नार ही...!

..........................
नार ही...!
..........................


राम आयुष्यात नाही; जानकी नाही !
तेवढी नाहीच; माझी लायकी नाही !


दान दैवाने दिले भरपूर दुःखांचे...
नेमकी माझीच झोळी फाटकी नाही !


जाहली शहरांपरी नखरेल गावेही...
राहिली गावांत आता गावकी नाही !


चारचौघांच्यात कोठे ढाळता येती ?
आपुली अश्रूंवरीही मालकी नाही !


चार शब्दांनी तुझ्या हुरळू कशाला मी ?
सांत्वनाची रीत का ही नाटकी नाही ?


यातली काही फळे आहेत वाणाची...
ही अढी सारीच काही नासकी नाही !


सोसण्याचे खेळ सारे दावुनी झाले...
मात्र कोणीही दिली शाबासकी नाही !!


ऐनवेळी राखतो अवसान शर्थीने...
तेवढा नाही, मना, मी घातकी नाही !


मी तुला मोठ्या मनाने माफही केले...
चूक ही माझी परंतू बारकी नाही !


आर्जवे जो तो करी येथे प्रसिद्धीची...
नार ही सांगा कुणाची लाडकी नाही ?


-प्रदीप कुलकर्णी

गझल: 

प्रतिसाद

सुरेख गझल!!

खालील शेर विशेष आवडले--

चारचौघांच्यात कोठे ढाळता येती ?
आपुली अश्रूंवरीही मालकी नाही !
वाव्वा!

यातली काही फळे आहेत वाणाची...
ही अढी सारीच काही नासकी नाही !

वाव्वा!

आर्जवे जो तो करी येथे प्रसिद्धीची...
नार ही सांगा कुणाची लाडकी नाही ?

क्या बात है!

फाटकी, गावकी आणि नार हे शेर फार आवडले. शाबासकी शेरही अतिशय वेगळा वाटला...!

 सुंदर गझल,प्रदीपराव!
 मालकी,लाडकी हे शेर पुन्हा पुन्हा वाचले. 
मतलाही खूप आवडला.