हे शहरच आता दिसते...

हे शहरच आता दिसते पैशात पूर्ण मुरलेले
पण सदरे सुखि व्यक्तींचे केव्हाच जीर्ण झालेले

 

ऋतु हा पानगळीचा, हे वृद्ध झाड वठलेले
त्यावरचे शेवटचेही नुकतेच पर्ण गळलेले

 

ही घरे येथली दिसती शुभ्रधवल रंगांची
परि अंतर्यामी त्यांच्या कितिक हे वर्ण दडलेले

 

वसती दुर्योधन येथे, कैक ते श्रेष्ठ अर्जुनही
अन महाभारती इथल्या कित्येक कर्ण पिचलेले

 

मज उडावयाचे होते, आकाश भेदण्यासाठी
प्रत्येक स्वप्न माझेही गाळात पूर्ण बुडलेले

 

 

गझल: 

प्रतिसाद

वा...वा...अमोघ...छान लिहितोस रे...
गझल या काव्यप्रकाराची खासियत तुला कळलेली आहे, असे जाणवते. तुझ्या कल्पना चमकदार आहेत.  आता तुला काही गोष्टींवर लक्ष द्यावे लागेल. सार्थ यमके आणि ओळींमधील सफाईदारपणा, या त्या गोष्टी होत.  त्या सरावाने येतात...सराव मात्र केला पाहिजे.  त्यात हयगय नको. गझल लिहिणे सोडू नकोस...लिहीत राहा...लिहीत राहशील तर नावासारखीच गझल लिहिशील - अमोघ ! आणि हळूहळू वृत्तांवरही `प्रभु`त्व येईल...शुभेच्छा.
पुढील गझलेच्या प्रतीक्षेत.