अनुभव

हृदय स्वतःला आठव आहे का
जर आहे तर दाखव आहे का

नाव बदलले आहे का माझे?
मानव नाही, दानव आहे का?

जो तो गातो रडगाणे येथे
हा दुःखाचा उत्सव आहे का

रंग घेतला आहे धर्माचा
भाषा इतकी गाढव आहे का

कसा भरवसा ठेऊ डोळ्यांवर
जे दिसते ते वास्तव आहे का

जीव घ्यायला आली आहे ती
हीच शांतता नीरव आहे का

कसे दाखवू कुठे लागले ते
मन एखादा अवयव आहे का

दारूमधला कडूपणा गेला
पाणी इतके बेचव आहे का

छान वाटते मला शहर माझे
तुझा वेगळा अनुभव आहे का

अशी शक्यता नाही आहे पण
तसे बघूदे संभव आहे का

बेफिकीरची श्रीमंती बघ जय
तुझ्याकडे ते वैभव आहे का?

.....जयदीप

गझल: