीत गझल रुजावी आणि तिचा विकास व्हावा या दृष्टीने तुम्ही काही इतर प्रयत्न केले आहेत का?
: होय! मी केवळ गझल लिहूनच थांबलो नाही. मी महाराष्ट्राची उदयोन्मुख पिढीच गाठली. माझा कयास आहे की काव्य आणि काव्यप्रकारांच्या संदर्भात पाच वर्षांपूर्वीची परिस्थिती आज नाही. याचा अर्थ मराठीत गझलच राहणार आहे असा नाही. पण तुम्हाला गझल टाळता येणार नाही.


: टाळता येणार नाही हे दिसतेच आहे. उलट प्रचंड प्रमाणात गझल लिहिली जात आहे. परंतु प्रचंड प्रमाणात होणारे हे उत्पादन स्वागतार्ह किती मानायचे?  सध्याच्या काव्यप्रवाहाचा तोल तर ती बिघडून टाकणार नाही ना, अशी चिंता त्यामुळे निर्माण झाली आहे. अनुकरणामुळे येणारा हिणकसपणा तीत अधिक आहे. याबाबत आपली भूमिका काय आहे?
: उत्पादनवाढीच्या संदर्भातील आक्षेप संपूर्ण कवितेवरच घेता येण्यासारखा आहे. पण गझलेचे दर्जा नसलेले उत्पादन होऊ नये म्हणून मी प्रयत्नशील आहे. होतकरू गझलकारांकडे मी माझ्यातर्फे 'गझलेची बाराखडी' पाठवतो. अधिक आशादायक वाटला तर माझा 'एल्गार' हा काव्यसंग्रह पाठवतो. विकत नाही मी तो आता. सप्रेम भेट म्हणून पाठवतो, स्वखर्चाने. याच काहीच मॉरल परिणाम होत नाही काय? एखादा होतकरू गझलकार निसटू नये म्हणून मी सावध असतो. त्याला घडवण्याचा प्रयत्न करतो. असे अनेक गझलकार मी घडविले आहेत. आणि हयात असेपर्यंत अनेक घडवायचे आहेत. एखादा उत्तम संभाव्य गझलकार दिसला की मला लॉटरी लागल्यासारखा आनंद होतो. मला सांगा, कोण लिहिते करते नव्या पिढीला? कुणाचा संवाद आहे नव्या पिढीशी? माझा वेळ खर्च करून 'मेनका'सारख्या मासितकातून सदर चालवितो मी! कशाकरता!


: अशा काही तुम्ही घडविलेल्या नव्या मराठी गझलकारांची नावे सांगता येतील का?
: कितीतरी सांगता येतील. अरुण सांगोळे, म. भा. चव्हाण, मधुसूदन नानिवडेकर, श्रीराम पचिंद्रे, बंडू चक्रधर, नीळकंठ घोडे, संजय धामोरीकर, राजीव पांडे, प्रल्हाद सोनेवाने, ल. स. रोकडे, प्रदीप निफाडकर, दीपक करंदीकर, सर्वोत्तम केतकर, हेमत डांगे, दीपमाला कुबडे, मुबारक शेख, नंदिनी पाटील, अनिल पाटील, सुभाषचंद्र वैष्णव...