आता !

..................
आता !
..................


जगापासून या दडायचे आता !
मलाही मी न सापडायचे आता !


कुणालाही न व्हायचे हवेसेही...
कुणालाही न आवडायचे आता !


पुन्हा का तेच ते, तसेच ते होई ?
नवे काही न का घडायचे आता ?


मिळेना अर्थ, एकही मनाजोगा...
किती मी शब्द पाखडायचे आता ?


असे काही...स्वतःपलीकडेसुद्धा...
स्वतःपाशीच का अडायचे आता ?


पुन्हा सोसायची कशास ती दुःखे ?
पुन्हा प्रेमात का पडायचे आता ?


निरोपाची बरी नव्हेच ही भाषा...
तुझे काही न का नडायचे आता ?


जिवा,  नाही तुझे कुणी कुणी नाही...
कुठे नाहीस तू जडायचे आता !!


कुणीही राहिले कुठे जिव्हाळ्याचे ?
कुणापाशी ? कुठे रडायचे आता ?


- प्रदीप कुलकर्णी

गझल: 

प्रतिसाद

मिळेना अर्थ, एकही मनाजोगा...
किती मी शब्द पाखडायचे आता ?      'शब्द पा़खडणे ' मस्त

जिवा,  नाही तुझे कुणी कुणी नाही...
कुठे नाहीस तू जडायचे आता !!         'जीव जडणे' छान.

शब्द पाखडणे आवडले.

कुणीही राहिले कुठे जिव्हाळ्याचे ?
                        - शेवटच्या शेरातल्या पहील्या ओळीत बिचकल्यासारखे होते.

निरोपाची बरी नव्हेच ही भाषा...
तुझे काही न का नडायचे आता ? - हा शेर तर लाजवाब !!

 
मराठी रसिक
सप्रेम नमस्कार  :)
न बिचकता वाचा...
नाही होणार बिचकल्यासारखे !
 
 

गझल अगदी चांगली झाली आहे. सगळेच शेर चांगले आहेत.

निरोपाची बरी नव्हेच ही भाषा...
तुझे काही न का नडायचे आता ?

वाव्वा!! क्या बात है.

नडायचे, अडायचे आणि रडायचे हे शेर विशेष आवडले!!
स्वतःपाशीच का अडायचे आता ? -- वा! वा!

सापडायचे,पाखडायचे हे शेर विशेष आवडले.