वृत्ताची निवड
दोस्तांनो ,
कित्येकदा आपल्याला कल्पना सुचतात आणि आपण एखादे वृत्त निवडून शेर करतो. कधी कधी कल्पना वृत्तामधेच सुचतात. वृत्ताला त्या सोबतच घेऊन येतात.
एखादेच वृत्त सुचले असेल तर प्रश्न नाही. गझल त्या वृत्तात होऊन जाते. पण एका कल्पनेसाठी कधीकधी एकपेक्षा जास्त वृत्ते सुचतात आणि त्यापैकी कोणते वृत्त निवडावे हा पेच पडतो. अशावेळी कोणते वृत्त निवडावे ?
उदा. मी एक कल्पना तीन वेगवेगळ्या वृत्तात लिहून दाखवतो म्हणजे मुद्दा कळेल.
१. मला मोह घाली नभाची निळाई
२. हे निळे अंबर मनावर मोहिनी घाली किती
३. आकाश हे आहे निळे, मोहात मजला पाडते
अतिशय साध्या ओळी आहेत. केवळ उदाहरण म्हणून घेतल्या आहेत.
या प्रश्नावर कदाचित् खालीलप्रमाणे उत्तरे येतील.
१. जे वृत्त प्रथम सुचते ते घ्यावे.
२. खूप विचार करावा व कोणते वृत्त भावले यावर मनाचा कौल घ्यावा आणि अंतिम निर्णय घ्यावा.
३. मुद्दा काही काळासाठी सोडून द्यावा. कालांतराने विचार करावा.
या उत्तरांवर काही प्रतिमुद्दे उपस्थित होतात.
१. प्रथम सुचलेल्या वृत्तावर गझल केली व ती पूर्ण झाल्यावरही उरलेल्या वृतांचे आकर्षण कायम राहिले तर या उरलेल्या वृत्तांवर गझल पुन्हा करावी का ?
२. भावलेले वृत्त आणि प्रथम सुचलेले वृत्त निरनिराळे असेल तर कसा कौल घ्यावा ?
३.मुद्दा काही काळ सोडूनही प्रश्न तसाच राहत असेल तर काय करावे ?
शिवाय,
समजा, अशा पध्दतीनेअनेक गझला एकाच सूत्रावर व निराळ्या वृतांमध्ये केल्या तर त्याला 'निराळी क्रिएटिव्हीटी 'म्हणता येईल का ?
सर्वांनी जरूर चर्चा करावी.
स्वतःचे अनुभव सांगावेत.
- केदार पाटणकर
प्रतिसाद
नचिकेत
सोम, 26/05/2008 - 18:48
Permalink
मला वाटते...
मी अजूनही शिकतो आहे. ह्या चर्चेतून बरेच काही शिकायला मिळेल असे वाटते. म्हणून माझा जो काही थोडा फार अनुभव आहे त्यावरून मला असे वाटते की अशा वेळी, ज्यात कमीत कमी शब्दात आपण आपल्याला हवा असलेला आशय व्यक्त करू शकतो, असे वृत्त निवडावे. भटांनी नेमक्या शब्दांचा वापर आणि अनावश्यक शब्द टाळ्णे ह्यावर बरेच वेळा ठासून लिहिले आहे. वरील उदाहरण घेतले तर २ व ३ मधे "हे" किंवा "हे आहे" असे शब्द केवळ मात्रापुर्तीसाठी आल्यासारखे वाटू शकते. तिन्ही ओळीत अर्थछटाही वेगवेगळी आहे. त्यामुळे मी, जे प्रथम सुचते ते की जे भावते ते ह्यापेक्षाही, ज्यात आशय पुर्णपणे आणि मनाजोगा व्यक्त करता येतो ते वृत्त निवडतो. त्यात कधी कधी असे होते की काही कल्पना त्या वृत्तात मनाप्रमाणे बसत नाहीत. पण काय हरकत आहे? ती कल्पना/तो विचार ज्या वृतात समर्पक रित्या व्यक्त होईल, त्यात लिहून ठेवायचा. भटांनीच म्हटल्या प्रमाणे "जमीन तयार झाली आता गझल पुर्ण करू १२ वर्षात". सध्याचा माझे असे अनेक वेगवेगळे शेर वेगवेगळ्या वृत्तात लिहिलेले आहेत. अजून गझल पुर्ण व्हायची आहे. :-)
जाणकारांचे व इतर नवोदीतांचे अनुभव ऐकायला नक्कीच आवडेल.
चित्तरंजन भट
मंगळ, 27/05/2008 - 21:20
Permalink
माझे मत, माझे अनुभव
कुठले वृत्त निवडावे हे सांगणे तसे थोडे कठीण आहे. कारण प्रत्येक गझलकाराची तबीयत वेगळी असू शकते. काही गझलकारांना विशिष्ट अक्षरगणेवृत्ते किंवा मात्रावृत्रे प्यारी असू शकते. काहींना अक्षरगणवृत्ते गोटीबंदपणाच्या दृष्टीने अधिक आवडू शकता तर काहींना कल्पना राबवताना भरपूर मोकळीक मिळते म्हणून मात्रावृत्ते. अर्थात असा विचार करून गझल लिहू नये, असे मला वाटते. कारण शेवटी वृत्त साध्य नाही. असे असले तरी गझलकारांनी अक्षरगणवृत्तांत (जमल्यास वेगवेगळ्या अक्षरगणवृत्तांत) गझल लिहिण्याचा प्रयत्न करावा असे सुचवावेसे वाटते. असे केल्यास क्राफ्टवर चांगली पकड येण्यास मदत होऊ शकते. तसेच प्रत्येक वृत्ताच्या खासियती (लय, नाद, लघू आणि गुरूच्या वापराबाबतचे बारकावे आदी गोष्टी ) समजू शकतात.
"माझे वृत्त चुकले तर नाही!" अशी शंका मनात न येता गझल लिहिता आली पाहिजे. ह्याउप्पर वृत्ताचे नाव कुठले आहे, लगक्रम काय आहे (गालगागा गालगागा की लगागा लगागा की राधिका ताराप वगैरे), त्यात यती कुठे आहे वगैरे भानगडीत जास्त पडू नये. ह्या गोष्टी विरंगुळा म्हणून ठीक आहे. त्यापेक्षा गंभीरपणे त्याकडे बघू नये असे मला वाटते. मराठी गझलेच्या क्षेत्रात काही जण ह्याचा उगाच बाऊ करीत आहेत. असे मला वाटते. "ह्या गझलेचे वृत्त व्योमगंगा आहे, ह्यात यतिभंग झाला आहे, त्या गझलेचे वृत्त आनंदकंद होते," अशा निष्कर्षांची मुळीच किंमत करायला नको.
आशय, अभिव्यक्ती, ओळींचा बोलकेपणा (गझलियत वगैरे) लिखाणाचा बाज, लहजा, कल्पनांचा वेगळेपणा इत्यादी गोष्टी बघायला हव्यात.
गझलेच्या तंत्राची ओळख करून घ्यायला 'गझलेची बाराखडी' मला पुरेशी आहे, असे वाटते. खूप मफाइलुन-बिफाइलुन, व्योमगंगा-बिमगंगा, लगागालगागा गिरवून फायदा नाही. उस्ताद गझलकारांच्या गझला वाचायला हव्यात. सोबतीला विविध विषय माणसांचे वाचनही करायला हवे. आणि ह्या मेहनतीला थोडा प्रतिभेचा स्पर्शही हवा. मग कुठे गझल थोडीबहुत वश होण्याची शक्यता आहे.
मला सहसा ज्या वृत्तात गझल सुचते त्या वृत्तातच उरलेली गझल येते. पण काही वेळा वृत्त बदलावे लागले आहे.
काहीवेळा केवळ कल्पनाच डोक्यात असते. हळूहळू विचार करता करता कुठल्या वृत्तात ही कल्पना (तिचा आवाका, वाणगुण बघून) चांगली नांदेल ह्याची कल्पना येते.
बरेचदा एखादी जमीनच अशी असते की ह्या गोष्टींचा (वृत्ताची निवड वगैरे) फारसा विचार करावा लागत नाही.
बरेचदा असे होते की, गझलेची एखादी ओळ एखाद्या वृत्तात सुचते आणि तिच्या पाठोपाठ इतर कल्पनाही कच्च्या स्वरूपात येतात. ह्यावरून वृत्ताचा अंदाज येतो. आपल्याला ज्या वृत्तात पहिली ओळ सुचली त्यात ह्या कल्पना नांदतील का ह्याचीही कल्पना येते. काहीवेळा सगळ्याच कल्पना त्या गझलेत, वृत्तात नांदू शकत नाहीत. अशावेळी पुढच्या एखाद्या त्या मनात जपायच्या किंवा कागदावर लिहून ठेवायच्या. इतर पर्यायी वृत्तांबाबतही (म्हणजे त्याच कल्पनेसाठी सुचलेल्या इतर वृत्तांबाबत) हेच म्हणता येईल.
ह्याबाबतीत कुठे थांबावे हे कळणे महत्त्वाचे.
बाकी "अनेक गझला एकाच सूत्रावर व निराळ्या वृतांमध्ये केल्या तर त्याला 'निराळी क्रिएटिव्हीटी 'म्हणता येईल का ?" असा प्रश्न तुम्ही विचारला आहे.
ह्यात कसली आली आहे 'निराळी क्रिएटीव्हिटी'? माझ्यामते बिलकुल म्हणता येणार नाही. ह्याला फार-फार तर मी चांगली क्राफ्ट्समनशिप (कारागिरी) म्हणेन.
असो. तूर्तास एवढेच. चूभद्याघ्या.
शार्दूल
मंगळ, 24/06/2008 - 16:23
Permalink
शंका
काही दिवस, काही रचना केल्यानंतर,
त्याच त्याच वृत्तात विचार ( आणि रचना ) करण्याची सवय लागण्याची शक्यता नाही काय ?
केदार पाटणकर
शुक्र, 12/02/2010 - 13:18
Permalink
एकाच वृत्तात सलग काही रचना
एकाच वृत्तात सलग काही रचना केल्यावर त्याच वृत्तात विचार व रचना करण्याची सवय लागते, लागू शकते. मला तसा व्यक्तिगत अनुभव आहे.