या उदास रात्री

या उदास रात्री


राहू नकोस दूर या उदास रात्री
मनी उठे काहूर या उदास रात्री


जरी सारले हळवेपण मी मागे
का वाटे हुरहूर या उदास रात्री?


कळीस नाही भान दुखर्‍या वेलीचे
तिचा वेगळा नूर या उदास रात्री..


अता  शमले वादळ दिवसाचे पण
अंधाराचा पूर या उदास रात्री


मरूभूमीवर अवचित जळ तसा दिसेल 
का मज  सौख्यांकूर ? या उदास रात्री


फक्त दीर्घ ही असे निराशा -बाकी
सारे क्षणभंगूर ! या उदास रात्री


'कसे जगायचे रे ?असे खोटे? हसत?
सांग ,काय तुला मंजूर ! या उदास रात्री'


 

गझल: 

प्रतिसाद

सोनाली,
गझल आवडली. हळवेपण,नूर्,क्षणभंगूर्,मक्ता हे शेर विशेष.
'सौख्यांकूर' चा शेर थोडा शब्दाळ वाटतो.
जयन्ता५२

अति सुरेख.
ई मैल कर.

राहू नकोस दूर या उदास रात्री
मनी उठे काहूर या उदास रात्री
अता  शमले वादळ दिवसाचे पण
अंधाराचा पूर या उदास रात्री
वा...वा...

छान !
पण मला तरी वृत्त समजले नाही. काही ठिकाणी यतिभंगाचा आभास ! पण सर्वच शेरांतील कल्पना सुंदर आहेत.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

पाचव्या आणि सातव्या द्विपदीचा. बाकी साऱ्या उत्तम. आवडल्या.  उदास रात्र या कल्पनेवरचीच एक उर्दू गझल ऐकल्याचे आठवते. नेमके शब्द आत्ता विसरलो. बहुदा गुलाम अली किंवा मेहदी हसन यांची असावी.