शोधायचा कशाला?

पाठीस बाळ आहे, शोधायचा कशाला?
जेवून तृप्त का हो शोधाल पाकशाला...

नाभीतली सुगंधी कस्तूरिच्या मृगाची,
त्यालाच ठाव नाही, पंकात मग्न झाला...

पाठीवरी पिसारा, मोरास जाणवेना,
पाया कुरूप पाही आणून आसवाला...

दौहित्र श्राद्ध घाली, स्वर्गात पोचवीतो,
पुत्राविना कसा रे हा जन्म फोल झाला...

छावा चुकून आला झुंडीत कोकरांच्या,
त्यांच्यासवे चरावा का व्यर्थ झाडपाला...

स्वाधीन शक्ति वाया, लेखून क्षुद्र कोणी,
धावे पराश्रयाला, हा बुद्धिभेद झाला...

गीतार्थ सांगताहे, मी एक ब्रह्म आहे,
हा देहमोह सोडा, दु:खे रडा कशाला...

--स्वामी निश्चलानन्द

(वृत्त आनंदकंद - गागालगा लगागा गागालगा लगागा)

गझल: