ठिपका

घडायचे ते घडले काही टळले नाही
त्या वळणावर तुला भेटणे चुकले नाही


कळले नाही कसा कधी संवाद संपला
वाद कधी मग सुरू जाहला कळले नाही


आज अचानक अर्थ असा हा समोर आला
त्या धक्यातुन शब्द कधी सावरले नाही

तू ओठांनी निर्धाराने  खूप लपवले
पण डोळ्यांना तुझ्या कधी ते जमले नाही

तशी जुनी शब्दांची माझी ओळख आहे 
पण अश्रूंना का त्या मी ओळखले नाही


मान्य कधीही केले नाही आपण चुकलो
दोघांमधले अंतर मग हे घटले नाही


बदलत गेला रस्ता अन मी बघत राहिलो 
रस्त्यासंगे मला बदलणे जमले नाही


तू जाताना नजर तुझी माघारी वळली
का माघारी पाय तुझे पण वळले नाही?

बघत राहीलो दूर तुला ठिपका होताना
मला कळेना का डोळे हे मिटले नाही 

-अनिरुद्ध अभ्यंकर



गझल: 

प्रतिसाद

कळले नाही कसा कधी संवाद संपला
वाद कधी मग सुरू जाहला कळले नाही
वा...
मान्य कधीही केले नाही आपण चुकलो
दोघांमधले अंतर मग हे घटले नाही
छान...

बदलत गेला रस्ता अन मी बघत राहिलो 
रस्त्यासंगे मला बदलणे जमले नाही
मस्त...

बघत राहीलो दूर तुला ठिपका होताना
मला कळेना का डोळे हे मिटले नाही 

ठिपका होत जाताना बघत राहणे...चांगली  कल्पना
 
छान. आवडली गझल, अनिरुद्ध.
शुभेच्छा.
 

अनिरुद्धजी,
गजल आवडली.
हे शेर विशेषच छान आहेत -
कळले नाही कसा कधी संवाद संपला
वाद कधी मग सुरू जाहला कळले नाही
मान्य कधीही केले नाही आपण चुकलो
दोघांमधले अंतर मग हे घटले नाही
बदलत गेला रस्ता अन मी बघत राहिलो 
रस्त्यासंगे मला बदलणे जमले नाही
बघत राहीलो दूर तुला ठिपका होताना
मला कळेना का डोळे हे मिटले नाही 
ठिपका होताना बघत राहणे ही कल्पना खूपच आवडली. त्यातली अपरिहार्यता आणि असहायता अगदी नेमकेपणाने चित्रित झाली आहे.
-सतीश.

बघत राहीलो दूर तुला ठिपका होताना
मला कळेना का डोळे हे मिटले नाही  

सुंदर शेर...

अभ्यंकरसाहेब,
अशा गझला वाचल्यावर 'ही गझल आपल्याला का सुचली नाही', असे वाटते. उत्तम कलाकृतीची ही खूण आहे.
मराठी गझल अगदी अशी च असावी.

चांगला शेर

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी)अनिरुद्ध अभ्यंकर

सॉरी! नाही एवढी आवडली.