अज्ञातवास

कवितेमधून माझ्या येतो सुवास माझा !
एकेक शब्द आहे हा खास, खास माझा !

माझ्या कथे-व्यथेची जावी बनून गाथा...
इतकीच आस माझी, इतकाच ध्यास माझा !

डोळे मिटून सारे पाहून घेतले मी...!
बसल्यास्थळीच सारा झाला प्रवास माझा !!

- याला प्रसन्नतेने आवाज दे तुझा तू...
आहे किती किती हा मुखडा उदास माझा !

नेऊ नका कुठेही मज चौकशीस आता...
काढू नका कुणीही आता तपास माझा !

कळते मला, दिशेला आहेस कोणत्या तू...
कलतो पुन्हा पुन्हा हा तिकडेच आस माझा !

वारा बनून आता चुंबीन मी तुम्हाला...
सोसाल ना फुलांनो, इतकाच त्रास माझा ?

मी नाद स्पंदनांचा व्हावे तुझ्या उरीच्या...
माझी बनून तूही घ्यावास श्वास माझा !

तुज मागतो कुठे मी सारेच पान कोरे ?
आहे मला पुरेसा थोडा समास माझा !

झाली कठोर शिक्षा मज एकटेपणाची...
माझ्यावरी पहारा देणार भास माझा !!

नगरी अशी कशी ही ? येथे विराट नाही...
काढू कसा, कुठे मी, अज्ञातवास माझा ?

- प्रदीप कुलकर्णी

गझल: 

प्रतिसाद

प्रत्येक शेर अतिशय आवडला.
अप्रतिम गझल.
सोनाली

कळते मला, दिशेला आहेस कोणत्या तू...
कलतो पुन्हा पुन्हा हा तिकडेच आस माझा !

वारा बनून आता चुंबीन मी तुम्हाला...
सोसाल ना फुलांनो,  इतकाच त्रास माझा ?

मी नाद स्पंदनांचा व्हावे तुझ्या उरीच्या...
माझी बनून तूही घ्यावास श्वास माझा !

तुज मागतो कुठे मी सारेच पान कोरे ?
आहे मला पुरेसा थोडा समास माझा !
खासच! सगळी गझल फार फार आवडली.
- चक्रपाणि जीवन चिटणीस

अप्रतीम सुरेख गझल. सगळेच शेर खास.

तुज मागतो कुठे मी सारेच पान कोरे ?
आहे मला पुरेसा थोडा समास माझा !झकास!गझल नेहमीप्रमाणे आवडली.

जयन्ता५२

बहारदार गझल! मतला, समास आणि अज्ञातवास हे शेर तर फार फार आवडले!!