प्रघात

..........................
प्रघात
..........................


तुझी व्यथा काळजात आहे  कुठेतरी !
कुठेतरी आत आत आहे...कुठेतरी !


कशास आता उगाच `नाही` म्हणायचे ?
- तसे तुझ्याही मनात आहे कुठेतरी !!


उजाडले, हे पटायला वेळ लागतो...
मनात या चांदरात आहे कुठेतरी !


गिळून अपमान टाकला मी कधीच जो -
 तुझ्या जिवालाच खात आहे कुठेतरी !


दुरून माझ्या समीप आले कुणीतरी
- कुणीतरी दूर जात आहे कुठेतरी !!


सफेद आश्वासने खरी वाटती जिला...
खुळी अशीही जमात आहे कुठेतरी !


जिवंत नाही कधी कुणी देव पाहिला...
म्हणायचे पण - `हयात आहे कुठेतरी!`


सभोवताली सुगंध दाटे उगाच का ?
कुणीतरी गीत गात आहे कुठेतरी !


कृतघ्नतेला कृतज्ञता नाव द्यायचे...
म्हणे, असाही प्रघात आहे कुठेतरी !



-प्रदीप कुलकर्णी


 


 



 

गझल: 

प्रतिसाद

जिवंत नाही कधी कुणी देव पाहिला...
म्हणायचे पण - `हयात आहे कुठेतरी!`



कृतघ्नतेला कृतज्ञता नाव द्यायचे...
म्हणे, असाही प्रघात आहे कुठेतरी !


हे दोन्ही शेर फारच आशयपूर्ण.
मस्त!!

सफेद आश्वासने खरी वाटती जिला...
खुळी अशीही जमात आहे कुठेतरी !

कृतघ्नतेला कृतज्ञता नाव द्यायचे...
म्हणे, असाही प्रघात आहे कुठेतरी

हा शेर खूपच आवडला. सुरेख गझल.
सोनाली

चांदरात, जमात, हयात आणि प्रघात शेर मस्तच!!
मतलाही अगदी हळुवार आहे...