उ:शाप

मानवाच्या जीवनाला, काय दैवा, शाप आहे?
तो कुणाचा पुत्र आहे वा कुणाचा बाप आहे...

अन्नवस्त्राची शिदोरी पोसते आहे तनूला,
तेवढ्याने होत नाही, भावनांचा व्याप आहे...

कोणत्या नाजूक वेळी तोकड्या शक्तीस याच्या,
धीर देण्या माउलीचा हात देतो थाप आहे...

आपल्या पाठी उभा आहे पिता या भावनेने,
हिंमतीचा जोर येतो, शत्रुची का टाप आहे...

खुंटल्या यत्नास जेंव्हा मार्ग दावाया कुणाच्या
युक्तिचा आधार लाभे, आदराची छाप आहे...

साथ देण्या भावनांना, जाणुनी त्या पातळीने,
जीव लावी हेच मोठे सख्यभावा माप आहे...

या मनाला गुंतवाया मोहुनी सर्वस्वभाना,
भामिनीच्या डोळियांचा कामदेवी चाप आहे...

एक धागा हा सुखाचा लाभतो प्रेमात मोठा,
जीवनी संगीत वाटे, घेतसे आलाप आहे...

सर्व संबंधांस साधा, भावनेला साथ देती,
नाचतो त्यांच्याप्रमाणे, लागते रे धाप आहे...

ना कधी होते मनाचे मानल्या इच्छेप्रमाणे,
वेळ येता दे दगा ते आपुले, हा ताप आहे...

ज्या भरोशाने जगाला लाविलेले ऊरपोटी,
तो तुटे, हा भावनेला वेदनेचा राप आहे...

शास्त्र सांगे सोडुनी द्या, मोहमायेचा पसारा,
वागणे ना त्याप्रमाणे, कोण जाणे पाप आहे...

काव्य देई या मनाच्या भावनांना वाट सोपी,
लेखणी हाती धरावी, एवढा उ:शाप आहे...

.... स्वामी निश्चलानन्द

(व्योमगंगा - गालगागा गालगागा गालगागा गालगागा) 

गझल: