'मग माझा जीव'ची आठवण
'रंगुनी रंगात सार्या, रंग माझा वेगळा' ही सुरेश भटांची कविता स्वरबद्ध केल्यानंतर या एका छंदात मन खूप रमू लागलं. पुण्यातल्या निरंकुश आयुष्यात तसा खूप वेळ असायचा. कविता सोडून इतर काही लिहिण्याचा विचारही मनात नव्हता. कविता सटीसामाशी आणि तिची लहर लागेल तेव्हाच भेट द्यायची. त्यामुळं एरवी माध्यमांशी थोडाबहुत संपर्क, वाचन, मुख्यतः फर्ग्युसन रोडवरच्या 'स्वरविहार'मध्ये भरपूर श्रवण, 'कॅफे डिलाइट' मधल्या बैठका, कसल्या ना कसल्या रिहर्सल्स आणि भरपूर पायी भटकंती- असा एकूण जीवनक्रम होता. यात दिवसाच्या काही घटका हातांना हार्मेनियम चिकटलेली असायचीच. साहजिकच जिगर मुरादाबादी, गालिब, दाग यांच्या गझला, गोविंदाग्रज- रेव्हरंड टिळक- बोरकर- इंदिरा संत- आरती प्रभू- ग्रेस यांच्या आवडलेल्या कवितांना चाली लावणे हा नित्याचा रिवाज बनला होता. अर्थात हा सगळाच मामला तसा 'स्वान्त सुखाय' अशाच स्वरूपाचा प्रामुख्यानं होता. पण त्याचाही परिघ हळुहळू वाढत चालला.
माझ्यातला संगीतकार प्रथम झोतात आणण्याचं श्रेय अरुण काकतकरला द्यायला हवं. मुंबई दूरदर्शनवर 'प्रतिभा आणि प्रतिमा' साठी कविवर्य सुरेश भटांच्या मुलाखतीचा आणि काव्यगायनाचा कार्यक्रम त्यानं योजला होता. मुलाखतकार होते-सुरेशचंद्र नाडकर्णी! या कार्यक्रमात मी स्वरबद्ध केलेली भटांची 'रंग माझा वेगळा' श्रीकांत पारगांवकरच्या आवाजात सादर करावी, अशी कल्पना त्यानं सुचवली. संगीतकार म्हणून नेहमीच गायकाची निवड ही मला एखाद्या भूमिकेसाठी अभिनेत्याची निवड करण्याइतकीच महत्त्वाची वाटते. स्वररचनेचं व्यक्तिमत्त्व आणि गायकाच्या स्वराचं व गायकीचं व्यक्तिमत्त्व यांच्यातील सायुज्य ही मला नितांत आवश्यक गोष्ट वाटते. त्यादृष्टीनं 'रंग माझा वेगळा' साठी मला देवकी पंडितचा आवाजच हवा होता. तेव्हा ती कविता तिला गायला देऊन श्रीकांतसाठी भटांची दुसरी एखादी कविता निवडून स्वरबद्ध करावी, असा विचार केला आणि त्यादृष्टीनं शोध घेऊ लागलो.
त्या काळात मी बांद्र्याला साहित्य सहवासमध्ये राहत होतो. दिनकर साक्रीकरांचा धाकटा आर्किटेक्ट मुलगा राजू खास दोस्त बनला होता. रात्री पायर्यांवर गप्पा मारत बसलो असताना मी सहज त्याला माझा कवितेचा चाललेला शोध सांगितला. काही क्षणात तो एकदम म्हणाला, "तू नेहमी दोनच ओळी गुणगुणत असतोस, त्या सुरेश भटांच्याच आहेत ना? मग माझा जीव... असे काहीतरी शब्द आहेत बघ." मी चमकून विचारलं, "मी आपला चाळा म्हणून ते गुणगुणत असतो. काव्यगायनासारखं. पण ती तुला चांगली चाल वाटते?" तो गोंधळून म्हणाला, "का? ती छानच चाल आहे की!" असा अगदी अकल्पितपणे माझा कवितेचा शोध संपला. कारण सुरेश भटांची ती मनस्वी कविता मला फार म्हणजे फारच आवडायची.
"मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल,
अन् माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल..."
मी गुणगुणण्यासाठी फारसा विचार न करता निवडलेले स्वर "यमन"चे आहेत, हे लक्षपूर्वक पाहिल्यावर जाणवलं. त्या कवितेचा नितळपणा यमनच्या जातकुळीचा होताच. तेव्हा त्याच अंगानं पुढं जात राहिलो आणि संपूर्ण कविता स्वरबद्ध झालीही. श्रीकांतला ते गाणं शिकवू लागल्यावर एक गोष्ट जाणवली. "मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल" ही गीताची पहिली ओळ केवळ म्युझिक पीसमधून उठणं पुरेसं अर्थपूर्ण नाही. त्या 'मग' या शब्दाच्या आधी जे सुप्त काही आहे, ते शब्दांतूनच दिसायला हवं. पण मुळात कविता एवढीच आहे म्हटल्यावर काय करणार? सहज भटांचा काव्यसंग्रह चाळताना आरंभीच्याच पानावर एक छोटंसं मुक्तक भेटलं-
"दुःखाच्या वाटेवर गाव तुजे लागले
थबकले न पाय तरि, हृदय मात्र थांबले
वेशीपाशी उदास हाक तुझी भेटली
अन् माझी पायपीट डोळ्यांतून सांडली...
मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल..."
युरेका! म्हणजे तोही शोध संपला. 'प्रतिभा आणि प्रतिमा'मध्ये ही दोन्ही गाणी गाजली. नुकताच "सह्याद्रीच्या पाऊलखुणा"मध्ये इतक्या वर्षांनी तो कार्यक्रम दोन वेळा पुनःप्रक्षेपित झाला. परवा अल्फा मराठीच्या "नक्षत्रांचे देणे- सुरेश भट" मध्येही या दोन्ही गाण्यांचा समावेश झाला. श्रीकांत पारगांवकरच्या प्रत्येक रंगमंचीय कार्यक्रमांत त्याला हे गीत हटकून गावं लागतंच.
पण त्या गाण्याची कहाणी इथंच संपत नाही. त्या काळात गाण्यांची रेकॉर्डिंग मर्यादित बजेटमुळं मुंबई दूरदर्शनच्या "सी" स्टुडियोतच व्हायची. आजच्या अत्याधुनिक युगात हे म्हणजे आदिमानवाच्या काळात गेल्यासारखंच वाटेल. गायक, वाद्यवृंद आणि छोट्याशा रेकॉर्डिंग मशिनसह रेकॉर्डिस्ट छोटंसं कोंडाळं करून बसलेले. कानाला हेडफोन्स लावून बसलेल्या रेकॉर्डिस्टखेरीज कुणालाही नक्की काय घडतंय, याचा पत्ता लागायचा नाही. वाद्यवृंदही छोटासाच योजलेला. पण एका निश्चित विचारानं 'रंग माझा वेगळा'साठी सारंगी किंवा तारशहनाइर् आणि 'मग माझा जीव'साठी दोन बासर्या हे मी नक्की ठरवलं होतं. माझा तेव्हाचा ऍरेंजर होता- विलास जोगळेकर. एक बासरीवाला म्हणून पुण्याहून अजित सोमण आला होता आणि त्याला जोड म्हणून मुंबईतला नवखा वाटणारा, काळा, किरकोळ अंगाचा एक पोरसवदा वादक आला होता. पहिल्या 'रंग माझा वेगळा'च्या वेळी अनपेक्षित व्यत्यय येऊन ताण निर्माण झाला. भरपूर चिडचिड झाली. त्यातच या 'मुंबईकर मुरलीधरा'नं येऊन 'रंग माझा वेगळा'मध्येही बासरी वाजवण्याची इच्छा व्यक्त केली. पण मला त्या गाण्यात बासरीचा 'वास'ही नको होता आणि हे मी त्याला जरा जास्तच फटकळपणे सांगितलं. तो जरा दुखावूनच दूर गेला असावा. पण तिकडे लक्ष द्यायला सवड होती कुठे? पहिल्या गाण्याचं रेकॉर्डिंग बरंच लांबलं. त्यातच विलास जोगळेकर येऊन सांगू लागला, 'तो बासरीवादक होणार्या उशिरामुळं वैतागलाय. जाणार म्हणतोय.' मी भडकलोच. ताडकन म्हणालो, 'जाऊ दे त्याला. एक बासरी तर आहेच ना. जा म्हणावं खुशाल.' पण मग क्षणभरानं थोडं सावरून मी थेट त्याच्याशी बोललो. त्याच 'सौम्य' मग्रुरीनं त्याची समजूत घातली. तोही धुसफुसत थांबला. दुसर्या गाण्याला सुरुवात करताना मी थोडीशी फुंकर घातली- 'या गाण्यात भरपूर स्वातंत्र्य घ्या. हवं तेवढं वाजवा.'
प्रत्यक्ष रेकॉर्डिंगच्या वेळी काही करणं अशक्यच होतं. नंतर कंट्रोल रूममध्ये जाऊन फायनल गाणं ऐकताना मी, माझ्या चेहर्यासकट, पडलोच. गाण्यातल्या सार्या छोट्या छोट्या मोकळ्या जागांचा 'अवकाश' बासरीनं जणू भरून टाकला होता. ती एक विलक्षण सौंदर्यानुभूतीच होती. हा खरंच मघाशी तडकून निघून गेला असता तर? मी त्याच्याजवळ जाऊन मनापासून त्याची माफी मागितली. तोही मंदसा हसला आणि क्षणात खूप जवळचा झाला. त्याचं नाव- रमाकांत पाटील. साध्या कोळी कुटुंबात, झोपडीत जन्मलेला, वाढलेला हा मुलगा पुढे हरीप्रसादांचा पट्टशिष्य बनला. पुढं त्यांच्या जोडीनं ध्वनिमुद्रणं गाजवू लागला. माझ्याही अनेकानेक रेकॉर्डिंग्जमध्ये तो होताच. पाहता पाहता तो श्रेष्ठ श्रेणीला पोहोचला. वैभव, नावलौकिक कमावू लागला. आणि एके दिवशी अचानक कळलं की, वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी गेलाही. त्याचं मरण तर धक्कादायक आहेच, पण त्याहीपेक्षा धक्कादायक आहे ते त्याला मरणापर्यंत खेचत नेणारं त्याचं आयुष्यातलं अतर्क्य, अनाकलनीय कोसळणं. हे 'कोसळणं'च भल्या भल्या कलावंतांचा घात करतं. आमच्या पहिल्या भेटीतलं त्याचं ते जिव्हारी दुखावणं, बिथरणं मला आठवलं. या मनस्वितेचाच तो बळी असेल का? मग अशी मनस्विता ही वरदान म्हणावी की शाप?
...आता 'मग माझा जीव'ची आठवण मला सुखावणारी आहे आणि दुखावणारीही.
--सुधीर मोघे
(लोकसत्ता, 'चतुरंग' पुरवणीतून साभार)