चैन

शब्द हल्ली सारखे छळतात मजला
आणि ओळी चार मग  सुचतात मजला


बोलली नाहीस तू काही तरीपण
अर्थ नजरेचे तुझ्या कळतात मजला


चांदण्यांना रोजची का रात्रपाळी?
प्रश्न हे आता असे  पडतात मजला


कायदे काही शहाण्यांचे  असू द्या
फायदे वेडात हे दिसतात मजला


मी भरवसा माणसांचा काय द्यावा?
सावल्याही जर अशा गिळतात मजला


देवळांची सर्व ह्या झाली दुकाने
भावभक्ती रोज ते विकतात मजला


एकदा घेईन म्हटले मी भरारी
पिंजरे छद्मीपणे हसतात मजला


चैन रडण्याची मला करता न आली
एवढी कोठे सुखे मिळतात मजला

गझल: 

प्रतिसाद

छान...आवडली गझल.  आणखी येऊ द्या. शुभेच्छा.