एक सवांद -५

: सामाजिक बांधिलकी म्हणून गझलेचा आपण विचार करता का?
: असे म्हणण्यापेक्षा, सर्व सुंदर गोष्टी सर्वांच्या मालकीच्या असल्या पाहिजेत, असे मला वाटते. तेच मी माझ्या गझलेत सांगत असतो.

: असा विचार करताना कोणते सामाजिक तत्त्वज्ञान आपल्याला जवळचे वाटते?
: समाजवादाचे!

: गझल हा काव्यप्रकाराप्रमाणे संगीतप्रकारही आहे व आज विशेषतः हिंदी-उर्दूमध्ये तो अधिकाधिक लोकमान्य व गायकमान्य संगीतप्रकार होऊ लागल्याचे दृष्टोत्पत्तीस येते. संगीताचे हे प्राबल्य हळूहळू मराठी गझलेतही शिरू लागणार. तेव्हा संगीत आणि गझल यांच्या परस्परसंबंधांवर आपण काही प्रकाश टाकू शकाल का? गझलेमध्ये संगीताचे महत्त्व कितपत असते. असायला हवे?
: गझलगायन हा शब्दप्रधान गायकीचा प्रकार आहे. मराठी माणसे उर्दू गझल ऐकतात तेव्हा पुष्कळदा ती स्वरांची बंदिश एन्जॉय करतात. तबला कसा वाजतो, लग्गे कसे लागतात? ठेका कसा आहे? नाद कसा आहे? स्वर कसे आहेत? तात्पर्य मराठी माणसाचे लक्ष गायनकलेकडे जास्त असते. पण हे लक्षात घेतले पाहिजे की गझलमध्ये शब्दांसाठी स्वर आहेत, स्वरांसाठी शब्द नाहीत. गझलेचा समावेश 'लाइट क्लासिकल'मध्ये होतो पण इतर 'लाइट क्लासिकल' संगीतप्रकार आणि गझल यांच्यामध्ये फरक आहे. कजरी, होरी, ठुमरी, दादरा, चैती यांच्यामध्येही शब्द असतात, पण ते निमित्ताला. ठुमरीमध्ये स्वरविस्तार आहे. स्वर फुलवायचे असतात. पण गझलेमध्ये एकेक शब्द महत्त्वाचा. तुमच्याजवळ मुळात गझल चांगली नसेल तर ती एवढी रंगत नाही. बेगम अख्तर जरी असेल तरी चांगल्या शायरी अभावी ती कधी कधी नामोहरम होईल. गझलेचे जे दर्दी ऐकणारे असतात, ते गायक पुढच्या ओळीत काय म्हणणार याचा अंदाज करीत असतात. गायक पहिली ओळ घोळवून घोळवून गात असतात. आणि रसिक त्या ओळीतील अर्थ लक्षात घेऊन आता हा गुंता कसा सोडविणार? कसा वळणार? कोणते यमक कसे आणणार? याचा अंदाज बांधतात. ते यमक आले की लोकांना मजा वाटते. पुष्कळदा ते यमकही गुगली खेळते तुमच्याशी. गुंता वेगळ्या पद्धतीने सोडवला जातो. त्यात अनोखी अनपेक्षितता असते व वेगळी मजाही असते. सांगायचे तात्पर्य  इतकेच, की गझलेत संगीताचे महत्त्व दुय्यम असते आणि असायला हवे.

: गझलेच्या संदर्भात माधव जूलियन यांची काही परंपरा आहे का? जर ती असेल तर त्याच परंपरेत आपण गझल-लेखन करता असे म्हणता येईल का?
: माझा अवतार होण्यापूर्वी 'गझल' हा शब्द 'गज्जल' म्हणून माधवरावांनी महाराष्ट्राला परिचित करून दिला. मी साधारणतः ५५-५६ च्या सुमारास गझला लिहू लागलो. तोपर्यंत माझ्या दृष्टिपथास त्यांचे पुस्तक आलेले नव्हते. जेव्हा ते नजरेस आले आणि मी चाळले तेव्हा गझलांचा संग्रह म्हणून वाचायच्या लायकीचे ते पुस्तक नाही हे माझ्या लक्षात आले. माधवरावांच्या आधी अनेक सुंदर दीवान मी वाचले होते. त्यावरच माझी अभिरुची पोसली गेली. मी गझलकार म्हणून घडत गेलो, या माझ्या घडण्यात केवळ माधवरावच नव्हे, तर कोणत्याही मराठी कवीचा हातभार नाही.

: तुम्ही घडला नसाल, पण त्यांचीही काही परंपरा, योगदान असेल ना?
: गझलेची परंपरा माधवरावांनी सुरू केली की नाही याबद्दल विद्वानांनी काथ्याकूट करावा. पण मला वाटते, त्यांनी 'गज्जल' हा शब्द आणला; पण परंपरा मात्र सुरू केली नाही! किंवा त्यांची परंपरा निर्माण झाली नाही.  नंतर त्यांच्यासारखे तसे 'गज्जल' किती जणांनी लिहिले?

: 'गज्जल' हा शब्द तुम्हाला मान्य नाही हे लक्षात आले. मला तर माधवरावांची गझलेसंबंधीची काही विधाने विसंगत वाटतात. माधवरावांनी शेराच्या स्वयंपूर्णतेकडे आणि संज्ञाप्रवाहाकडे दुर्लक्ष केल्यासारखे वाटते. माधवरावांचा पुढील काही गझलकारांवर इतका पडला की, गझलेत शेर निर्माण न होता भावगीताची कडवीच एका वेगळ्या आकृतिबंधात निर्माण झाली. माधवरावांच्या गफलतीबद्दल तुम्ही काही सांगू शकाल?
: बरोबर आहे तुमचं म्हणणं. आता माधवराव म्हणतात, "भावगीतात एखाद्या द्विपदीचा मागील वा पुढील द्विपदीशी काही भावसंबंध नसणे हा दोष होय. हा दोष मराठी गझलांत टाळला आहे." गझल हे भावगीत आहे असे माधवराव समजतात, हा माधवरावांचा सर्वात मोठा गोंधळ आहे. भावगीतात एक 'थीम' असते. गझलेत ती असतेच असे नाही. एक संपूर्ण भाव गझलेत असू शकतो. जसे,
जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही
एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही
जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही
यामध्ये एकच सूर आहे. निराशेचा म्हणा, दुःखाचा म्हणा किंवा रियलायझेशनचा. पण यातही प्रत्येक द्विपदीचे अस्तित्व स्वतंत्र आहे. तुम्ही केवळ मधूनच एखादी द्विपदी वाचली, तरी ती संपूर्ण कवितेचा आनंद देऊ शकेल. एक शेर म्हणजे एक 'कंप्लीट युनिट' आहे.  आणि आता सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वेळी असा एकच सूर राहील असे नाही.

: पण माधवराव तर याला दोष समजतात?
: अहो, पण हा अधिकार त्यांना कुणी दिला? गझल म्हणजे शेवटी काय? यमकाची  सुई आणि वृत्ताचा धागा यात ती कुशलतेने गुंफलेली  आहे. त्या हारामध्ये काही फुले गुलाबाची, काही झेंडूची, काही चमेलीची आहेत. हार मात्र एकच आहे. हारातली फुले वेगवेगळी असतात आणि गुंफलेलीही असतात.

: माधवराव गझलेला 'भावगीत' समजत, पण तिचे भावगीतापासून असणारे वेगळेपण काही उदाहरणांच्या साहाय्याने स्पष्ट करता येईल का?
: का नाही करता येणार? मी काही शेर सांगतो. त्यात तुम्हाला काही भावगीतासारखे काही जाणवते का सांगा मला.
है हसूले आरज़ू का राज़ तर्के आरजू
मैंने दुनिया छोड दी और मिल गयी दुनिया मुझे
अभिलाषेच्या पूर्तीचे रहस्य अभिलाषेचा त्याग होय. मी दुनियेला सोडून दिले आणि मला दुनिया लाभली.
किंवा
मैं मैकदे की राहसे होकर गुजर गया
वर्ना सफर हयात का काफी तवील था
मी मद्यशाळेच्या 'शॉर्टकट'ने गेलो. एरवी जीवनाचा प्रवास कंटाळवाणा झाला असता.  किंवा
जितके जगावयाचे तितके जगून झाले
फिरते उगीच जाते जगणे दळून झाले
आता यात भावगीत कुठे आहे? जे काही गेय आहे ते सर्व भावगीत असे माधवरावांनी मानले. भावगीतात 'गीत' हा शब्द आहे. पण गीत आणि कविता यात फरक आहे. कवितेत मुखडा नसतो, गीतात मुखडा असतो. कवितेत अंतरा नसतो पण गीतात अंतरा असतो. गीतात अंतऱ्यानंतर मुखड्याला जोडणारी एक ओळ असते. सांगायचा मुद्दा एवढाच की, कविता म्हणजे भावगीत म्हटले, तर गझलेचा मुखडा कोणता? गझलेचा अंतरा कोणता? गझलेची थीम कोणती? गझलेचे खरे गमक म्हणजे गझलेतील प्रत्येक शेर स्वतंत्र असतो. एक क्लोज युनिट असते ते. गझल उलगडत नसते. कारण तिला थीम नसते.