पुढेच जात जा...
घडोघडी पडो झडो तरी पुढेच जात जा,
घडो प्रयास आसयुक्त, ध्यासगीत गात जा...
करील वंचना कुणी, नसो विवंचना मनी,
'करीन' हीच जिद्द बाळगून धाडसात जा...
असेल जी तुझ्यात शक्ति, तोच आसरा खरा,
असे उधार वा भिकेत दुष्प्रभाव, चेत जा...
जयांस लाभले सुदैव शक्तिबुद्धिचे भले,
जयात ते तुझ्या प्रसन्न, आदरास देत जा...
तुझ्याहुनी असे कुणी अशक्त, दुर्बलास त्या,
तुझ्या बरोबरीस घेत सांत्वनाच देत जा...
जगात वीर विक्रमी बनेन, हाव ही नको,
जगावयास सौख्यलाभ थोडक्यात घेत जा...
नसोत भव्य भाव 'या जगास मी सुधारणे',
नसो प्रपंच व्यर्थ हा, तुझाच शोध घेत जा...
(कलिंदनंदिनी, गण - लगालगा लगालगा लगालगा लगालगा)
गझल: